29 May 2020

News Flash

कुतूहल : पर्यावरण रक्षणाची त्रिसूत्री   

सुरुवातीला आपण पेडल मारून सायकल चालवितो. मग आराम मिळावा म्हणून मोटारबाइक किंवा स्कूटर वापरतो.

पहिले सूत्र : अर्धवट ज्ञान धोकादायक असते.

पर्यावरण हा आता जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे, तेव्हा त्यासंबंधीची सखोल माहिती मिळवायला हवी. सद्य:स्थितीत पृथ्वीचे वातावरण तापविणारे हरितगृह वायू म्हणजे काय, त्यांची निर्मिती कशी होते, कर्बउत्सर्जन म्हणजे काय, जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असणारे घटक कोणते, आदी कळीच्या पर्यावरणीय प्रश्नांबद्दल माहिती आपल्याला हवीच. नसेल, तर त्याबद्दल जाणून घ्यायला हवे.

दुसरे सूत्र : सर्व काही स्वत:पासून सुरू होते.

देऊळ किंवा बाजार पाच ते दहा मिनिटांच्या पायी अंतरावर असते. तिथे जाण्यासाठी आपण दुचाकी वा मोटारगाडय़ा वापरतो. खर्चीक इंधनावर नाहक पसा उधळतो. इंधने जाळून हवा प्रदूषित करतो. मोकळ्या हवेला नि चालण्यासारख्या व्यायामाला मुकतो. अशा वेळी वाहने आपण उपयुक्ततेसाठी बाळगतो की खोटय़ा प्रतिष्ठेसाठी, याचा विचार व्हायला हवा. ‘ट्रॅफिक-सेन्स’ न बाळगण्याची वृत्ती किंवा जितक्या वेगात वाहने हाकू तेवढे पेट्रोल-डिझेल कमी संपते असे काही गैरसमजही आहेतच.

मात्र, सायकलचा आपल्या जीवनचक्राशी (लाइफ सायकल) कसा संबंध असतो, बघा.. सुरुवातीला आपण पेडल मारून सायकल चालवितो. मग आराम मिळावा म्हणून मोटारबाइक किंवा स्कूटर वापरतो. त्यानंतर चंगळवादाचा दंश म्हणा किंवा गरज म्हणा, आपण चारचाकी वाहन वापरू लागतो. त्यामुळे मिळणाऱ्या ऐषआरामातून आपले शरीर स्थूल होते, पोट सुटते. ते कमी करण्यासाठी आपण जीममध्ये जातो. तिथे पुन्हा आपल्याला सायकल चालवायला लावतात!

तिसरे सूत्र : विचार वैश्विक, पण कृती स्थानिक.

जागतिक पातळीवर संवेदनशील धोरणकर्ते, पर्यावरण अभ्यासक-कार्यकर्ते, ग्रेटा थनबर्गसारखे लहानगे निसर्गाच्या हितासाठी झटत असताना, आम्ही सामान्य जणांनी आपल्या परिसरातील निसर्ग स्वच्छ राखण्यासाठी, आपल्या आजूबाजूचे निसर्गस्रोत शाबूत राखण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. प्लास्टिकचे जैवविघटन जलद गतीने होत नसते. परिसरात पडलेला कागद १५ दिवसांनी नष्ट होतो. धातूचा डबा दोन-तीन महिन्यांत गंजू शकतो; पण प्लास्टिकचे विघटन व्हायला सुमारे दीडशे वर्षे लागतात आणि तोपर्यंत ते पाण्याचा व जमिनीचा कस बिघडवीत परिसरात पडून राहते. प्लास्टिक हे पृथ्वी व्यापणारे वामनाचे चौथे पाऊल ठरले, तसेच कार्बन-वायू पाचवे पाऊल ठरत आहे, हे इथे लक्षात घ्यावयाचे आहे.

– जोसेफ तुस्कानो

मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 4:41 am

Web Title: environmental protection environmental conservation zws 70
Next Stories
1 मनोवेध : अस्तित्ववाद
2 मनोवेध : प्रेरणा
3 कुतूहल : चला, निसर्गाकडे..
Just Now!
X