शेतजमिनीचा अकृषिक (शेतीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी) वापर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येत नाही. ते बेकायदा कृत्य ठरते आणि त्यासाठी व्यक्ती दंडास पात्र ठरते. शेतजमिनीचा अकृषिक वापर पुढील कारणांसाठी करता येतो : (१) वास्तव्यासाठी  (४) औद्योगिक कारणांसाठी (३) व्यापारी कारणांसाठी  आणि (४) अन्य अकृषक कारणांसाठी.
एका विशिष्ट वापरासाठी पूर्वी अकृषिक परवाना मिळाला असल्यास त्या जमिनीचा वापर दुसऱ्या प्रकारच्या अकृषिक वापरासाठी नवीन अकृषिक परवाना घ्यावा लागतो.
सार्वजनिक कार्यासाठी वापरात येणारी जमीन शासन अध्यादेश काढून अकृषिक परवानामुक्त करु शकते. अशावेळी या जमिनींना अकृषिक कर व तरतुदी लागू होत नाहीत.
शेतजमिनीच्या अकृषिक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे करावयाच्या अर्जासोबत जरुरी कागदपत्रे, पुरवण्या, परवानग्या जोडाव्या लागतात. अर्ज केल्यापासून ९० दिवसांच्या मुदतीत जिल्हाधिकारी अकृषिक परवाना देऊ शकतात.
९० दिवसांच्या कालावधीत दाखल केलेल्या अर्जावर सूचना, सुनावणी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रकरण मंजूर, नामंजूर यासंबंधी पत्रव्यवहार झाला नाही, तर अकृषिक परवाना मंजूर झाला, असे ग्राह्य धरले जाते.
अकृषिक परवाना मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत परवानाधारकाने आदेशात दिलेली जमीन रूपांतराची किंमत आणि अकृषिक कर संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात भरावयाचे असतात. त्यानंतर प्रतिवर्षी शासनाने ठरवून दिलेला अकृषिक कर भरावा लागतो. साधारणपणे शेतजमिनीची रूपांतर किंमत अकृषिक कराच्या पाचपट असते.
शेतजमिनीचा विनापरवाना अकृषिक वापर केल्यास रूपांतर किंमतीबरोबरच अकृषिक कराच्या ४० पट इतकी रक्कम दंड म्हणून भरावी लागते. अन्यथा विनापरवाना केलेले बांधकाम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तोडले जाऊ शकते.
 निवासी, वाणिज्य, औद्योगिक अशा अकृषिक वापरासाठी वेगवेगळी करआकारणी असते.
अकृषिक करात प्रतिवर्षी वाढ होऊ शकते. अकृषिक आदेश झाल्यापासून तीन वर्षांच्या आत विकासकार्य पूर्ण करावे लागते. काही कारणांमुळे तसे होऊ न शकल्यास पुढील मुदतवाढीसाठी परवान्याचे नूतनीकरण करून घेणे हिताचे असते.
-भरत कुलकर्णी (पुणे)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – गणित
भावनेचा यत्किंचितही स्पर्श नसलेले, स्वयंसिद्ध, उदात्त, निष्कलंक, आदिम आणि निसर्गात तटस्थपणे उपस्थित असलेले जे शास्त्र ते गणित, असे म्हटले जाते. एकलत्वात, ब्रह्मात किंवा ज्याला Singularity  म्हणतात, त्यात ते दबा धरून असावे; परंतु स्फोटाच्या प्रक्रियेनंतर ऊर्जेचे तरंग आणि होऊ घातलेली वस्तू याची समीकरणे गणिताचीच असतात. हे विश्व जरी स्थिर स्थितीत आहे असे गृहीत धरले तरी त्या विश्वातल्या गोष्टींचे संबंध गणितातच मांडावे लागतात. सूर्यातून निघालेली पृथ्वी काय वेगाने निघाली, तिची सूर्याभोवतीची फेरी वर्तुळात्मक नव्हे तर लंबवर्तुळात्मक आहे. ती थंड होण्याचा क्रम, ती थंड झाल्यावर होणाऱ्या घडामोडी, तिच्यावरून दिसणारी ग्रहणे, एवढेच नव्हे तर तिच्या शेजारून जाणाऱ्या सूर्यप्रकाशाला त्या पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण वाकविते, या सर्व गोष्टींचा आधार गणित असते. पृथ्वीवरच्या आजच्या परिस्थितीच्या निरीक्षणावरून तिचा इतिहास जोखण्याचे किंवा मोजण्याचे जे शास्त्र आहे त्याला गणिताची मदत घ्यावी लागते.
ऊर्जा ‘ती’ असते, पदार्थ ‘तो’ असतो, गणित मात्र ‘ते’ असते. ते अलिप्त असते. तुम्ही गणिताची मदत घेतलीत तर ते तुम्हाला मदत करते, नाहीतर गप्प बसते. तुम्ही काढलेल्या प्रत्येक आकृतीला गणित असते. शरीराच्या आकाराचे, हातपाय किती लांब, चेहऱ्यावरच्या इंद्रियांचे प्रमाण यातही गणित असते. हृदयाच्या ठोक्यांचा प्रभाव, त्यानंतर रक्ताभिसरण होत असताना धमन्यांच्या लवचिकतेवर ठरणारा रक्तदाब गणितात मोजतात, तेच वाफेवर चालणाऱ्या यंत्राबद्दल म्हणता येईल. पेशींमध्ये जनुके असतात. त्यातले अणू-रेणू पिढय़ांपिढय़ा बदल न होता एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात हे त्यांचे स्थैर्य किंवा पुढे त्यांच्यात होणाऱ्या बदलाच्या ऊर्जेचा हिशेब गणिताने मांडून सिद्ध करता येतो.  ज्याला अस्तित्व नाही, अशा शून्याचा (किंवा अभावाचा) अंतर्भाव गणितातच होऊ शकतो आणि मग या दोन अस्तित्वहीन गोष्टी अनेक पराक्रम करतात. जोवर तुम्ही गणिताचे नियम मोडत नाही, तोवर गणित आणि त्यातल्या आकडय़ांसाठी चिन्हाचा वापर करणे गणिताला मान्य असते. शून्याच्या प्रवेशाने द्विमूळ पद्धत अस्तित्वात येते, त्यामुळे अगणित अंक लिहिण्यास गणित परवानगी देते.
ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे, त्यात हिशेब मांडताना दोन्ही बाजूंची आकडेमोड झाल्यावर ते आकडे संपूर्णपणे एकमेकाला छेद देतात आणि शून्य उरते, असे उदाहरण दिले आहे. विश्वातल्या ऊर्जेच्या समतुल्यतेचे हे उदाहरण मोठे प्रभावी आहे. अर्थात ज्ञानेश्वरांवरच्या प्रेमापोटी केलेले हे विधान भावनाशून्य गणिताला (किंवा गणितज्ञांना) मान्य नसणार.
 असो, मी गणितात ढ आहे, पण एखादी सुंदरी दिसली आणि मिळणार नसली तरी तिच्यावर प्रेम करायला काय हरकत असावी? उद्या संगीताबद्दल.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर

वॉर अँड पीस- वंध्यत्व स्त्रीविचार : भाग – १
गेली १५-२० वर्षे शहरात व ग्रामीण भागात विवाहित स्त्रियांच्या जीवनात प्रचंड उलथापालथ झालेली दिसते. त्यामुळे त्यांच्या शरीरावर, स्वास्थ्यावर दुष्परिणाम झालेले आढळतात. काहींच्या गर्भाशयाची वाढ अपुरी असते. आयुर्वेदीय परीभाषेत अशा गर्भाशयाला सूचिमुख योनी असे संबोधितात. काहींच्या गर्भाशयाचे वर्णन ‘बल्की युट्रस’ असे केले जाते. काहींच्या बीजवाहिनीवर गाठी-सिस्ट वा पीसीओडी असे परीक्षण अहवाल सांगतात. काही महिलांची पाळी अनियमित असते. काहींना अत्यार्तव ही समस्या असते. एकदा पाळी सुरू झाली की ती दोन-तीन आठवडे चालू राहते. अशांचे रक्ताचे प्रमाण खूपच कमी असते.
ज्या महिलेची मासिक पाळी चार दिवस व्यवस्थित असते, जिचे रक्ताचे प्रमाण पुरेसे असते व पतीराजांमध्ये काहीही दोष नसतो. अशांना गर्भधारणा राहण्यात काहीच अडचण येऊ नये, असे सर्वच वैद्यकीय शास्त्रे सांगतात. आयुर्वेदीय थोर ग्रंथामध्ये आपल्या सृष्टीतील वनस्पती जीवनाचा मोठा दृष्टांत ऋषीमुनींनी देऊन ठेवलेला आहे. ‘आपल्या शेतात धान्याचे वेळेवर व उत्तम पीक येण्याकरता चार गोष्टींची नितांत गरज असते. उत्तम, सकस जमीन, पुरेसे पाणी, योग्य ऋतू व हवामान आणि उत्तम बीज.’ याच सृष्टीनियमाप्रमाणे तुम्हा-आम्हाला उत्तम अपत्यप्राप्ती वेळेवर व्हावयास हवी असेल तर पुरुषांचे वीर्य, शुक्राणू पुरेसे व र्निजतुक असावयास हवे. त्याचे रोपण होण्याकरिता योग्य भूमी म्हणजे स्त्रीचा गर्भाशय निरोगी, सक्षम व पुरेशा वाढीचा असायला हवा. स्त्री-पुरुषांचा समागम योग्य वातावरण व ऋतुमानात व्हावयास हवा.
पांडुता ही सामान्य स्त्री समस्या सोडविण्याकरिता चंद्रप्रभा, शृंगभस्म, सुवर्णमाक्षिकादिवटी, पुष्टीवटी, आम्लपित्तवटी यांची मदत घ्यावी. भोजनोत्तर अश्वगंधारिष्ट घ्यावे. रात्रौ आस्कंदचूर्ण व गरज पडल्यास निद्राकरवटी अशी औषधयोजना किमान दीड ते दोन महिने घ्यावी. शक्यतो जागरण, उशिरा जेवण, बाहेरची जेवणे टाळावी. शुभं भवतु!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २२ ऑक्टोबर
१८७९> डॉ. वामन दामोदर गाडगीळ यांचा जन्म. तत्कालीन समाजाच्या समस्यांची जाणीव करून देणारे लिखाण त्यांनी केले. ‘विचित्र समाज’, ‘चंपी’, ‘मोठय़ा मुलींच्या लग्नाच्या चटकदार कथा’ या त्यांच्या कथा, तर ‘मराठवाडय़ातील गद्यविहार’ या पुस्तकात त्यांनी २३ लेखकांचे गद्य वेचे संपादित केले.
१८९४> संस्कृत संवर्धनासाठी ‘आनंदाश्रम’ ही संस्था स्थापणारे महादेव चिमणाजी आपटे यांचे निधन. कालिदासाच्या शाकुंतलाचे मराठी रूपांतर त्यांनी ‘मौजेच्या चार घटिका’ असे केले होते.
१९६८> ग्रंथपालन व ग्रंथालयशास्त्र या विषयांवरील एक अभ्यासू लेखक रघुनाथ शतानंद पारखी यांचे निधन. ग्रंथपालनाची तोंडओळख, प्रिन्सिपल्स ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन ही त्यांची महत्त्वाची पुस्तके.
१९९४> मराठी कादंबरीवर बराच काळ ठसा उमटविणारे नारायण सीताराम फडके. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्या मात्र ‘कलावादी’- रंजनपर, प्रणयरम्य, नाटय़मय असत. दौलत, अटकेपार या गाजलेल्या कादंबऱ्यांसह पत्री सरकारवर ‘झंझावात’, काश्मीरवर ‘जेद्दमल’ गोवामुक्तीवर ‘उजाडले, पण सूर्य कोठे आहे’ अशा कादंबऱ्यांचे प्रयोगही त्यांनी केले होते. मराठी लघुनिबंध फडकेंमुळे सशक्त झाला.
– संजय वझरेकर