– सुनीत पोतनीस

पश्चिम आफ्रिकेतल्या फ्रेंच वसाहती असलेल्या राज्यप्रदेशांचा फ्रान्सने १९०४ साली ‘फ्रेंच वेस्ट आफ्रिका फेडरेशन’ हा राष्ट्रसंघ बनवला. त्यात आयव्हरी कोस्ट या वसाहतीचाही समावेश होता. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर फ्रान्समध्ये चाल्र्स दी गॉल यांचे हंगामी सरकार सत्तेवर आले. पुढे १९४६ मध्ये फ्रान्समध्ये चौथे प्रजासत्ताक स्थापन होऊन चाल्र्स दी गॉल हे राष्ट्राध्यक्षपदी निर्वाचित झाले. या नव्या सरकारने आयव्हरी कोस्ट वसाहतीच्या जनतेला अनेक सवलती, सामाजिक-राजकीय सुधारणा करून सुखद धक्का दिला.

१९५८ पर्यंत पॅरिसमधून नियुक्त झालेले गव्हर्नर्स आयव्हरी कोस्टचे प्रशासन सांभाळत होते. शेवटच्या सात-आठ वर्षांमध्ये गव्हर्नर्सनी प्रतिष्ठित, धनवान, बुद्धिजीवी वर्गाला संतुष्ट ठेवून तिथल्या सामान्य जनतेच्या सुखसुविधांकडे मात्र दुर्लक्षच केले. १९४६ मध्ये दी गॉल यांनी तत्पूर्वीचे फ्रेंच साम्राज्य आणि त्याच्या वसाहती मिळून एक फ्रेंच युनियन, अशी राजकीय व्यवस्था निर्माण केली. त्यात सर्व फ्रेंच वसाहतींमधील जनतेला फ्रेंच नागरिकत्व दिले होते खरे; परंतु त्यांना मतदानाचे अधिकार नव्हते. मात्र, फ्रेंच नागरिकत्व मिळाल्यामुळे आयव्हरी कोस्टमधील सर्वसामान्य जनतेच्या मनात अशी भावना होती की, यामुळे आपला दर्जा वाढून आपले राहणीमान फ्रेंच माणसाच्या तोडीचे होईल.

परंतु पुढच्या दहा-बारा वर्षांत आयव्हरी कोस्टच्या जनतेचा भ्रमनिरास झाला. याच काळात जगातल्या अनेक प्रदेशांनी आपल्या मानेवरचे वसाहती सरकारचे जोखड उतरवून स्वायत्त, सार्वभौम देश म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. या साऱ्याच्या परिणामी, आयव्हरी कोस्टच्या बुद्धिजीवी वर्गात राजकीय जागृती निर्माण होऊन स्वातंत्र्यप्राप्तीचा विचार मूळ धरू लागला. आपल्या बहुतेक वसाहतींमध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागल्याचे पाहून फ्रान्स सरकारने १९५८ मध्ये ‘फ्रेंच युनियन’ ही राज्यव्यवस्था बरखास्त करून त्याऐवजी वसाहतींची ‘फ्रेंच कम्युनिटी’ ही व्यवस्था सुरू केली. या कम्युनिटीतील आयव्हरी कोस्टला काही प्रमाणात स्वायत्तता देण्यात आली. पुढे ७ ऑगस्ट १९६० रोजी फ्रान्सपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवून सार्वभौम आयव्हरी कोस्ट हे नवराष्ट्र उदय पावले. नवजात कोत दी-वाँ (आयव्हरी कोस्ट) प्रजासत्ताकाची राजधानी यामोसुक्रो निश्चित करण्यात आली.

sunitpotnis@rediffmail.com