भारतात जितका पाऊस पडतो, त्यापकी फारच कमी प्रमाणात तो अडविला जातो. आपण पडलेला पाऊस वाहून वाया जाऊ देतो व मग पाणी नाही म्हणून ओरडा करतो. नर्मदा नदीवर बांधलेल्या धरणाद्वारे सरदार सरोवरात अडविलेले पाणी गुजरातने कच्छकडे वळविले असून त्याद्वारे त्या भागात खोदलेले तलाव वारंवार भरून घेण्यात येतात. हे साठविलेले पाणी चांगल्या प्रकारे जिरून त्या पाण्याचा फायदा या प्रदेशात शेतीसाठी व्हावयास सुरुवात झालेली आहे.
असे आपण महाराष्ट्रात करू शकत नाही का? प्रत्येक गावात अशा  पाझर तलावांची रेलचेल झाली तर राज्यातील जलसाठे वाढतील व गावोगावच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. ‘जोहड’ हे पुस्तक लिहिणाऱ्या राजेंद्रसिंहांनी राजस्थानात काय केले? जुने तलाव दुरुस्त केले, त्यातील गाळ काढला, नवीन जोहड बांधले आणि पाणी प्रश्नावर मात केली. हे काम त्यांनी एकटय़ाने नाही, तर जनतेत जागृती करून लोकसहभागाने घडवून आणले. या बहुमोल कामगिरीसाठी त्यांना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजस्थानात तर आपल्या राज्यापेक्षा कितीतरी कमी पाऊस पडतो. इतके असूनसुद्धा त्यांचा पाणी प्रश्न सुटू शकतो. तर आपल्याकडे इतक्या मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असूनही आपण या संधीचा फायदा घेण्यात कुठेतरी कमी पडत आहोत, याचा विचार करायला हवा.
पाझर तलाव भूजलासाठी फारच उपयुक्त ठरतो. यातील पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी सातत्याने वाढत जाते. भूजल पातळी वाढत वाढत नदीच्या जलपातळीच्या वर आली, तर भूजलातून नद्यांना सतत पाझर मिळतात व नद्या बारमाही वाहण्यास सुरुवात होते. आज या अभावी ऑक्टोबर महिना संपला म्हणजे सर्व नद्या कोरडय़ा पडलेल्या आढळतात. धुळ्याजवळ पांझरा नदीचा काही भाग बारमाही करण्यात तेथील काही मंडळी यशस्वी ठरली आहेत. या पाझर तलावांचा सगळ्यात जास्त भाग परिसरातील विहिरींना होतो. या तलावांचा पाझर जवळपासच्या विहीरींना समृद्ध करतो व त्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ होते. याशिवाय या साठलेल्या पाण्याचा मासेमारीसारख्या व्यवसायांवरही अनुकूल परिणाम झाल्याशिवाय राहात नाही.

जे देखे रवी.. – गुरू
मी डॉ. डायस यांना गुरू म्हणून स्वीकारले हे मागच्या लेखात लिहिले. गुरू या शब्दाचा मूलधातू इंडो युरोपियन भाषांमध्ये ‘गर्र’ असा आहे. संस्कृतमधले त्याचे रूपांतर ‘गरिमन्’ असे आहे. त्याचा अर्थ जड, वजनदार, महत्त्वपूर्ण, श्रेष्ठ मातबर किंवा उत्कृष्ट असा दिला आहे. हिंदी धारावाहिकांमध्ये ‘हमारे खानदान की गरिमा गिरी’ असे जे वाक्य ऐकायला मिळते त्यात समाजातले आमचे वजन कमी झाले असा आशय असतो. इंग्रजीतला great हा शब्द इथूनच आला आणि इंग्रजीतला  gravity म्हणजे गुरुत्वाकर्षण हाही शब्द गर्रचेच रूपांतर आहे. आपल्या सूर्यमालिकेतला सर्वात मोठय़ा ग्रहाला गुरू म्हणतात. एवढेच नव्हे, जेवढी वस्तू मोठी तेवढीच त्याची आकर्षणशक्ती  (सहसा) जास्त हे पदार्थ विज्ञानातले तत्त्व आपल्या पूर्वजांनी ओळखून gravity या इंग्रजी शब्दाचा समांतर शब्द गुरुत्वाकर्षण असा निवडला आहे.
ज्या काळात गुरू हा शब्द प्रचलित झाला त्या काळी गुरूशिष्याचे नाते संपूर्ण आणि संकीर्ण असले तरी शिष्यांचा आकडा लहान असे. व्यवहारातले गुरू-शिष्याचे सर्वाना माहीत असलेले उदाहरण कृष्ण आणि अर्जुनाचे आहे. हजारो सैनिकांसमोर झालेला हा गुरूशिष्य संवाद फक्त त्या दोघांमध्येच झाला एवढेच नव्हे तर तो कौरवांचे सोडा, पण खुद्द बाकीच्या चार पांडवांनासुद्धा ऐकू आला नाही असेच महाभारतात दाखवले आहे, त्याला अपवाद एकच तो म्हणजे संजयचा पण. संजयसुद्धा ‘माझ्या कानावर हे शब्द पडले हे माझे भाग्य’ असेच फक्त म्हणतो, तो निरीक्षक आणि समालोचक आहे शिष्य नाही. भारतीय संस्कृतीत गुरू गुजगोष्टी करतो आणि गुजगोष्टी ज्ञानेश्वरांच्या भाषेत ‘ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले’ अशा तऱ्हेने होतात.
 किंबहुना हे जग म्हणजे केवळ चैतन्य आहे दुसरे काही नाही असे जर सांगायचे असेल तर द्वैत म्हणजे दुसरा उभा करावा लागतो आणि अशा तऱ्हेने श्रीकृष्ण आणि अर्जुन ही कल्पना मूर्त करण्यासाठी मी मध्ये प्रेमाचा पडदा तयार केला आहे, अशी विलक्षण कल्पना ज्ञानेश्वर मांडतात.
 बाप जन्माला घालतो आणि गुरू विश्वाचे भान देतो असे म्हटले जाते. कारण बापाच्या बाबतीत ‘हृदयाचे हृदयी’ घालताना हृदय गुंतलेलेच राहते आणि ‘प्रेमळ पडदा’ प्रेमाचे पाश होण्याचीच शक्यता जास्त. इथे आणि आता काय आहे. पूर्वी काय होते आणि पुढे काय व्हायचे आहे असे सांगताना कितीही फरक दाखवता येत असले तरी जगाचे मूलभूत नियम काय याची वस्तुस्थिती गुरू सांगतो आणि शिष्याला सोडवतो अशी कल्पना आहे. उपनिषद या शब्दाची फोड ‘ये इथे मजजवळ अंमळ बस’ अशीच आहे.
माझे गुरू आणि मी असेच बसत असू त्यांच्या आठवणी पुढच्या लेखाकांत.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

Election campaigning was stopped due to rain
प्रचार पाण्यात! पावसाची रिपरिप प्रचाराच्या मुळावार, उमेदवार घरातच
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

वॉर अँड पीस  – पांडू : भाग – १
त्वचा पांढुरकी दिसणे, या प्रमुख लक्षणांवरून या विकारास पांडू असे म्हणतात. बऱ्याच वेळा हा रोग इतर विकारांतील एक प्रमुख लक्षण असतो. हात-पाय गाळठले की ‘तुला काय पांडुरोग झालाय कां? असे म्हणण्याचा प्रघात आहे. पांडवांच्या वडिलांना हा रोग प्रथम झाला असे महाभारतातील वर्णन आहे.
आयुर्वेदात पांडुरोग हा प्रामुख्याने पित्तकोपाने होतो असे समजले जाते. पित्त व रक्त यांचा जवळचा संबंध आहे. पित्त वाढले की रक्त वाढले पाहिजे अशी सामान्य कल्पना असते. पांडू या विकारांत पित्त वाढते पण ते योग्यजागी योग्यवेळी, योग्य कार्याकरिता वाढते असे नाही. नको तिथे पित्त वाढत जाते व शरीराला पीडा करते. पाहिजे त्या ठिकाणी न वाढल्याने खाल्लेल्या अन्नाच्या आहार रसामधून; पुरेशा रक्ताचा सातत्याने पुरवठा होत नाही.
आयुर्वेदात अष्टौमहागद असे आठ मोठे विकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये पांडुविकार नाही. पण व्यवहारात असे दिसते की, पांडू किंवा शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणे हा विकार सूज, क्षय, संधिवात, कावीळ अशा भल्या मोठय़ा दुर्धर विकारांबरोबरच ठाण मांडून बसतो. रोग्याला व वैद्य डॉक्टरांना, यातल्या कोणत्या विकाराला प्रथम हात घालावा? औषधोपचार करावे व करवून घ्यावे? असा संभ्रम निर्माण होतो. आपण संधिवात, क्षय, शोथ म्हणून औषधे देत राहतो पण ‘रक्तं जीव इति स्थिती। ’ या मूलभूत वचनाचा विसर पडलेला असतो. काही बऱ्यावाईट अनुभवानंतर रक्तावर लक्ष ठेवणे, त्याचे शरीरातील प्रमाण, अभिसरण यावर सतत लक्ष ठेवल्याने अनेक रुग्णांचे रोग बरा झाल्याबद्दलचे धन्यवाद मिळो ना मिळो; त्यांची नाराजी तरी टळली आहे. आपल्याकडे आलेल्या रुग्णांच्या रक्ताच्या प्रमाणात कधीच कमतरता येऊ देऊ नये; एवढे रुग्णांचे ऋण फेडणे, रुग्णांकडून द्रव्य घेऊनच व्यवसाय चालविणाऱ्यांचे आहे; असे मी समजतो. पांडुता एकदम येत नाही. ती का येते याकरिता रुग्णाचा पूर्वेतिहास, दिनचर्या, व्यवसाय, खाण्यापिण्याच्या सवयी आदींकडे लक्ष द्यायला हवे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  –   ५ एप्रिल
१८७७ > ‘रामायण लंकेचा शोध’, ‘मोहंजोदडो संस्कृतीच्या नाशाची कारणे’ असे महत्त्वाचे लेख आणि संस्थानांचा साद्यंत इतिहास लिहिणारे माधवराव विनायक किबे ऊर्फ सरदार किबे यांचा जन्म. १९२६ साली मुंबईत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला होता.
१८९० > ‘आनंद कंद ऐसा, हा हिंददेश माझा’ या गाजलेल्या कवितेचे कर्ते आनंद कृष्णाजी टेकाडे यांचा जन्म.
१८९२ > ‘निर्णयसागर छापखान्या’चे जनक आणि स्वतच्या फाउंड्रीत टंक तयार करून मराठीतील मुद्रणयुग जनसामान्यांपर्यंत नेणारे जावजी दादाजी चौधरी यांचे निधन.  
१९०५ > कोणाचाही मुलाहिजा न बाळगता निर्भीडपणा टिकवणारे ‘भाला’हे पत्र भास्कर बळवंत भोपटकर (भालाकार) यांनी या दिवशी सुरू केले आणि लिखाण वा इतरांच्या लेखनापायी प्रसंगी तुरुंगवास भोगून जवळपास दोन दशके चालविले.
१९२३ > संपादक, कथाकार शांताबाई मुकुंद किलरेस्कर यांचा जन्म. ‘डाक्क्याची साडी’, ‘शोध’(कथासंग्रह), भातुकली (कादंबरी) बालसंगोपनावरील दोन पुस्तके व ‘गोष्ट पासष्टीची’ ही त्यांची साहित्यसंपदा.  
१९७६ > संस्कृतज्ञ आणि व्याकरणतज्ज्ञ वासुदेव गोपाळ परांजपे यांचे निधन.
– संजय वझरेकर