14 December 2017

News Flash

कुतूहल : ज्वारीच्या कुळाचा प्रवास कसा होत गेला?

ज्वारीचं मूळ आफ्रिकेत असावं असं तज्ज्ञांना वाटतं. डॉगेट आणि माजिसु (१९६८) या शास्त्रज्ञांनी रानटी

- डॉ. क. कृ. क्षीरसागर (पुणे) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org | Updated: January 30, 2013 12:02 PM

ज्वारीचं मूळ आफ्रिकेत असावं असं तज्ज्ञांना वाटतं. डॉगेट आणि माजिसु (१९६८) या शास्त्रज्ञांनी रानटी ज्वारी आणि लागवडीखालील ज्वारीचे नातेसंबंध शोधण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेत जंगली ज्वारीच्या जाती लागवडीच्या ज्वारीच्या शेताभोवती सापडतात, असे त्यांना दिसले. त्यातूनच नवे संकरित वाण जन्माला आले असावेत. त्यापकी काहींची निवड पद्धतीने लागवड करीत पुढे शुद्ध सुधारित वाण हाताला लागले. निसर्गही हीच निवड पद्धत वापरतो. त्यातून नवे कणखर वाण जन्मतात.
ज्वारीच्या डय़ूरा या जाती ख्रिस्तपूर्व १००० ते ८०० वर्षांच्या काळात इथियोपियातून अरेबिया, आग्नेय आशिया, भारत येथे गेल्या असाव्यात. इटलीत त्या इसवीसन ६० ते ७० दरम्यान गेल्या असाव्यात.
भारतातील मूळ ज्वारीचा काळ कोणता? प्राचीन संस्कृत वाङ्मयात ज्वारीचा उल्लेख ‘यवनला’ असा आहे. हे धान्य सातूनंतर अस्तित्वात आलं असावं. पुरातत्त्वीय उत्खननात द्वारकेजवळच्या नागेश्वर येथे ज्वारीच्या ‘सॉर्घम हालापेन्स’ या जातीचे नमुने असलेले ४५०० वर्षांपूर्वीचे दगडाचे अवशेष सापडले. म्हणजेच ज्वारीच्या आफ्रिकेतील उगमाचा आणि भारतमाग्रे प्रवासाचा काळ काहीसा संभ्रम निर्माण करणारा ठरतो.
आफ्रिकेत ज्वारीच्या शेतांभोवती ज्वारीचे ‘सॉर्घम व्हर्टिसिंलिफॉर्म’ या जातीचे जंगली प्रकार सापडतात. त्यांची संख्या मोठी आहे. ते वरवर समानधर्मी असले तरी त्यांची जनुकीय रचना वेगवेगळी आहे. म्हणजे या जनुक संचयिकाच आहेत. पुढे त्यांचा प्रवास भारताकडे होत गेला. पण वैविध्य कमी होत शेवटी निखळ पिकाचे वाण स्थिर झाले असावेत. चीनमधील ‘सॉर्घम प्रॉपीम्कम’ या वाणाची निर्मितीही अशीच झाली असावी.
वनस्पतींचे वर्गीकरण करणाऱ्या कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने १७५३ मध्ये ज्वारीचा समावेश वनस्पतीच्या होल्कस या गटात केला. नंतर एन्डरसनने त्याला सॉर्घम हे पर्यायी नाव दिलं. १७९४ मध्ये मेंच या शास्त्रज्ञाने या दोन प्रजातींमधील फरक स्पष्ट केला आणि त्या विभक्त झाल्या. आधुनिक वर्गीकरणात सॉर्घमच्या सहा उपजातींचा समावेश होतो. स्नोडन यांनी १९३६ मध्ये वर्गीकरण करून ३१ लागवडीखालच्या आणि १७ रानटी जातींची नोंद केली. आता ज्वारीचे असंख्य वाण उपलब्ध आहेत. खाण्याबरोबर इंधनासाठी व साखरनिर्मितीसाठीही त्यांचा उपयोग होतो.

जे देखे रवी..  दैनंदिनी
आयुष्यात खूप सुख देणाऱ्या किंवा दु:खाने होरपळवणाऱ्या घटना कधीमधीच घडतात. अर्थात या सरासरीच्या गोष्टी आहेत. या सरासरीच्या दोन्ही बाजूला खूप सुखी आणि सतत दु:खाने भरलेली आयुष्येही बघायला मिळतात, पण त्यामुळे तर सरासरी सिद्ध होते. पूर्वी म्हाताऱ्या बायका भेटत. दळण कांडण स्वयंपाक, समारंभासाठी ठेवणीतली दोन-तीन लुगडी, सात-आठ मुलं झाली, त्यातली दोन-तीन गेली. आता गुडघे दुखत आहेत. नवरा जाऊन काही वर्षे झाली. मुले पांगली, लेकी मधून मधून भेटतात, हल्ली पूर्वीसारखे  देवळात जाता येत नाही असे सांगणाऱ्या या बायका ‘तुमचे आयुष्य कसे गेले?’ असा गंभीर प्रश्न विचारल्यावर मला काही कमी पडले नाही ?असे बिनधास्त सांगत असत.
शेवटी सुख-दु:ख-द्वेष मानण्यावरच असते. गरीबाच्या घरात जन्माला आलेले मूल आणि श्रीमंत घरात जन्माला आलेले अपत्य यामुळे होणारा आनंद यंत्राने थोडाच मोजता येतो. आनंदाने किंवा सुखाने माजू नका आणि दु:खाला कुरवाळू नका असे जे सांगतात ते काही खोटे नाही.
अतीव गोष्टींचे सोडा पण दिवसभरात कितीतरी खालीवर होत असते. सकाळी सूर्यनमस्कार काढताना आज काही मजा आली नाही असे वाटते. वर्तमानपत्र उशिरा आले तर चुकचुकल्यासारखे होते. न्याहारीसुद्धा दररोजची तशीच लागत नाही. कामाला जाताना वाहतूक तुंबली तर उशीर होतो आणि चिडचिड होते. शस्त्रक्रिया करताना अनुभवी नर्स  मिळाली नाही तर राग येतो. भूल देताना वेळ लागला किंवा काही अनपेक्षित घडले तर जीव खालीवर होतो. शस्त्रक्रिया समाधानकारक झाली तर बरे वाटते मग रुग्णाला बाहेर काढल्यावर जर थोडाफार अनपेक्षित रक्तस्राव झाला तर काळजी वाटते. घरी जेवायला गेल्यावर मी मैत्रिणींबरोबर बाहेर गेले आहे, सगळे जेवण काढून ठेवले आहे अशी चिठ्ठी वाचल्यावर फारसे काही वाटत नाही, पण जेवण झाल्यावर ताट उचलायचे काम करताना उरलेले अन्न उचलून ठेवताना नाही म्हटले तरी मनस्ताप होतो. दुपारची वामकुक्षी दररोज तशीच लागत नाही. फोन खणाणतात आणि तो बंद करून ठेवण्याचे धाडस होत नाही.  कारण मी जगात गुंतलेला असतो आणि ती गुंतागुंत माझ्या आयुष्याचे स्वरूप असते.
या वरखाली होणाऱ्या गोष्टीवर मी उपाय शोधला आहे. संध्याकाळी किती वेळा माझा झोका उंच गेला आणि किती वेळा खाली आला याची मी मोजदाद करतो. तसेच हाच झोका किती वेळा पूर्वी असाच उंचखाली गेला आहे याची आठवण करतो. पूर्वी हा झोका आपल्याला सतावत असे. आता वयोमानाप्रमाणे या झोक्याचे इंगित आपल्याला समजले आहे अशी जाणीव होते. या झोक्याकडे त्रयस्थासारखे बघण्यासाठी ही माझी शाळा आहे.
– रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस                                                       
परमा : स्त्री विकार
माझ्या वैद्यक व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात एक तेलुगू गृहस्थ एका परमा विकारग्रस्त स्त्रीला घेऊन माझ्याकडे आले. ठणका, आग, लघवी कमी होणे इत्यादी नाना तक्रारींनी बाई हैराण होती. प्रथम उपळसरी, कामदुधा अशी साधी सोपी औषधे दिली. गुण नाही. दुखणे २४ तासांत वाढले. वडिलांचे स्मरण केले. त्यांचा ‘चंदनी तूप’ यावर भर असे. त्या बाईंना सर्व तऱ्हेचा ‘चंदनी मारा’ केला. पोटात चंदनगंध व चंदनीतेलाचे थेंब पुन:पुन्हा प्यावयास दिले. बाहेरून पंचवल्कल- वड, उंबर, पिंपळ, पिंपरी, पायरी या सालींच्या काढय़ाने योनीधावन-डूश केले. योनीजागी चंदनतेल पुन:पुन्हा लावण्यास सांगितले. चोवीस तासांत खूप आराम पडला. दोन महिने नेटाने औषध घेतल्याने बाई बऱ्याच अंशी बऱ्या झाल्या.
रेड लाईट एरियातील बहुतांश स्त्रियांना हा विकार पुरुष संपर्काने होतो. अनेकानेक पुरुषांशी शरीरसंबंध, शरीरसंबंधानंतर स्वच्छता न पाळणे, मासिक पाळीच्या काळात अस्वच्छता, खूप तिखट, खारट आहार, मांसाहार किंवा खाण्याची आबाळ अशा विविध कारणांनी हा रोग होतो व बळावतो. या रोगात स्त्रियांच्या अंगावर काळे डाग पडणे, तिळासारखे ठिपके येणे अशा साध्या लक्षणांपासून सुरुवात होऊन योनीवर पुरळ, लाली, पू, खाज, आग अशी लक्षणे होतात व बळावतात. अशा स्त्रीला गर्भ राहिल्यास लगेच गर्भस्राव किंवा काही महिन्यांनी गर्भपात होतो. ‘असंगाशी संग’ असे रोज घडत असल्यामुळे अशा स्त्रीला वंध्यत्व येते, अपत्य झाल्यास ते मृत वा खूप कृश असू शकते. परमाग्रस्त स्त्रीची हाडे सुकतात, वाकडी होतात. विशेषत: नाक वाकडे होते.
आपल्या मायभगिनींना जगात एकच मित्र आहे तो म्हणजे चंदन.  चंदनाचे गंध सकाळ-सायंकाळ एक चमचा घ्यावे. उपळसरीचूर्ण सकाळी एक चमचा व त्रिफळाचूर्ण रात्री एक चमचा घ्यावे. बाहय़ोपचारार्थ उपळसरी मुळीचा लेप शतधौतघृत, एलादि तेल असे पर्याय आहे. शतावरीसिद्ध तेलाचा पिचू योनीजागी ठेवावा. कटाक्षाने तंबाखू, मशेरी सोडावी. दुर्भागी माता भगिनींना प्रणाम!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        
३० जानेवारी
१८८९ > मराठीतून वैज्ञानिक विषयांवर विपुल लेखन करणारे अभ्यासू लेखक गोपाळ रामचंद्र परांजपे यांचा जन्म. ‘सृष्टिज्ञान’ हे मासिक त्यांनी सुरू केले. ‘शक्ती’, ‘अणुशक्ती’, ‘आकाशदर्शन अ‍ॅटलास’ या पुस्तकांखेरीज,  ‘वैज्ञानिक परिभाषा संज्ञाकोश’ त्यांनी सिद्ध केला.
१९४९ > मराठी रंगभूमी जागतिक स्तरावर नेण्यात वाटा असलेले नाटककार सतीश आळेकर यांचा जन्म. त्यांची अनेक नाटके गाजली, त्यापैकी ‘महानिर्वाण’ व ‘बेगम बर्वे’चे प्रयोग मराठीत तसेच अन्य भाषांतही झाले. या नाटकांवर इंग्रजीत स्वतंत्र समीक्षाग्रंथ निघाले. पुणे विद्यापीठाच्या ‘ललित कला केंद्रा’चे माजी संचालक असलेल्या आळेकर यांनी, ललितकलांच्या शिक्षणासाठी पाठय़पुस्तकांची कल्पना मांडली व हा प्रकल्प २०११ मध्ये यशस्वीही केला.
२००१ > रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड झाली, सूर्याची पिल्ले, हिमालयाची सावली, अखेरचा सवाल, प्रेमा तुझा रंग कसा.. आदी ४३ प्रयोगक्षम नाटके स्वातंत्र्योत्तर मराठी रंगभूमीला देणारे वसंत कानेटकर यांचे निधन. कथा आणि कादंबरी हे लेखनप्रकारदेखील त्यांनी हाताळले, तसेच व्यासंगी प्राध्यापक म्हणून कारकीर्द केली. १९८८ च्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
– संजय वझरेकर

First Published on January 30, 2013 12:02 pm

Web Title: how was the journey of holcus sorghum ganretion
टॅग Kutuhal,Navneet