सुनीत पोतनीस

साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज वसाहतीच्या प्रशासन काळात मोझाम्बिकची जनता हलाखीचे जीवन जगत होती. पोर्तुगीज शासनाबद्दलच्या असंतोषाची जागा उद्रेक, गनिमी हल्ले आणि हिंसक कारवायांनी घेतली. यातून निर्माण झालेल्या स्वातंत्र्यवादी गुप्त संघटनांपैकी ‘मोझाम्बिक लिबरेशन फ्रंट’ संघटना अति जहाल होती. ‘फ्रेलिमो’ हे या संघटनेचे संक्षिप्त नाव.  या स्वातंत्र्य चळवळीला प्रतिसाद म्हणून पोर्तुगीजांनी १९६० पासून लोकहितवादी योजना, शैक्षणिक व्यवस्था कार्यान्वित केल्या. याच काळात पोर्तुगीजांच्या आफ्रिकेतल्या अंगोला आणि पोर्तुगीज गिनी या दुसऱ्या वसाहतींमध्येही स्वायत्ततेची मागणी वाढत होती आणि तिथेही स्वातंत्र्यवादी संघटना कृतिशील होत्या. मोझाम्बिक मधील ‘फ्रेलिमो’ आणि इतर देशांतल्या दोन स्वातंत्र्यवादी गुप्त संघटनांनी १९६२ पासून आंदोलन प्रखर बनवले. पोर्तुगीज अधिकाऱ्यांवर गनिमी हल्ले आणि हिंसक कारवाया केल्यामुळे पोर्तुगीज शासनाने ‘फ्रेलिमो’ संघटनेवर बंदी घालून त्यांचा नेता एड्युआर्डो याला हद्दपार केले; परंतु एड्युआर्डोने तिथून चळवळीची सूत्रे सांभाळली.

पोर्तुगीज शासन वि. मोझाम्बिकच्या स्वातंत्र्य संघटना यांच्यातील चकमकी १९६२ मध्ये सुरू झाल्या, त्यांना दोन वर्षांत युद्धाचे स्वरूप आले. पोर्तुगालच्या लष्कराचे शहरी भागातल्या आंदोलकांवर शस्त्रबळाच्या साहाय्याने नियंत्रण होते, परंतु ग्रामीण भागात मात्र आंदोलक आणि स्वातंत्र्यसैनिक यांचे वर्चस्व होते. १९६२ साली सुरू झालेले हे पोर्तुगीज ‘कलोनियल वॉर’ १९७४ ला शमले.‘फ्रेलिमो’ने या धामधुमीत उत्तरेतल्या काही प्रदेशांवर कब्जा केला होता. याच काळात पोर्तुगालमध्येही राजकीय अस्थिरता निर्माण झाली. १९७४ साली तिथल्या लष्कराने तिथल्या राजवटीविरोधात उठाव करून राजवट बरखास्त केली आणि पोर्तुगालमध्ये लष्करी सरकार स्थापन केले. या नव्या लष्करी सरकारने नवे निर्णय घेऊन लोकशाहीवादी धोरण ठरविले. या सरकारने पोर्तुगीजांच्या सर्व वसाहतींना स्वातंत्र्य देण्याचा  निर्णय घेतला. या निर्णयान्वये पोर्तुगालच्या सरकारने १९७५ ला मोझाम्बिकला स्वातंत्र्य देत असल्याची घोषणा केली आणि २५ जून १९७५ ला मोझाम्बिक स्वायत्त, सार्वभौम देश अस्तित्वात आला.

sunitpotnis94@gmail.com