06 July 2020

News Flash

कुतूहल: साबण आणि डिर्टजट यांतील फरक

डिर्टजट आणि साबण (तेल वापरून बनवलेले) यांमध्ये रासायनिकदृष्टय़ा काहीच साम्य नाही. डिर्टजटमध्ये तरीदेखील साबणाचे बरेचसे गुण आढळतात, ते कसे? डिर्टजट म्हणजेच कार्बनीद्रव्य (पेट्रो-रसायने)

| May 27, 2014 01:01 am

 कुतूहल
साबण आणि डिर्टजट यांतील फरक
डिर्टजट आणि साबण (तेल वापरून बनवलेले) यांमध्ये  रासायनिकदृष्टय़ा काहीच साम्य नाही. डिर्टजटमध्ये तरीदेखील साबणाचे बरेचसे गुण आढळतात, ते कसे?  डिर्टजट म्हणजेच कार्बनीद्रव्य (पेट्रो-रसायने) असलेले संश्लेषित पदार्थ. साबणाच्या रेणूप्रमाणे डिर्टजटच्या रेणूच्या कार्बनी मूलकाच्या एका टोकाचा भाग ‘जलरोधी’ तर दुसऱ्या टोकाकडील भाग ‘जलप्रेमी’ असतो. अशाप्रकारचे रेणू पाण्याचा पृष्ठीय ताण कमी करतात. त्यामुळेच डिर्टजटमध्ये साबणाचे गुणधर्म येतात. साबणाशी तुलना करता डिर्टजट हे अधिक कार्यक्षम आहेत. यामागे काय कारण असेल?
जर पाणी कठीण असेल तर अशा पाण्यात कपडे धुण्यासाठी वापरलेला साबण कपडय़ाची स्वच्छता करण्यापूर्वी पाण्यातील क्षारांशी संयोग पावतो. दुहेरी विस्थापन होऊन त्यामधून कॅल्शिअमचे व मॅग्नेशिअमचे क्षार बनतात. पाण्यात हे क्षार अद्रावणीय असल्याने त्यांचा चिकट साखा होऊन तो पाण्यामध्ये तरंगत राहतो व कपडय़ांना चिकटतो. या साख्यामुळे कपडय़ाचा रंग भुरकट बनतो आणि कापड व कापडतंतू यांची काही प्रमाणात खराबी होते. हा दोष डिर्टजटमध्ये येत नाही; याचे प्रमुख कारण म्हणजे या दोन द्रव्यांच्या संरचनेच्या अंत्य गटातील फरक होय. साबणात रेणूच्या अंती असणारा (-उडडऌ) हा अणूंचा गट होय, तर डिर्टजटमध्ये या गटाऐवजी सल्फेट (-ड-रड3ऌ) किंवा सल्फोनेट (-रड3ऌ) असे अणू गट हायड्रोकार्बन साखळीला जोडलेले असतात. त्यांचे सोडिअम क्षार तयार केल्यावर त्या संयुगाच्या रेणूचे आयनीकरण होऊन साबणाप्रमाणेच जलप्रेमी व जलरोधी अशी दोन टोके एकाच आयनामध्ये एकत्र आल्याने त्यामध्ये साबणाचे गुण येतात. परंतु कठीण पाण्यातील कॅल्शिअम किंवा मॅग्नेशिअम यांच्याशी झालेले साबणाचे संयुग अद्रावणीय असतात. परंतु सल्फेट किंवा सल्फोनेटबरोबर झालेले तेच संयुग द्रावणीय असल्याने हे संयुग काही अडचणी न येता पाण्याबरोबर वाहून जातात. हेच डिर्टजटच्या यशाचे कारण आहे.
साबणाची कार्यक्षमता आणखी एका ठिकाणी कमी पडते, ती म्हणजे आम्लयुक्त पाण्यामध्ये. साबणावर आम्लाची अभिक्रिया होऊन साबणापासून तल आम्ले मोकळी होतात. तल आम्ले यामध्ये साबणाचे काहीच गुण नसतात, मात्र डिर्टजटवर आम्लयुक्त पाण्याचा प्रतिकूल परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता अबाधित राहते.
शुभदा वक्टे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व
स्त्रियांना वाली उरला आहे काय?
‘‘ज्या पवित्र मूल्याची हत्या या काळात झालेली आहे असे मला सांगायचे आहे ते मूल्य म्हणजे स्त्रियांची अब्रू हे होय. स्त्रियांच्या अब्रूला कसलीही किंमत सध्या उरलेली नाही. अब्रूवर घाला पडलेल्या स्त्रियांची आक्रंदने प्रत्यही ऐकू येत आहेत. पण कोडगी आणि निगरगट्ट बनलेली पुरुषाची जात तिकडे कानाडोळा करीत आहे. जणू काही काहीच घडले नाही अशा दुर्लक्षाने पुरुष आपापली कामे करीत आहेत! बेशरमपणाची कमाल झाली आहे. एका स्त्रीच्या अंगावर केवळ हात पडला तर माणसे बंदुकीच्या गोळ्यांखाली उंदरासारखी आणि घुशीसारखी पटापट मेल्याची उदाहरणे आहेत. पण स्त्रियांवरील प्रत्यक्ष बलात्काराच्या आक्रंदनांनी हवा कुंद झाली तरी पाकोळी मेल्याचे दु:खही कोणास होत नाही.. माणूस मारणे आणि ढेकूण मारणे ही जशी सारख्याच किंमतीची झाली आहेत तसा स्त्रियांची इज्जत घेणे हा नित्याचा गुन्हा झाला आहे; आणि तो उपेक्षणीयही बनला आहे. मानवी संस्कृतीचा देव्हारा खरोखरच फुटला आहे.’’ श्री. म. माटे यांनी सत्तरेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘स्त्रियांना वाली उरला आहे काय?’ या लेखात म्हटले आहे – ‘‘ज्या काळी स्त्रियांच्या अब्रूसाठी मोठमोठाले समरसिकंदर पुरुष तलवार घेऊन शत्रूवर धावत असत त्याच काळी तेव्हाच्या वृद्ध पंडितांनी आणि पितामहांनी ‘अर्थस्य पुरुषो दास:’ हा न्याय सांगितलेला होता.. स्त्रियांनी आपल्या हातात कंकणे घालावी तर त्या स्त्रियांच्या रक्षणासाठी वीर पुरुषांनी आपल्या स्वत:च्या हातात रक्षाबंधनाचे कंकण बांधावे, हा आमच्या संस्कृतीचा अतिशय ठळक असा पौराणिक आणि ऐतिहासिक धर्म होता. जिने रक्षाबंधनासाठी हाक मारली तिच्यासाठी देहविसर्जन जरी करावे लागले तरी बेहत्तर, असे तरुण लोक समजत असत. दु:खाची गोष्ट ही की, ही ऐतिहासिक वार्ता आता बंद पडली आहे. ज्या देव्हाऱ्यात या पवित्र मूल्य-मूर्तीची स्थापना झालेली होती, तो फुटलेला आहे आणि भाकरीने संतुष्ट झालेले लोक या भग्न मंदिराकडे आपल्या नव्या संस्कृतीचे गमक म्हणून पाहत आहेत.. सापेक्ष विचाराची आवश्यकता या युगाइतकी पूर्वी केव्हाही भासमान झाली असेल असे वाटत नाही.’’

मनमोराचा पिसारा
प्रतिज्ञेचं मानसशास्त्र
शपथ घेतल्यावर आपण सगळं खरं सांगतो का? नि सांगितलेलं सगळं खरंच असतं का? सत्याला स्मरून वागण्याची जाहीर प्रतिज्ञा केल्यावर आपण तसे वागतो का?
पूर्वी घडलेल्या आपल्या चुकांची प्रामाणिक कबुली देण्यासाठी   आपण शपथ घेतो वा घातली जाते. होणाऱ्या व्यवहाराबद्दल (नीतिमत्तेची चाड बाळगण्याबद्दल) आपण प्रतिज्ञा करतो. भारतीय परंपरेमध्ये एकवचनी बाणा, सत्यवचनीपणा आणि भीष्मप्रतिज्ञेला फार महत्त्व आहे..
ही सगळी अध्याहृत वचनं (अफोरिझम) आहेत; परंतु मानसशास्त्राला विशेषत: ‘समाजमानस व्यवहारशास्त्रा’ला अशा सुवचनांचा पडताळा घेण्याचे प्रयोग करायला आवडतात. हौस म्हणून नाही तर, या सुवचनातलं नेमकं आणि व्यावहारिक सत्य कोणतं? आणि ते कितपत सत्य असतं, कुठपर्यंत या सत्यवचनांची मजल जाते? त्याबरोबर अशा प्रयोगानिशी सिद्ध होणाऱ्या व्यावहारिक सत्याचा प्रत्यक्षात कसा उपयोग करता येतो, यावर विचारमंथन आणि अर्थातच प्रयोग करण्यात स्वारस्य असतं.
अशा व्यावहारिक (अर्थशास्त्रीय) मानसशास्त्रज्ञांमध्ये डॅन अ‍ॅरियेलचं नाव अग्रगण्य आहे. डॅननं प्रेडिक्टेबली इर्रॅशनल, ऑनेस्ट ट्रथ अबाउट डिसऑनेस्टी अशी पुस्तकं लिहिली आहेत, त्या पुस्तकांचा यथावकाश परिचय करून घेऊ. पण प्रतिज्ञा-मानसशास्त्राच्या प्रयोगातल्या गमती पाहू.
डॅननं माणसं मुख्यत: (विद्यार्थी- व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक व प्रत्यक्ष मॅनेजर) कशी नि कितपत फसवतात याचं एक प्रायोगिक मॉडेल अथवा प्रारूप तयार केलंय. ते मॉडेल इथे मांडत नाही. इतकंच म्हणतो की, सुनिश्चित परिस्थितीमध्ये लोक कशा प्रकारे फसवतात, याच्या संख्याशास्त्रीय अभ्यासावरून एक मूलभूत संख्याशास्त्रीय अनुमान (स्टेबल) स्थिर केलं. ते आपण गृहीत धरू.
डॅननं नव्या प्रयोगाला सुरुवात केली. व्यवस्थापनातल्या विद्यार्थ्यांना एक छोटीशी चाचणी दिली. काही मुलांवरील सुपरव्हिजनमुळे त्यांना फसवणं शक्य नव्हतं तर काही मुलांना (जाणूनबुजून) संधी दिल्यानं त्या विद्यार्थ्यांनी फसवलं त्यामुळे मुलं कितपत फसवतात याचा अंदाज आला. मग त्यानं एका गटाला लहानपणी वाचलेल्या दहा पुस्तकांची यादी करायला सांगितली, तर दुसऱ्या गटाला दहा देवाज्ञा (टेन कमांडमेंट) आठवायला लावल्या. ज्यांना हे  दोन्ही चटकन आठवलं नाही त्यांना आठवायला मदत केली. दोन्ही गटांनी लगेच तशीच लहानशी चाचणी घेतली.
‘दहा देवाज्ञांची आठवण करून दिलेल्या गटानं निश्चितच अनेक पटीनं कमी फसवलं होतं. इतकंच काय तर या दहा आज्ञांचे आणखी एका गटाने सामूहिक पठण केले. त्या गटानेही मोठय़ा प्रमाणात सचोटी दाखवली.
या प्रयोगात धार्मिक संस्कार असल्याचा पूर्वग्रह आड आला असं गृहीत धरून मग त्यानं आणखी शक्कल लढवली. दहा आज्ञांऐवजी एका गटाने ‘आम्ही आमच्या (एमआयटी) संस्थेच्या बहुमानाचा आदर ठेवून ही चाचणी देत आहोत,’ असं म्हणायला लावलं आणि या गटानेही त्या चाचणीत फसविण्याचे प्रमाण अत्यल्प ठेवलं.
धार्मिक सत्तेनं लादलेल्या सचोटीपेक्षा वर्तमानकाळातील सामाजिक संस्थांचा आदर राखणे, त्या संस्थांची मूल्यं जपणं महत्त्वाचं ठरलं. इतकंच नाही तर संस्थेची पत आणि प्रतिष्ठा राखण्याचं नैतिक मूल्य व्यक्तिगत पातळीवर पाळण्याचं लोक स्वीकारतात, असा निष्कर्ष काढायला हरकत नाही, असं डॅन म्हणतो. अर्थात, प्रतिज्ञेचं जाहीर वाचन/पठण आणि प्रत्यक्ष (फसवायची संधी देणारा) व्यवहार यामध्ये वेळेचं अंतर असता नये.
..आणि हा प्रयोग राजकीय पातळीवर यशस्वी ठरेल का? करता येतो अंदाज?
डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2014 1:01 am

Web Title: difference between soap detergent
Next Stories
1 कुतूहल: स्वच्छतेसाठी साबणाची गरज
2 कुतूहल: डीएनएचे उपयोग
3 कुतूहल: डीएनएचे ठसे
Just Now!
X