कोचीनचा राजा उन्नीरामन याच्याशी पोर्तुगीजांची युती झाल्यावर राजाने कोचीनमध्ये ३० ख्रिश्चन पाद्रय़ांना राज्यात राहावयास परवानगी दिली. पुढे कोचीन शासकांकडून व्यापाराची परवानगी घेऊन पोर्तुगीजांनी १५०३ साली ‘फोर्ट इम्यानुएल’ हा किल्ला कोचीनमध्ये बांधला आणि केरळातील पहिले चर्च बांधले. कालिकतच्या झामोरीनने केलेले हल्ले कोचीनच्या शासकांनी पोर्तुगीजांची लष्करी मदत घेऊन परतविले. पोर्तुगीजांनी धूर्तपणे आपले सन्य वाढवून कोचीन राज्यकारभारातही आपले वर्चस्व निर्माण केले. इ.स. १५०३ ते १६६३ या काळात कोचीनचे राजे केवळ नामधारी शासक बनून राहिले. १५०३पर्यंत कोचीन ही पोर्तुगीज भारताची राजधानीच बनली. पुढे सक्तीचे धर्मातर, धार्मिक कोर्टाच्या शिक्षा, हिंदू स्त्रियांबरोबर सक्तीचे विवाह या कारणांमुळे पोर्तुगीजांची कोचीनमधील सत्ता १६६३मध्ये नामशेष झाली. पोर्तुगीज सत्तेच्या अस्तानंतर डच लोकांनी कोचीनचा शासक वीर केरला वर्मा पंचम याच्याशी युती करून १६६३ ते १७७३ या काळात कोचीनवर आधिपत्य केले. म्हैसूरच्या हैदर अलीने त्रिचूर आणि काही प्रदेश घेतल्यामुळे कोचीनने म्हैसूरचेही अल्पकाळ मांडलिकत्व स्वीकारले. सन १८१४ मध्ये झालेल्या अँग्लो-डच करारान्वये कोचीनचे राज्य त्याच्या सर्व बेटांसह ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आले, तर त्या बदल्यात बंका बेट डचांकडे गेले. इ.स. १८१४ ते १९४७ कोचीनचे राज्य ब्रिटिशांचे संरक्षित, अंकित संस्थान बनून राहिले. ब्रिटिश इंजिनीअर रॉबर्ट बिस्टो याने कोचीन बंदराचा विकास करून व्यापारी गलबतांसाठी एक सुरक्षित बंदर बनविले. १८६६ साली फोर्ट कोचीन ही १८ निर्वाचित सदस्यांची नगरपालिका स्थापन झाली. राजा रामा वर्मा पंधरावे यांनी राज्यात प्रथम रेल्वेसेवा सुरू केली. राजा केरला वर्मा सहावे हे स्वत: आयुर्वेदाचार्य होते, त्यांनी सन १९४१मध्ये राज्यात अन्नधान्याचे रेशनिंग सुरू केले. राजे ऐक्य केरलम् थंपूरन ऊर्फ केरला वर्मा सप्तम यांनी कोचीन राज्य १९४७मध्ये स्वतंत्र भारतात विलीन केले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – स्मार्ट वस्त्रप्रावरणांची ओळख
स्मार्ट वस्त्र ही संज्ञा बऱ्याचशा विस्तारित क्षेत्राला लागू होते. या वस्त्रप्रावरणांच्या उपयुक्ततेच्या व कार्यप्रवणतेच्या कक्षा आणि मर्यादा यांचा मागोवा आपण या लेखात घेऊ. हजारो वष्रे मानव जातीने शरीरास, ऊन, थंडी, वारा, पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी व उबदार वाटण्यासाठी, नसíगक स्रोतांमधून उपलब्ध असलेल्या तंतूंपासून तयार केलेल्या विविध वस्त्रप्रावरणांचा उपयोग केला आहे. सर्व जतन केलेल्या ऐतिहासिक दस्तऐवजावरून एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात आली आहे की रंग, आकार, आभूषणं, दर्शनीयता (स्टाइल), यामुळे वस्त्रप्रावरणांनी मानवाला एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व बहाल केलं आहे. आधुनिक प्रचलित भाषेमध्ये वस्त्रप्रावरण हे आता एक मान्यता प्राप्त फॅशन स्टेट्मेंट झाले आहे.
मानवीय वस्त्रप्रावरणाची गरज व मानवाने सीमित केलेली वस्त्रप्रावरणाची उपयुक्तता त्याच्या मूलभूत गरजांपलीकडे गेलेली नाही म्हणजे मानवाने वस्त्रप्रावरणाचा उपयोग फक्त संरक्षण, सुखान्त व दर्शनीयता (स्वत:स व्यक्त करणे) एवढय़ापुरताच मर्यादित ठेवला आहे. अर्थात वरील निष्कर्षांला अपवाद म्हणून उल्लेख करायचा झाल्यास रीतिरिवाज वा पोशाखपद्धतीमधील लहरीपणा व व्यावहारिक उपयोगातील वैविध्य याचा उल्लेख करता येईल पण अपवाद म्हणूनच. गेल्या शतकातील महत्त्वाचं परिवर्तन म्हणून काही नॉमेक्स, केवलर यांसारख्या रासायनिक तंतूंचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. नॉमेक्समध्ये अग्नीविरोधक गुणधर्म प्रकर्षांने भरलेले आहेत तर केवलर त्याच्या अतिश्रेष्ठतम ताकदीकरिता प्रसिद्ध आहे, परंतु एवढे असूनसुद्धा ही वस्त्रप्रावरणे अजूनही मंद वा जडवर्ती म्हणूनच समजली जातात. स्मार्ट वस्त्रप्रावरणांच्या उपयोगाबद्दल मतमतांतरे असली तरी ढोबळमानाने असे म्हणता येईल की एकात्म सक्रिय कार्यप्रवणता अंतर्भूत असलेले पारंपरिक वस्त्रप्रावरण म्हणजे स्मार्ट वस्त्र. ऊर्जानिर्मिती वा साठवण, मानवीय सेतूसंबंधित उपकरण, सेिन्सग उपकरणे, रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्यप्रवणता हे स्मार्ट वस्त्राचे मूलभूत कार्यभाग आहेत.
म्हणजे संदेशक्षम व संदेशवाहक धागे, तंतू व वस्त्र, संलग्न सूक्ष्मातिसूक्ष्म वैविध्यपूर्ण कृतिशीलता देणाऱ्या रासायनिक प्रक्रिया या सर्वामुळे चाणाक्ष वस्त्रप्रावरण ही नेहमीच्या वस्त्रापेक्षा वेगळीच असतात.
-श्वेतकेतू (डोंबिवली) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org