19 June 2019

News Flash

कुतूहल – मातीविना शेती

शेतातील पिके जमिनीवर उभ्या किंवा रांगत्या स्थितीत वाढताना दिसतात. त्यांची मुळे मात्र दिसत नाहीत, कारण ती मातीत रुतलेली असतात. माती पिकांच्या मुळांना आधार देते. त्याचबरोबर

| March 15, 2013 05:26 am

शेतातील पिके जमिनीवर उभ्या किंवा रांगत्या स्थितीत वाढताना दिसतात. त्यांची मुळे मात्र दिसत नाहीत, कारण ती मातीत रुतलेली असतात. माती पिकांच्या मुळांना आधार देते. त्याचबरोबर वनस्पतींना आणि त्यांच्या मुळांना वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण व आवश्यक अन्नद्रव्ये पुरविते. पण हे घटक इतर कुठून मिळाले तर वनस्पती मातीशिवायही वाढू शकते. असे मातीविना वनस्पतींच्या वाढीचे तंत्र १९३० साली विकसित झाले. त्यास  ‘हायड्रोपोनिक्स’ म्हणतात. हायड्रोपोनिक्स हा शब्दप्रयोग ग्रीक भाषेतील आहे. त्याचा अर्थ ‘पाण्याला काम करू द्या’ असा होतो.
मातीशिवाय शेतीचे तंत्र प्रामुख्याने हरितगृहात वापरले जाते. या तंत्रपद्धतीमुळे जेथे जमीन नाही तेथेदेखील शेती करता येते. नारळांच्या काथ्यापासून दोरी आणि तत्सम उद्योग बनविण्याच्या उद्योगातील कोकोपीट हा एक टाकाऊ घटक. या कोकोपीटच्या माध्यमात मुळांची चांगली वाढ होते. या पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा ठिबक सिंचनाने केला जातो. त्यास फर्टगेशिंन म्हणतात. यासाठी पाण्यात विद्राव्य रासायनिक क्षार वापरले जातात. पिकाचे रोगापासून रक्षण व्हावे म्हणून बुरशीनाशके फवारली जातात. हरितगृहातील आद्र्रतेचे व प्रकाशाचे नियंत्रण केले जाते. प्रामुख्याने फुलझाडे, विलायती भाज्या, कुंडय़ांतील शोभेची झाडे इत्यादींची लागवड करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो.
 बाजारपेठेच्या गरजेप्रमाणे अशी मातीविना शेती केली तर ती फायदेशीर होऊ शकते. शहरात गच्ची, बाल्कनीचा वापर करूनही अशी शेती करता येते. झाडे वाढविण्यासाठी मुळांना आधार व पोषक वातावरण मिळावे, म्हणून रसवंतीमधील ऊसाची टाकाऊ चिपाडे, नारळांच्या शहाळ्यांचे कवच इत्यादींचे बारीक तुकडे करून वापर करता येतो. हे बारीक तुकडे मोठय़ा कुंडय़ा, वाया गेलेली पिंपे यांमध्ये भरली असता झाडे वाढू शकतात. रासायनिक विद्राव्य क्षार पिकांचे अन्न म्हणून वापरता येतात. अशा पद्धतीने आपणास रोज लागणाऱ्या फळे आणि पालेभाज्या जसे, दुधी, दोडका, कारली, पालक, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो, वांगी इत्यादींची लागवड सहज होऊ शकते. ही उत्पादने रोगमुक्त व विषारी औषधांचा वापर न करता घेतलेली असतात.

जे देखे रवी.. – तोंडओळख
ज्या उद्वाहकाचे (लिफ्ट) दरवाजे बंद करावे लागतात त्यातून तडक बाहेर पडणे आणि जी मंडळी अजून उद्वाहकात आहेत त्यांनी दरवाजा बंद करावा असे वाटणे हे स्वमग्नतेचे लक्षण आहे. उद्वाहकात माणसे मिनिटभरच भेटतात; परंतु तरीसुद्धा त्या काळात त्यांच्यात एक अनुबंध असतो हे माणसे विसरतात. हेच लोण कुटुंबातही पसरते. प्रत्येकाने आपला सवता सुभा मांडण्याचा आता घाट घातला आहे. प्रेम किंवा मैत्री या गोष्टी उत्स्फूर्तपणे घडत असल्या तरी त्या गोष्टी टिकवण्यासाठी मेहनत आणि गुंतवणूक दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. काळाच्या ओघात माणसे भेटतात. पण मैत्री मात्र टिकवावी लागते आणि सुख-दु:खाची देवाणघेवाण ही गोष्ट स्पर्श, संभाषण, दृष्टी या संवेदनात्मक गोष्टींतूनच होऊ शकते. भावनांचे योग्य पोषण हे मानवी जीवनाचे एक फार महत्त्वाचे अंग आहे. एकदा इंग्लंडला गेलो असताना एक प्लास्टिक सर्जन जवळ आला आणि म्हणाला, एवढे सगळे तुमचे वाचले, पण हा माणूस कसा दिसत असेल याबद्दल मनात कुतूहल होते. आता तुमच्या लिखाणामागचा चेहरा दिसला. आता उलटे झाले आहे. चेहरे दिसतात आणि मैत्री जमवण्याचा प्रयत्न केला जातो. पण मैत्रीमध्ये गुंतवणूक होत नाही. अनेक ओळखी करून घेणे, पण आपण मात्र निराळे राहणे असा कल वाढत आहे. याने भावनिक पोषण होणे अशक्य आहे. उलट उपासमार होण्याची भीतीच अधिक. एवढेच नव्हे तर या फेसबुकवरच्या मायावी जगात अपेक्षाभंग आणि त्यातून निर्माण होणारे नैराश्य याने माणसे वेडीपिशी होतात आणि नैराश्येच्या गर्तेत स्वत:ला किंवा समाजाला जबर अपाय करतात.
अशी अनेक उदाहरणे दररोज वर्तमानपत्रांतून झळकत आहेत. मैत्रीपूर्ण देवाणघेवाण करायला स्वार्थी मन नाही म्हणते आणि एकटेपण तर सहन करता येत नाही, अशा दुहेरी कात्रीत आधुनिक व्यक्ती सापडल्या आहेत. आधीच असे म्हणतात की, हे जग माया आहे. कारण इथले काही टिकत नाही. त्यातच ही फेसबुकची माया. माया शब्दही मायाळू आहे. आईची असते ती मायाच असते. म्हणून ती माय असते. मुलाची होणारी बायको जर आवडत नसेल तर काय मेलीने माझ्या मुलावर मोहिनी घातली असे आई म्हणते तेही मायाजालच असते आणि एक ना अनेक कुलंगडी करत त्याने बऱ्यापैकी माया जमवली आहे असेही म्हटले जाते.
जग नावाच्या मायेचा सामना करताना दमछाक होते, म्हणून फेसबुक नावाची प्रतिसृष्टी तयार करून हा प्रश्न सुटणार तर नाहीच, पण अधिक गुंतवणुकीचा होणार आहे. म्या म्हाताऱ्याचे हे अरण्यरुदन(!) पण एक गोष्ट मला पक्की ठाऊक आहे. काही काही मूलभूत गोष्टी तंत्रज्ञान बदलू शकणार नाही. त्यासाठी निराळे नवे जनावर जन्माला यावे लागेल किंवा येऊ घातले आहे.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस    – दमा- भाग २
दम्याच्या रुग्णाचे नातेवाईक, रुग्णाची दम्याची अवस्था पाहून दमतात. औषधे देणारे डॉक्टर, वैद्य ‘वारंवार दमेकऱ्याच्या कथा ऐकून कंटाळतात. वैद्यक व्यवसायात शास्त्रकारांनी रुग्णाबद्दल ‘कणव’ असली पाहिजे, नेहमी रुग्णहित जोपासले पाहिजे असा सांगावा दिला आहे. त्यामुळे माझ्यासारख्या वैद्यांना आयुर्वेदीय औषधी महासागरातील अनेकानेक औषधांमधील, वैद्यकीय व्यावसायिकांच्या वापरातील दोन खूप प्रसिद्धी पावलेली औषधे नाकारावीशी वाटली. दै. ‘लोकसत्ते’च्या सुजाण नागरिकांकरिता माझे मत मी प्रांजळपणे मांडत आहे. काही वैद्यक व्यावसायिक ‘कनकासव’ या औषधाचा सर्रास वापर रुग्णांना सुचवतात. कनक म्हणजे धोतरा, याच्या पंचांगापासून तयार केलेले आसव मानवी शरीरावर विशेषत: डोळय़ांवर दुष्परिणाम करू शकते. अत्ययिक अवस्थेत, म्हातारपणी तात्पुरता म्हणून एक वेळ कनकासवाचा वापर क्षम्य आहे. लहान बालके, तरुण रुग्ण यांनी कनकासव घेणे हा ‘गुन्हा’ आहे. सोमासव या औषधातील सोम ही वनस्पती संदिग्ध आहे. वेदकाली सोमरसाचे प्राशन ऋषिमुनी करायचे. तशी वनस्पती आज मिळत नाही. सोम नावाने वापरली जाणारी वनस्पती शेरासारख्या नुसत्या काडय़ा आहेत हे माहीत असावे.
माझे वडील त्यांच्याकडे येणाऱ्या दमेकरी रुग्णांना सुंठ, मिरे, पिंपळी, लवंग, दालचिनी मिश्रणाच्या गोळय़ा देत. सताब या वनस्पतीपासून तयार केलेला सतापा काढा देत. माझ्या पंचेचाळीस वर्षांच्या चिकित्साकालात नवनवीन औषधे दम्याकरिता शोधावी व वापरावी लागली. सर्व प्रभावी औषधे ही उत्तम सुगंधाची असतात. प्रत्येकी व्यक्तीला स्वत:ची व्हेवलेन्थ किंवा फ्रिक्वेन्सी असते. तसाच प्रत्येक वनस्पतीला स्वत:चा एक विशिष्ट गंध असतो. ओली हळद, कोरफड, कडू जिरे यांना एक विशिष्ट गंध आहे. या तीन वनस्पतींच्या मिश्रणाच्या गोळय़ा वर्षांनुवर्षे रजन्यादि वटी म्हणून मी दमेकऱ्यांकरिता वापरतो. त्यांना तुरंत आराम मिळतो. हा पाठ खूप वर्षांपूर्वी सुचवणाऱ्या वृद्ध वैद्य पवार यांच्या ऋणात मी निरंतर आहे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   –   १५ मार्च
१८३१ > रखमाजी देवजी मुळे यांनी नवीन संवत्सराचे संपूर्ण पंचांग तयार केले.. ही छापील पंचांगांची सुरुवात होती!
१८६५ > ‘मुंबईचे वर्णन’ हा ग्रंथ (१८६३) लिहिणारे निबंधकार, नाटककार गोविंद नारायण माडगावकर यांचे  निधन. मराठी भाषेत सर्वसंग्रह नावाचा एक ग्रंथ असावा (इंग्रजीत ज्याला ‘सायक्लोपीडिया’ म्हणतात, तसा) अशी कल्पना त्यांनी मांडली होती आणि ‘सृष्टीतील चमत्कार’, ‘उदभिज्जन्य पदार्थ’ , ‘लोखंडी सडकांचे चमत्कार ’आदी पुस्तके लिहून त्यादृष्टीने कामही केले होते.  त्यांचा पिंड सुलभ, बोधप्रद लेखनाचा होता.
१८९९ > ‘विविधज्ञानविस्तार’चे संपादक, समीक्षक, निबंधकार हरि माधव पंडित यांचे निधन.
१९३४ > लेखक, कवी व ‘प्रतिष्ठान’चे काही काळ संपादक असलेले प्रा. गजानन नारायण माळी यांच जन्म. ‘गंधवेणा’ या काव्यसंग्रहानंतर, मराठवाडय़ात विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या अनुभवातून त्यांनी ‘नागफणा आणि सूर्य’ हे दीर्घकाव्य लिहिलल्े  कामायनी (कादंबरी), कल्पद्रुमाची डहाळी ( नाटक) आणि ‘प्राचीन आख्यानक कविता(संकलन) आदी साहित्य त्यांच्या नावावर आहे.
– संजय वझरेकर

First Published on March 15, 2013 5:26 am

Web Title: farming without soil
टॅग Khuthul,Navneet,Navnit