दक्षिण-पूर्व कॅरिबियन समुद्रातील ‘ग्रेनाडा’ या छोटय़ा द्वीपसमूहाचे केवळ नावही परिचित असलेली व्यक्ती बहुधा आपल्याकडे सापडणार नाही. ७ फेब्रुवारी १९७४ रोजी ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळविल्यानंतर ‘ग्रेनाडा’ हा स्वायत्त देश अस्तित्वात आला. ग्रेनाडा याच नावाच्या प्रमुख बेटाव्यतिरिक्त इतर सहा लहान बेटांचा मिळून हा देश बनला आहे. ‘पश्चिमेकडील मसाल्यांचे बेट’ म्हणून नावाजला गेलेला ग्रेनाडा हा देश जगातला सर्वात मोठा जायफळाचा पुरवठादार आहे.

इतर बहुतेक कॅरिबियन बेटांप्रमाणे, आपल्या तिसऱ्या अमेरिकी मोहिमेत ख्रिस्तोफर कोलंबस ग्रेनाडा बेटाजवळून गेला. ते बेट पाहून त्याचा उल्लेख कोलंबसने ‘कन्सेप्शन’ असा केला. अरावाक रेड इंडियन्स हे इथले मूळचे रहिवासी. पण पुढे कॅरिब या जमातीच्या लोकांनी तिथे येऊन अरावाकांवर हल्ले करून त्यांची कत्तल केली. स्पॅनिश लोकांनी या बेटावर वस्ती केली नाही; मात्र १६०८ साली ब्रिटिशांनी इथे वस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी तिथल्या कॅरिब जमातींनी त्यांना यशस्वी होऊ दिले नाही. पुढे १६४९ मध्ये २०० फ्रेंच लोकांनी मोहीम काढून ग्रेनाडा बेटावर वसाहत स्थापन केली.

फ्रेंच मंडळी ग्रेनाडात येण्यापूर्वी तिथे मूळच्या कॅरिब आदिवासींची दोन-तीन राज्ये होती. हे परके लोक वाढत्या संख्येने येऊन इथे वर्चस्व गाजवू पाहताहेत हे लक्षात आल्यावर कॅरिब जमातींनी फ्रेंचांवर छुपे हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यांस तोंड देण्यात फ्रेंच वसाहतवाल्यांची पाच वर्षे गेली. अखेरीस फ्रेंचांनी सन १६५४ मध्ये सैन्यानिशी कॅरिबांवर आक्रमण करून त्यांचा नायनाट केला. उरलेसुरले कॅरिब लोक शेजारच्या बेटांवर पळून गेले. सन १७०० पर्यंत कॅरिब जमातीचा मागमूसही ग्रेनाडा बेटावर राहिला नाही.

फ्रेंचांनी त्यांच्या या नव्या वसाहतीचे नामकरण केले ‘ला ग्रेनाड’ आणि राजधानीसाठी फोर्ट रॉयल हे शहर वसवले. या राजधानीचे नाव पुढे सेंट जॉर्जेस् असे झाले. फ्रेंचांनी वसाहत स्थापून ग्रेनाडामध्ये ऊस आणि नीळ यांची मोठय़ा प्रमाणात लागवड सुरू केली. उसाच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी फ्रेंचांनी हजारो आफ्रिकी गुलाम ग्रेनाडात आणले. साखर उत्पादन आणि नीळ यांच्या व्यापारावर फ्रेंच ग्रेनाडाची अर्थव्यवस्था सुरळीत झाली.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com