लोकशाही प्रजासत्ताक काँगो किंवा डी. आर. काँगो हा मध्य आफ्रिकेतला देश क्षेत्रफळाच्या बाबतीत आफ्रिका खंडातला दुसरा मोठा देश आहे. डी. आर. काँगो म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक काँगो. या देशाच्या पश्चिम सीमेला लागून असलेला दुसरा आणखी एक काँगो नावाचाच देश आहे. तो आहे- रिपब्लिक ऑफ काँगो. त्याचा उल्लेख फक्त ‘काँगो’ असा केला जातो. डी. आर. काँगो हा देश काही वेळा ‘डीआरसी’ किंवा राजधानी किन्शासावरून ‘कांगो-किन्शासा’ नावानेही ओळखला जातो. याचे ऐतिहासिक नाव ‘झैरे’ असे आहे. कांगो नदी या देशातून वाहते आणि त्यामुळे हे नाव झाले. याच्या सीमा उत्तरेला मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक आणि सुदान; तर पूर्वेला युगांडा, रवांडा आणि अंगोला या देशांच्या सीमांना भिडलेल्या आहेत.

३० जून १९६० रोजी बेल्जियमपासून स्वातंत्र्य मिळवून डी. आर. काँगो हा सार्वभौम देश अस्तित्वात आला. नैसर्गिक संसाधने आणि खनिजे यांनी समृद्ध असलेला हा देश अनेक दशकांपासून तिथले राजकीय अस्थैर्य, सरकारी भ्रष्टाचार यामुळे अविकसितच राहिला आहे. शैक्षणिक, वैद्यकीय सुविधा पुरेशा नसल्यामुळे येथे रोगराई व साथीच्या आजारांनी दरवर्षी दोन ते तीन लाख लोक मृत्युमुखी पडतात. तसेच लाखो लोक शेजारच्या देशांमध्ये पलायन करतात. डी. आर. काँगोची गणना जगातील अत्यंत गरीब, मागासलेल्या देशांमध्ये केली जाते.

१४८२ साली दिआगो काओ हा पोर्तुगीज प्रथम (तेव्हा दोन देश नसलेल्या) काँगोमध्ये आला. त्याकाळी तिथे स्थानिक लोकांची राज्ये होती. अरब व स्वाहिली व्यापाऱ्यांचे या स्थानिक राज्यकर्त्यांशी व्यापारी संबंध होते. मुख्यत्वे गुलाम, तांबे आणि मीठ यांचा व्यापार हे लोक येथून करीत. पुढे सोळाव्या-सतराव्या शतकात ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच, डच व्यापाऱ्यांचा येथील आफ्रिकन दलालांमार्फत गुलामांचा व्यापार चांगलाच फोफावला. बेल्जियमचा राजा लिओपोल्ड द्वितीय याने १८७० मध्ये त्याचा अधिकारी हेन्री स्टॅनले याला काँगोत बेल्जियमची एखादी वसाहत स्थापन करता येईल का यासंबंधी सर्वेक्षण करण्यासाठी पाठवले. सर्वेक्षण पूर्ण होत आले असतानाच युरोपियन राष्ट्रांची १८८५ मध्ये बर्लिन परिषद होऊन त्यात काँगोचे स्वामित्व बेल्जियमने घेण्यास बाकी देशांनी मान्यता दिली.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com