05 December 2020

News Flash

जे आले ते रमले.. : एडवर्ड बेलफोर यांचे कार्य (२)

मूळचे स्कॉटलंडचे रहिवासी एडवर्ड बेलफोर, ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रास प्रेसिडेन्सीत लष्करी सर्जन म्हणून मद्रास येथे नोकरीस होते.

(संग्रहित छायाचित्र)

सुनीत पोतनीस

मूळचे स्कॉटलंडचे रहिवासी एडवर्ड बेलफोर, ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रास प्रेसिडेन्सीत लष्करी सर्जन म्हणून मद्रास येथे नोकरीस होते. त्यांची त्यायोगे भारतीय प्रदेशात, विशेषत: दक्षिणेत बरीच भ्रमंती झाली. या भ्रमंतीत त्यांनी अनेक दुर्मीळ वस्तू संग्रहित केल्या होत्या. अशा प्रकारच्या पुरातन दुर्मीळ वस्तूंचे एक कायमचे प्रदर्शन मांडायची आपली कल्पना एडवर्डनी मद्रासच्या तत्कालीन गव्हर्नरला सांगितली आणि गव्हर्नरने त्याला तत्काळ संमती देऊन त्यासाठी मद्रासमध्ये जमीन आणि इमारतीची व्यवस्था केली. त्या जागेत एडवर्डच्या नियोजनाप्रमाणे १८५० साली गव्हर्मेट सेंट्रल म्युझियम स्थापन झाले.  विविध दुर्मीळ वस्तूंसाठी त्यांनी लोकांना आवाहन केलं आणि लोकांनीही मोठा प्रतिसाद देऊन आपल्या घरांमधील पुरातन वस्तू या संग्रहाला भेट दिल्या. या संग्रहाला जोडून नॅचरल हिस्टरी विभागात वाघ आणि चित्ते ठेवले. लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे १८५३ मध्ये त्यांनी त्याचे पुढे मद्रास झुऑलॉजिकल गार्डनमध्ये रूपांतर केले. १८५६ पर्यंत मद्रास म्युझियममध्ये २० हजाराहून अधिक दुर्मीळ वस्तू जमा झाल्या. याच धर्तीवर एडवर्डनी १८६६ मध्ये बेंगळूरुमध्येही म्युझियम स्थापन केले. तसेच १८५५ आणि १८६८ साली पॅरिसमध्ये, १८६२ साली लंडनमध्ये, १८७२ साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये ब्रिटिश प्रतिनिधी म्हणून एडवर्ड बेलफोरनी काम पाहिले.

एडवर्डनी भारतीय जीवनशैलीचा सखोल अभ्यास केला होता. याबाबत असलेल्या त्यांच्या व्यक्तिगत नोंदींवरून ‘द एनसायक्लोपीडिया ऑफ इंडिया’ हा औद्योगिक, शास्त्रीय, व्यापारी माहितीचा शब्दकोश त्यांनी १८५७ साली प्रसिद्ध केला. पुढे त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. एडवर्डनी भारतीय पर्यावरण, वनसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य या विषयांवर १५ पुस्तके लिहीली.

१८७६ साली  एडवर्ड इंग्लंडमध्ये परत गेले. विविध समाजांतर्फे त्यांना निरोप देण्यात आला. पुढे लंडनमध्ये १८८९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मद्रास विद्यापीठाने एडवर्डच्या स्मरणार्थ स्त्रियांना वैद्यकीय क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी १८९१ पासून ‘बेलफोर मेमोरियल गोल्ड मेडल’ देण्याची प्रथा सुरू केली.

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2018 1:36 am

Web Title: dictionary creator edward belfor 2
Next Stories
1 कुतूहल : न पाहिलेल्या मूलद्रव्याचा शोध
2 जे आले ते रमले.. : एडवर्ड बेलफोर (१)
3 कुतूहल : पृथ्वीवरचं सर्वात दुर्मीळ मूलद्रव्य
Just Now!
X