‘बार्बाडोस’ या वेस्ट इंडिज बेटांपैकी एका द्वीपराष्ट्राची ओळख आपल्याकडे क्रिकेटमुळे अनेकांना आहे. ३० नोव्हेंबर १९६६ रोजी हा देश स्वातंत्र्य मिळवून ब्रिटिश कॉमनवेल्थ संघटनेचा सदस्य देश म्हणून अस्तित्वात आला. तेव्हापासून ब्रिटिश सम्राज्ञी एलिझाबेथ द्वितीय ही स्वतंत्र बार्बाडोसची नामधारी राष्ट्रप्रमुख म्हणून नियुक्त आहे. तेथील जनतेची इच्छा आहे की, राणी एलिझाबेथला राष्ट्रप्रमुख पदावरून हटवून त्यांच्या देशात प्रजासत्ताक सरकार स्थापन करावे. आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन येत्या ३० नोव्हेंबर २०२१ रोजी बार्बाडोस सार्वभौम प्रजासत्ताक देश होणार आहे.

अरावॅक आणि कॅरिब हे बार्बाडोसचे मूळचे आदिवासी. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रेडो कॅम्पास हा पोर्तुगीज खलाशी संशोधक प्रथम या प्रदेशात आला. त्यानेच येथील लांबच लांब दाढी वाढवलेले आदिवासी पाहून या प्रदेशाला ‘बार्बाडोस’ म्हणजे ‘दाढीवाले’ असे नाव दिले असावे! परंतु या प्रदेशात पोर्तुगीजांनी वस्ती मात्र केली नाही. साधारणत: याच काळात स्पॅनिश लोक अधूनमधून इथे धाड टाकून कॅरिब लोकांना पकडून गुलाम म्हणून इतरत्र विक्री करीत. स्पॅनिश लोकांनी फार मोठय़ा प्रमाणात आदिवासींची धरपकड करून त्यांना दुसरीकडे विकल्यामुळे इथल्या लोकसंख्येत घट झालीच; शिवाय या भीतीने अनेक लोकांनी दुसऱ्या छोटय़ा वेस्ट इंडियन बेटांवर पळ काढला. पुढची अनेक दशके बार्बाडोस बेट हे अगदी तुरळक लोकवस्तीचे ओसाड बेट बनून राहिले होते.

कॅप्टन जॉन पॉवेल याच्या नेतृत्वाखाली बार्बाडोसच्या किनाऱ्यावर १६२५ साली पहिले इंग्लिश जहाज आले. पुढे दोन वर्षांनी जॉन पॉवेलचा भाऊ हेन्री पॉवेल त्याच्याबरोबर ८० लोक वस्ती करण्यासाठी आणि दहा कंत्राटी इंग्लिश मजुरांना घेऊन बार्बाडोसमध्ये वसाहत करण्याच्या इराद्याने आला. १६२७ साली स्थापन झालेली ही इंग्लिश वसाहत प्रत्यक्षात ब्रिटिश राजवटीने काही कराराने विल्यम कोर्टेन या लंडनच्या व्यापाऱ्याला परवाना पद्धतीने दिली होती. या ब्रिटिश वसाहतवाल्यांनी बार्बाडोसमध्ये उसाची मोठी लागवड करून ऊसमळ्यांमध्ये मजुरी करण्यासाठी मोठय़ा संख्येने आफ्रिकेतून गुलाम आणले. पुढे कोर्टेनच्या परवान्याची मुदत संपल्यानंतर ब्रिटिश राजवटीने जेम्स या उमरावाला बार्बाडोसची ही वसाहत चालविण्यास दिली.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com