05 August 2020

News Flash

डिफॉल्ट मोड नेटवर्क

माणूस वेगवेगळ्या कृती करीत असताना मेंदूतील कोणते भाग सक्रिय होतात याचे सध्या संशोधन केले जाते.

आपण शांत बसलेले असतानादेखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो त्याला शास्त्रज्ञांनी डिफॉल्ट मोड नेटवर्क असे नाव दिले आहे.  तुम्हाला संगणकात डिफॉल्ट मोड असतो हे माहीत असेल. संगणक सुरू केला की याच स्थितीत तो सुरू  होतो. माणसाचा मेंदू हा परमसंगणक आहे. त्यामध्येही ठरावीक भाग असा असतो जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो. तो झोपेतदेखील सक्रिय असतो त्या वेळी आपल्याला स्वप्ने पडत असतात.

माणूस वेगवेगळ्या कृती करीत असताना मेंदूतील कोणते भाग सक्रिय होतात याचे सध्या संशोधन केले जाते. त्या वेळी कोणतीही कृती न करता शांत बसलेली माणसे ‘कंट्रोल ग्रूप’ म्हणून सहभागी करावी लागतात. त्यांची तपासणी केली असता मेंदूतील ठरावीक भाग या शांत बसलेल्या माणसांमध्ये सक्रिय असतो असे दिसू लागले. त्या अर्थाने डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो, पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की या भागातील सक्रियता कमी होते असे त्यांनीच दाखवून दिले.

आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो त्या वेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते. आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे. पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नराश्याचा, तणावाचा शिकार होतो. ते टाळण्यासाठी या भागाला अधूनमधून विश्रांती द्यायला हवी.

ज्या वेळी आपण एखादी शारीरिक हालचाल सजगतेने करू लागतो किंवा नैसर्गिक श्वासामुळे होणारी छाती पोटाची हालचाल जाणू लागतो त्या वेळी मेंदूच्या या भागाला विश्रांती मिळते.

त्यासाठी, एका तासात ५८ मिनिटे विचार केला की दोन मिनिटे श्वासाकडे लक्ष द्यायला हवे. विचार करायलाच हवा; पण सतत विचारात राहणे टाळायला हवे. – डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 12:02 am

Web Title: default mode network akp 94
Next Stories
1 जीविधता – जैवविविधता   
2 मनाची भारित स्थिती
3   इतर हरितगृह वायू 
Just Now!
X