मेंदूमध्ये सर्व प्रकारच्या शब्दांचा शब्दकोश असतो. चांगले शब्द, सज्जन माणसांचे शब्द, वाईट माणसांचे शब्द, शिव्या यातला फरक पुस्तकी शब्दकोशाला कळत नाही. पुस्तक सर्व शब्दांना स्वीकारतं. तसंच ज्या शब्दांचे अनुभव मेंदूला मिळतील, जे काही शब्द कानावरून जातील ते सर्व तो ‘हिप्पोकॅम्पस’ या मेंदूतील स्मृती-केंद्रात साठवून ठेवतो. हे अपशब्द कधी वापरायचे असतात हेही मेंदूला माहीत असतं. त्यामुळेच स्वत: एखादा माणूस शिव्या देणारा नसेल, पण दुसरऱ्याने शिव्या दिल्या तर त्या शिव्या आहेत, अपमानकारक आहेत हे त्याला माहीत असतं. वेळ आली तर सज्जन माणूसही मेंदू-शब्दकोशातून शिव्या बाहेर काढून देतो. आपल्याला कोणी शिवी दिली तर मन दुखावलं जातं. कारण अपशब्द कशासाठी आहेत, हे सर्व संदर्भासह मेंदूला माहीत नसतं.

लहान मुलं पहिल्यांदाच अपशब्द ऐकतात, तेव्हा हे अपशब्द आहेत हे त्यांना माहीत नसतं. त्यांच्यासाठी ते फक्त शब्द असतात. हे अपशब्द त्यांच्या शब्दकोशात मुख्यत: मोठय़ा माणसांकडून येतात. मुलं ते सगळे शब्द वापरून बघतं. एकमेकांना अपशब्द वापरणारी मोठी माणसं मुलांनी शब्द वापरल्यावर चिडतात, तेव्हा ते मूल किती गोंधळात पडत असेल. जेव्हा पहिल्यांदा – दुसऱ्यांदा असं घडतं तेव्हाच या विषयावर चिडणं, रागावणं नाही, तर एकत्र बसून बोलायला हवं. असे शब्द वापरणं फारसं चांगलं समजत नाहीत. हे सांगितलं गेलं पाहिजे; मात्र ते जितक्या सहजपणे होईल तितकं चांगलं.

दहा वर्षांपर्यंतच्या मुलांचा सर्वात मोठा गुरू म्हणजे घरात ठाण मांडून बसलेला टीव्ही. घरामध्ये अखंड आणि अव्याहतपणे वाहणाऱ्या मालिका कधी सुरू असतात, तर कधी जाहिराती.  या सगळ्यामुळे अतिशय संवेदनशील मनाच्या मुलांवर विविध प्रकारचे किंवा चित्रविचित्र प्रकारचे परिणाम होत असतात. मुलांचं मन सर्व काही टिपून घ्यायला उत्सुक असल्यामुळे या सगळ्याचा परिणाम त्या बालमनावर होत असतो. टीव्ही वळण लावण्याचं काम करत असतो, हे अजिबातच विसरून चालणार नाही. मोठं झाल्यावरही हे शब्द राहायला नकोत.

श्रुती पानसे contact@shrutipanse.com