हल्ली शाळांमध्ये प्रोजेक्टरद्वारा शिकवलं जातं. शाळेमध्ये ई-लìनगचा किमान एक वर्ग असतोच. वर्गातच मोठा स्क्रीन असतो. त्यावर गाणी, गोष्टी दाखवता येतात. यामध्ये बालभारतीतले धडे-कविता-गणित-परिसर-विज्ञान-इतिहास या सर्वाशी संबंधित चित्रं, आकृत्या, व्हिडीओज् दाखवू शकतात किंवा शिक्षकाच्या मोबाइलवर असलेला एखादा व्हिडीओ, भाषणं असं काहीही मुलांना दाखवायचं असल्यास ते सहजरीतीने साध्य होतं. मुलांना वेगवेगळे प्रयोग प्रत्यक्ष बघता येतात. एखादी ताजी बातमीदेखील इंटरनेट जोडणीमुळे मुलांपर्यंत पोहोचवता येते. मुलांना हे स्क्रीन-शिक्षण अतिशय आवडतं हे तर प्रत्यक्षच दिसतं आहे.

सरकारी धोरणंही ई-लìनगला अनुकूल आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या डोक्यावरील भार काही अंशी उतरतो. ज्ञानरचनावादात शिक्षकानं मदतनीसाच्या भूमिकेत जायचं आहे, त्यासाठी हे पूरक आहे.

पारंपरिक वर्गात- शिक्षक शिकवतात म्हणजे हातात पुस्तक घेऊन बोलतात, मुलं ऐकतात. ते फळ्यावर लिहून देतात, मुलं लिहून घेतात. ते प्रश्न विचारतात, मुलं उत्तरं देतात. ज्या मुलांचं लक्ष आहे, त्यांना समजतं आहे. ज्या मुलांचं लक्ष नाही, विषयाचा कंटाळा आलेला आहे त्यांना काही समजत नाही, असं सर्वसाधारणपणे दिसतं.

जेव्हा अशा पद्धतीनं घडामोडी चालू असतात, तेव्हा मेंदूत प्राधान्यानं डाव्या गोलार्धात काम सुरू असतं. कारण डाव्या भागात भाषेचं केंद्र आहे. ऐकणं, बोलणं, आकलन, ठरावीक शब्दांत, ठरावीक पद्धतीने उत्तर देणं, लिहून घेणं, विश्लेषण  ही डाव्या गोलार्धाची कामं. अशा वेळी उजव्या गोलार्धातल्या क्षेत्रांना उद्दीपन मिळेलच असं नाही.

आता हाच पाठ ई-लìनग क्लासरूममध्ये चालू असेल तर मेंदूच्या केवळ डाव्याच नाही तर उजव्या भागातही उद्दीपन चालू होईल. मेंदूचा जास्तीत जास्त भाग वापरला जाईल. कारण उजव्या भागामध्ये रंग, चित्र, कल्पना, अभिनय, संगीत, भावना याचं काम चालतं. त्यामुळे मुलांचं लक्ष जास्त प्रमाणात स्क्रीनकडे जाईल, आकलन होईल. मात्र, स्क्रीनशिक्षणाचा मर्यादित वापर केला तर योग्य आहे. कारण स्वत:च्या हाताने प्रयोग करणं, चित्र-आकृत्या काढणं याला पर्याय नाही.

– श्रुती पानसे

contact@shrutipanse.com