श्रुती पानसे- contact@shrutipanse.com

जुन्या आठवणींत रमायला माणसांना फार आवडतं. काही माणसांचा ‘आज’ अतिशय दु:खी, अस्वस्थ असतो. का? तर, त्यांना ‘काल’च्या आठवणी त्रास देतात. सारखं डोकं वर काढतात. त्या आठवणी आल्या, की माणसं पुन्हा दु:खी होतात. काय आहे याचं मेंदूतलं कारण?

स्मिथ आणि स्क्वियर या दोघा मेंदूशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात नव्या व जुन्या आठवणींची नोंद घेण्यात आली. काही व्यक्तींना १६० प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरं देणं सोपं होतं. मात्र, या प्रश्नांची रचना वेगवेगळ्या पद्धतीनं केली गेली होती. उत्तर देताना व्यक्तीला अलीकडचं- पलीकडचं- जुनं – खूप जुनं – अगदी नवं आठवावं लागेल, अशी ही रचना होती. अगदी या १६० प्रश्नांतल्या पहिल्या काही प्रश्नांबद्दलसुद्धा यात विचारलं गेलं. कारण तीच सर्वात अलीकडची आठवण म्हणून ग्राह्य धरली होती.

समाजजीवनविषयक तसंच काही वैयक्तिक प्रश्नही विचारले गेले. हे प्रश्न त्यांच्या नव्या-जुन्या आठवणींच्या संदर्भात होते. प्रत्येक वेळी मेंदूतला रक्तप्रवाह कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आहे, हे तपासलं गेलं. त्यानुसार असं आढळलं, की ‘हिप्पोकॅम्पस’ या मूळ स्मरणक्षेत्रात तर या आठवणी साठवलेल्या होत्याच; मात्र त्याशिवाय ‘फ्रंटल लोब’मध्येदेखील उद्दीपन दिसून आलं. जुन्या आठवणी आठवताना नव्या आठवणींच्या तुलनेत वेळ जास्त लागत होता, तसंच वैयक्तिक आयुष्यातील आठवणी सामाजिक जीवनातल्या आठवणींपेक्षा तुलनेत लवकर आठवत होत्या.

या विषयावर संशोधन सुरू आहे. हिप्पोकॅम्पस व्यतिरिक्त इतर क्षेत्रांची नक्की काय भूमिका आहे, त्यात नक्की कोणत्या स्वरूपाची देवाणघेवाण होते आणि कशासाठी, हे संशोधकांना शोधायचं आहे.

भूतकाळातल्या वाईट आठवणी आठवून काही जण आज आनंदात राहत नाहीत. तर सकारात्मक मनाची माणसं जुन्या काळातल्या चांगल्या आठवणी आठवून आज खूश राहतात. जुन्या आठवणी लक्षात राहणं ही मेंदूसाठी चांगली बाब आहे; मात्र नकारात्मक आठवणींच्या छायेत राहण्यामुळे नकारात्मक रसायनं शरीरात निर्माण होतात. त्यापेक्षा चांगल्या, आश्वासक आठवणी आठवाव्यात. त्याने मेंदू चपळ राहायला मदत होईल. ‘भूली बिसरी यादें’ तितक्याशा वाईट नसतात; पण त्यातच गुंतून वर्तमानाकडे दुर्लक्ष होत असेल, तर मात्र ‘भूली हुई यादों, मुझे इतना न सताओ..’ अशी अवस्था होते!