22 February 2019

News Flash

मल्याळी युरोपियन!

साहित्य क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करून ठेवलीय.

भारतीय द्वीपकल्पात, प्राचीन काळापासून आजतागायत आलेल्या परकीयांना येथल्या विविध क्षेत्रांतल्या विविध गोष्टींनी भुरळ घातली. ते इथे रमले आणि इथलेच झाले. काही विशिष्ट व्यवसाय, नोकरी करण्याच्या हेतूने येथे आलेल्या अनेकांनी तर आपला मूळ हेतू बाजूला ठेवून ते साहित्य, संगीत, नृत्यासारख्या कला आणि समाजकार्यासारख्या गोष्टींना प्राधान्य देऊन आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत भारतातच राहिले! अनेक परकीयांनी भारतातील विविध स्थानिक भाषांमध्ये पांडित्य मिळवून साहित्य क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करून ठेवलीय.

भारतीय द्वीपकल्पात आलेल्या परकीयांपैकी दोन हजार वर्षांपूर्वी आलेल्या शक आणि कुषाण तसेच इंडोग्रीक राज्यकर्त्यांनीच प्रथम संस्कृत आणि पाली भाषांचा अभ्यास करून त्यांना राजभाषांचा दर्जा दिला. त्यांच्यापैकी शकराजा रुद्रदामन आणि कुषाणराजा कनिष्क हे तर संस्कृत पंडित म्हणूनही विख्यात झाले. त्यांनी संस्कृतात ग्रंथनिर्मितीही केली. ‘गिरनार लेख’ या नावाने प्रसिद्ध असलेले, जुनागढ येथे सापडलेले शिलालेख हे शकराजांनीच संस्कृतमध्ये तयार केले. हे शिलालेख उच्च दर्जाच्या संस्कृत भाषेतले लेख म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

भारतीय भाषेचा व्यवस्थित अभ्यास करून त्या भाषेत अस्खलित संभाषण आणि लिखाण करणारा पहिला युरोपियन म्हणून दुआत्रे बारबोसा या पोर्तुगीज माणसाचा नामनिर्देश करावा लागेल. १५०० साली त्याने भारताची तिसरी सागरी मोहीम काढली. त्यातून केरळाच्या किनारपट्टीत नोकरीसाठी आला. पहिली १५ वष्रे त्याने कोचीन येथील पोर्तुगीजांच्या वखारीत नोकरी केली. या काळात त्याने केरळातील प्रचलित मल्याळम भाषा उत्तम रीतीने शिकून त्या भाषेत लिखाण आणि संभाषण सुरू केले. दुआत्रेला भारतीय प्रदेशातल्या जीवनशैलीतली, भाषांमधली विविधता यांच्याबद्दल इतकी नवलाई वाटली की त्याने त्याच्या नोकरीची जागा अनेक वेळा बदलून गुजरात, बंगाल, तमिळनाडूत वास्तव्य केले. प्रत्येक ठिकाणी राहताना त्याने तिथल्या स्थानिक लोकांप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा आणि काही परंपरा स्वीकारून नवनवीन अनुभव घेतले आणि लिहिले. दुआत्रेने लिहिलेल्या पुस्तकांची युरोपियन भाषांमध्ये भाषांतरे झाली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on February 12, 2018 12:08 am

Web Title: duarte barbosa