माझ्यासोबत वनस्पती निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी जमलेल्या मंडळींमध्ये कुजबुज चालली होती, शेवटी एकाने प्रश्न विचारला उंबराच्या झाडाला फूल येते? उंबराचे फळ सर्वानीच पाहिले आहे. हो ना, मग फुलाशिवाय फळ कसे येईल? मी उत्तर द्यायला सुरुवात केली- वड, िपपळ, उंबर आणि अंजीर हे वृक्ष लॅटीनमधील फायकस या प्रजातीतील विविध जातींत मोडतात. वरील सर्व वृक्षांना साधारण लंबगोलाकार आकाराची हिरवी पुष्पगुच्छे असतात. नंतर त्याची पिवळसर फळे होतात, पिकल्यावर लालसर होतात. या सर्व फळांची अंतर्रचना वैशिष्टय़पूर्ण असते. देठाच्या विरुद्ध गोलभागावर छिद्र असते. फळाच्या आत मध्यभागी पोकळी असते. आणि याच पोकळीत पुंकेसर आणि स्त्रीकेसर असलेल्या फुलांची मांडणी असते. फळावरील छिद्रातून एका जातीची माशी (वास्प) आत शिरते आणि अन्नाच्या शोधात फळाच्या पोकळीत वावरत असते. असे करीत असताना कीटकाद्वारे पुंकेसरावरील परागकण स्त्रीकेसरावर विखुरले जातात आणि परागण होते. नंतर फलनाची क्रिया होते. आणि क्रिया पूर्ण झाल्यावर कालांतराने या पुष्पगुच्छाचे फळात रूपांतर होते. आणि त्याच्या पोकळीत बीजधारणा होते. म्हणूनच लंबगोल आकाराचे उंबर तसेच वड, िपपळ व अंजिराचे फळ जे लौकिक अर्थाने फुलासारखे दिसत नाही, ते बीज धारणेपूर्वी फूल असते आणि बीज तयार झाल्यावर फळ होते. आता आपल्या लक्षात आले असेलच उंबराचे फूल आणि फळ सारखेच असतात. या पुढे आपल्याला कोणी विचारले की उंबराचे फूल बघितले का तर हो म्हणून सांगा.

याच संवादाच्या ओघात मी त्यांना प्रश्न विचारला, वड, िपपळ, उंबर या वृक्षाची फळे पिकल्यावर असंख्य बीजे खाली पडतात. खाली जर योग्य प्रकारची जमीन असली तरी जमिनीवर या वृक्षांची रोपे तयार झालेली बघितली आहेत का? पुन्हा स्तब्धता. या सर्व वृक्षांची फळे पक्षी आवडीने खातात. पक्ष्यांच्या विष्ठेतून ही बीजे जेव्हा बाहेर पडतात तेव्हाच रुजण्यायोग्य होतात. आणि म्हणूनच ज्या ज्या जागी पक्ष्यांची विष्ठा पडते त्या जागी आपणास वड, िपपळ, उंबराचे रोप उगवल्याचे आढळते. निसर्गातील सर्व घटकांचे एकमेकांशी अतूट संबंध असतात. निसर्ग साखळीतील एखादा घटक जरी नाहीसा झाला तर त्याचा परिणाम इतर घटकांवर झाल्याशिवाय राहात नाही.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

लिओ टॉलस्टॉय

‘वॉर अँड  पीस’ (मूळ रशियन नाव ‘व्होयना इमिर’) या विख्यात कादंबरीचे लेखक म्हणून ओळख असलेल्या काऊंट लेव्ह निकोलायेविच टॉलस्टॉय यांचा जन्म १८२८ साली मॉस्कोशेजारच्या पोल्याना या त्यांच्या वडिलांच्या शेतवस्तीवर झाला. एका धनाढय़, बढय़ा जमीनदाराचे पुत्र लिओ ऊर्फ ल्येव प्रथम रशियन सन्यात नोकरीस लागले; परंतु मद्य, जुगार, स्त्री सहवास असा विलासी जीवनक्रम असलेल्या तरुण लिओला दैनंदिनी लिहिण्याची सवय होती. रशियाच्या फ्रान्स आणि इंग्लंडबरोबर झालेल्या युद्धकाळातलं सनिकी जीवनावरचं लिओचे छोटे पुस्तक ही त्यांची पहिली साहित्यकृती. १८६० साली पॅरिसमध्ये त्यांनी एका माणसाला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाताना प्रत्यक्ष पाहिले. त्याच काळात एका बौद्ध लामाशी परिचय होऊन बौद्ध तत्त्वज्ञानाशी त्यांचा परिचय झाला. या सर्वाचा त्यांच्यावर परिणाम होऊन त्यांच्या वृत्तीत झपाटय़ाने बदल झाला. सन्यातली नोकरी सोडून त्यांनी राजेशाही आयुष्याचा त्याग केला आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची राहणी, पोशाख, जीवनपद्धती स्वीकारली. व्रतस्थ, स्वावलंबी जीवनशैली स्वीकारताना स्वत:चे कपडे शिवणे, झाडलोट वगरे स्वत: करू लागले. साहित्यनिर्मितीवर अर्थार्जन करून दारू, तंबाखू, मांसाहार अशा चनीच्या सवयींचा पूर्ण त्याग त्यांनी केला. लिओंच्या साहित्यनिर्मितीपकी ‘वॉर अँड पीस’, ‘अ‍ॅना कॅरेनिना’ आणि ‘वस्क्रिसेनिये’ या तीन कादंबऱ्या जगभरात आणि रशियातही खूप लोकप्रिय झाल्या. त्यांच्यावर आधारित चित्रपटही निघाले. वर उल्लेख केलेल्या तीन कादंबऱ्यांव्यतिरिक्त ‘अल्बर्ट’, ‘द कन्फेशन’ वगरे कथासंग्रह आणि कादंबऱ्या, ७ नाटके, ३२ लघुकथासंग्रह, ८ स्फुट लेख, ६ निबंध अशी लिओ टॉलस्टॉय यांची साहित्यसंपदा आहे. लिओंच्या लहानपणी रशियाची परिस्थिती फारच भयानक होती. नुकत्याच झालेल्या डिसेंबर क्रांतीतील पकडल्या गेलेल्या तरुणांना अमानुषपणे हद्दपारी, फाशी आणि इतर कठोर शिक्षांना सामोरे जावे लागले होते. झारच्या जुलमी सत्तेला विरोध करणाऱ्यांचे शिरकाण नित्याचेच झाले होते. या सर्व राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा ऊहापोह लिओंनी आपल्या साहित्यात केलेला आढळतो. महात्मा गांधी आणि लिओ टॉलस्टॉय यांच्यात पत्ररूपाने विचारांची देवाणघेवाण अनेक वेळा झाली. १९१० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com