21 February 2019

News Flash

मीटर -पूर्वी आणि आज

मीटरची नेमकी लांबी ठरविण्यासाठी उत्तर ध्रुव ते विषुववृत्त अशा मोजमाप-मोहिमादेखील काढण्यात आल्या.

इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स (SI) या स्वीकृत आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार लांबीचे एकक आहे ते मीटर. ऐतिहासिकदृष्टय़ा, ‘मापदंड’ ठरवले गेलेले ते पहिले एकक म्हणता येईल. याला अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत झाली ती फ्रेंच राज्यक्रांती. या राज्यक्रांतीनंतर, राजेशाही संपून फ्रान्समध्ये जी विधान समिती स्थापन झाली, तिने तर्कशुद्धता व नैसर्गिक घटना यांवर आधारित एककांच्या व्याख्या करण्याचा निर्णय घेतला. (मोजमापाची दशमान ‘मेट्रिक’ पद्धत याच विधान समितीची देणगी आहे.)

सर्वप्रथम दोन पर्याय पुढे आले. ‘ज्याच्या आंदोलनाचा काळ दोन सेकंद आहे अशा लंबकाची लांबी’ किंवा ‘एका रेखावृत्तावरील उत्तर ध्रुव ते विषुववृत्त अंतराचा एक कोटय़ांशावा भाग.’ लंबकाचा आंदोलनकाल गुरुत्त्वाकर्षण बलावर अवलंबून असतो आणि पृथ्वीचे गुरुत्त्वाकर्षण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. या कारणामुळे पहिला पर्याय फेटाळला गेला व दुसरा स्वीकारला गेला. मीटरची नेमकी लांबी ठरविण्यासाठी उत्तर ध्रुव ते विषुववृत्त अशा मोजमाप-मोहिमादेखील काढण्यात आल्या.

काही अधिक सुधारणांनंतर, एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाच्या सुमारास इरिडिअम-प्लॅटिनमपासून तयार केलेल्या मिश्रधातूची एक मापदंड ‘मीटरपट्टी’ बनवली गेली; आणि शून्य अंश तपमानाला व समुद्रसपाटीवर असतो तितका म्हणजे एका वातावरणाइतक्या दाबाखाली तिची असणारी लांबी ही ‘एक मीटर’ असे निश्चित केले गेले. ही मापदंडपट्टी पॅरिसमध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवली गेली व तिच्या प्रतिकृती जगभर वितरित केल्या गेल्या.

मापदंडपट्टीने तिच्यावर टाकलेली जबाबदारी जवळजवळ सत्तर वर्षे चांगल्या पद्धतीने सांभाळली. पण अशा एकाच ठिकाणी ठेवलेल्या वस्तूवर जगभरची एकके अवलंबून ठेवणे योग्य नव्हते. शिवाय फार काळ जपून ठेवलेल्या वस्तूतही निसर्गमानाने थोडेफार फरक पडू शकतात व अधिकाधिक अचूक मोजमापांची गरज असणाऱ्यांत विज्ञानयुगात असा थोडाही फरक चालू शकत नाही.

या लांबीच्या एककाची सुधारित व्याख्या करताना, उपयोगी आला तो आइन्स्टाइनचा विशिष्ट सापेक्षतावादाचा सिद्धांतातील ‘निर्वात पोकळीतील प्रकाशाचा वेग कसाही मोजला तरी सर्वत्र समान भरतो’ हा नियम! प्रकाशाचा वेग हा सेकंदाला २९, ९७, ९२, ५४८ मीटर इतका निश्चित केला गेलेला आहे. हा नियम वापरून, ‘सेकंदाच्या २९,९७,९२,५४८व्या भागात प्रकाशाने निर्वात पोकळीत पार केलेले अंतर’ ही एक मीटरची आधुनिक व्याख्या केली गेलेली आहे.

गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे, सेकंदाचा कालावधी एक हजार कोटय़ांशा एवढय़ा अचूकतेने मोजता येऊ शकतोच. यामुळे मीटरची व्याख्यादेखील आता त्याच अचूकतेने होऊ शकते, तीदेखील मापदंडपट्टीची कुबडी न घेता! याचे मूळ कारण म्हणजे प्रकाशवेगाचा वैश्विक स्थिरांक. आपण यापुढील लेखांत पाहू की असेच तत्त्व वापरून इतर एककांच्याही व्याख्या निश्चित केल्या जाऊ शकतात.

डॉ. अमोल दिघे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

डॉ. भालचंद्र नेमाडे यांची  हिंदूकादंबरी

‘हिंदू’ ही ६०३ पृष्ठांची दीर्घ कादंबरी. नेमाडे यांनी हिंदू संस्कृतीचे केवळ भारत देशाच्या संदर्भातच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडाच्या नकाशावर आपल्या देशी अस्तित्वानिशी मांडलेले आख्यान केवळ अपूर्व आहे. आज उग्र होऊ पाहणाऱ्या हिंदुत्वाच्या विचारधारेस आव्हान देत हिंदू या संकल्पनेचाच मुळापासून विचार करायला लावणारा हा व्यापक पट आहे.

खानदेशातील सातपुडा पर्वतांच्या परिसरातल्या मोरगाव या गावातल्या शेतकरी, वारकरी कुटुंबातील खंडेराव हा या कादंबरीचा नायक आणि निवेदकही आहे. पुरातत्त्वविद्येत पीएच.डी. मिळविण्यासाठी तो पुण्याच्या डेक्कन कॉलेजात आला आहे. कृषी संस्कृती, एकत्र कुटुंब पद्धती, श्रमविभागणी, रीतिरिवाज, नात्यागोत्यांचा सांभाळ, आपल्या पूर्वजांच्या कथा हा सारा नातेसंबंधातील गलबला हे इथल्या संस्कृतीचे एक व्यवच्छेदक लक्षण असल्याचे खंडेराव सुचवतो. ते इथले एक वास्तव आहे, असे त्याला जाणवते, मात्र तो त्याचे समर्थनही करीत नाही.

खंडेरावाच्या जाणिवेमध्ये ‘स्थलांतर’ हे महत्त्वाचे विषयसूत्र अखंडपणे वावरताना दिसते. मोरगाव आणि अवतीभोवतीच्या परिसरात स्थिरावलेल्या जाती-जमाती, जगण्याच्या गरजेतून स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांचे प्राथमिक स्तरावरचे जगणे आणि इतरांशी आलेला संबंध आणि व्यवहारही तो बघत असतो. विशिष्ट भूप्रदेशात आता स्थिरावलेले लोकसमूहही एकेकाळी स्थलांतरित होऊनच आले असणार, असे अनेक विचार त्याच्या मनात येत असतात.

निसर्ग, महारवाडा, मांगवाडा, चांभारवाडा, भटेक-विमुक्त व स्थलांतरित, बलुतेदार, अशा असंख्य, वैविध्यपूर्ण तपशिलातून खंडेरावाच्या मनोभूमीवर मोरगावचा परिसर सगुण साकार होतो. या परिसरातील खानदेशी बोली, इतरांच्या बोली, आदिवासी, भिल्ल, लमाणांची भाषा, त्यातील भाषावैविध्य, म्हणी, वाक्प्रचार, लोकगीतांची भाषा, अशा अनेकविध भाषांचे सार्वभौम स्वरूप व सहजसंचार हेही ‘हिंदू’चे वैशिष्टय़.

अशा या समर्थ लेखकाला २०१४च्या ज्ञानपीठ पुरस्कारापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कार (१९९१), कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१) महाराष्ट्र फाउंडेशन कारकीर्दगौरव आदी पुरस्कारांसह कैक महत्त्वाचे मानसन्मान मिळाले. अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय समित्यांचे सदस्यत्व त्यांनी भूषवले आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on December 20, 2017 1:58 am

Web Title: international system of units meter reading