News Flash

मशिदींचे शहर इस्तंबूल

‘हगिया सोफिया’ आणि ‘ब्ल्यू मॉस्क’ या दोन प्रमुख मशिदी आहेत.

मशिदींचे शहर इस्तंबूल

इस्तंबूल म्हणजे पूर्वीचे कॉन्स्टन्टिनोपल शहर एक सहस्रकाहून अधिक काळ बायझंटाइन साम्राज्याची, तर पाच शतके ओटोमन साम्राज्याची राजधानी होते. मध्यपूर्वेतले ते सर्वाधिक मोठे शहर, खलीफाचे सर्वोच्च धर्मपीठ असल्याने जगातील कुठल्याही शहराहून अधिक मशिदी इस्तंबुलात आहेत. २००७ साली या शहरात तीन हजारांहून अधिक मशिदी होत्या! त्यापकी बायझंटाइन काळातील १९ चर्च आणि इतर इमारतींचे रूपांतर पुढे मशिदींमध्ये करण्यात आले. या मशिदींपकी ‘हगिया सोफिया’ आणि ‘ब्ल्यू मॉस्क’ या दोन प्रमुख मशिदी आहेत. अय्या सोफिया किंवा हगिया सोफिया हे बायझंटाइन सम्राट कॉन्स्टटाइन याने इ.स. ३४७ मध्ये प्रथम सेंट सोफिया चर्च म्हणून बांधले. पुढे लागलेल्या आगीत खाक झाल्यावर सम्राट जस्टिनियन याने ५३७ साली हे बसक्या घुमटाचे चर्च परत बांधून काढले. ग्रीक आर्थोडॉक्स या ख्रिस्ती परंपरेचे हे सेंट सोफिया पूर्वेकडचे प्रमुख ख्रिस्ती धर्मपीठ बनले होते. मे १४५३ मध्ये तुर्की मुस्लिमांनी इस्तंबूल आणि परिसरात सत्ता स्थापन केल्यावर चर्चच्या प्रमुख इमारतीभोवती चारमिनार उभे करून सेंट सोफियाचे ‘हगिया सोफिया’ या भव्य मशिदीत रूपांतर केले. १९३१ साली केमाल पाशाच्या धर्मनिरपेक्ष सरकारने हगिया सोफियाचे रूपांतर म्युझियममध्ये केले. बायझंटाइन स्थापत्यशैलीचा एक उत्तम नमुना असलेल्या या इमारतीच्या घुमटाच्या आतून आणि िभतींवर बायबलमधील काही चित्रकथा तसेच कुराणातील काही उतारे रेखाटलेले आहेत. बायझंटाइन राजवाडय़ाच्या जागेवर इ.स.१६०३ ते १६१७ या काळात बांधलेली सुलतान अहमत मशीद, तिच्या आतून लावलेल्या निळ्या रंगांच्या फरशांमुळे ‘ब्ल्यू मॉस्क’ म्हणून ओळखली जाते. सहामिनार असलेल्या या भव्य मशीद संकुलाला पाच प्रमुख घुमट आणि आठ उपघुमट आहेत. एका वेळी दहा हजार लोक सामावण्याची क्षमता असलेल्या ब्ल्यू मॉस्कची लांबी ७३ मीटर, रुंदी ६५ मीटर तर उंची ४३ मीटर असून सध्याही ती प्रार्थनास्थळ म्हणून वापरात आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

अमरवेल

खूपदा झाडाझुडपांवर पाने नसलेली पिवळसर वेल वाढलेली दिसते. या वेलीची जमिनीतील रुजवण शोधण्याचा प्रयत्न केल्यास सापडत नाही. पाने नाहीत, मुळे नाहीत, तरीही ही वनस्पतीच आहे. ही आहे अमरवेल. वेलीयवर्गातील ही वनस्पती असून हिचे शास्त्रीय नाव आहे ‘कसकुटा रिल्फेक्सा’

(Cuscuta reflexa) असून कसकुटॅसीयी म्हणजेच कोंवोलवुलॅसीया या कुळातील आहे. इंग्रजीत ‘डोडर’ या नावाने परिचित आहे.खरंतर सजीव म्हटलं की त्या सजीवाचा काही ठरावीक कालावधीनंतर अंत हा ठरलेलाच असतो. अमरवेल या नावावरून या वनस्पतीचा मृत्यू होत नसेल का? असा प्रश्न आपल्या मनात येतो. ही वनस्पती एक आधार संपला की दुसऱ्या आधारावर, मग तिसऱ्या अशा साखळी स्वरूपात वाढते. थोडक्यात काय तर तिच्या जीवनाचा अंत लांबवता येतो, म्हणून हिला अमरवेल म्हणतात.

अमरवेलीत हरितद्रव्याचा अभाव असल्याने प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्न तयार करता येत नसल्याने अन्नासाठी संपूर्णपणे आधारझाडावर अवलंबून असते. ही पूर्णत: परजीवी वनस्पती आहे. आधार वनस्पतीतील अन्न शोषून घेणारी शोषक मुळे अमरवेलीला असतात. अमरवेलीचे कमकुवत खोड पिवळसर असून ती गोल सुतासारखी वृक्षांवर अच्छादलेली दिसते. हिचा थोडासा तुकडा तोडून झाडावर टाकला तरीही ती झपाटय़ाने वाढून सर्व झाड वेढून घेते. अमरवेलीचे बी जमिनीत रुजल्यावर त्यातून तंतूसारखे खोड येते. परंतु लवकरच त्याला पोषणार्थ दुसऱ्या वनस्पतीचे खोड मिळाले नाही तर ते मरून जाते. आणि एकदा का दुसऱ्या वनस्पतीचा आधार मिळाला की तिच्या खोडाला शोषक मुळे तयार होतात. या शोषक मुळांचा आधारझाडाशी संपर्क आला की शोषक मुळे झाडाच्या खोडात, फांद्यात, पानात घुसून अन्नरस शोषून घेतात. या वेलीला जमिनीत वाढणारी मुळे नसल्याने हिला ‘निर्मुळी’ असंही म्हणतात. अमरवेलीमुळे आधारझाडाला हानी पोचून वाढ खुंटते, म्हणून बागेतील झाडांवर अमरवेल आढळताच ती काढून टाकावी. जरी ही वनस्पती परजीवी असली तरी तिच्यात औषधी गुणधर्म आहेत. या वेलीच्या मांसल खोडात ‘कसकुटीन’ तर बियांमध्ये अमवेलीन व कसकुटीन रासायनिक द्रव्य आढळते. यकृत आणि प्लीहा विकारावर अमरवेलीचा वापर करतात.

शुभदा वक्टे, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 3:13 am

Web Title: istanbul known as masjid city
Next Stories
1 आशिया आणि युरोप सांधणारे पूल
2 इस्तंबूलची जडणघडण
3 इस्तंबूलची सत्तांतरे
Just Now!
X