16 December 2017

News Flash

अर्धायूचे मापन

कोबाल्ट-६० नावाचे अणुभट्टय़ांत निर्मिले जाणारे एक मूलद्रव्य, अशाच रीतीने किरणोत्सार करत असते.

लोकसत्ता टीम | Updated: August 9, 2017 1:45 AM

कल्पना करा की तुमच्याकडे एक किलोग्रॅम पदार्थ आहे. वर्षभराने पाहिला तर तो अर्धा किलोच भरला. दोन वर्षांनंतर मोजला तर तो पाव किलोच भरला. असे संभवते का? तर, हो. पृथ्वीवर काही मूलद्रव्ये अशी असतात, ज्यांचा निरंतर ऱ्हास होत असतो.

त्या ऱ्हासातही एक निश्चित गती असते. सोबतच्या आलेखानुसार तो पदार्थ घटत जातो. मात्र अवनीतलावरून संपूर्णपणे नाहीसा मात्र कधीच होत नाही. अशा पदार्थाना किरणोत्सारी पदार्थ म्हणतात.

असे पदार्थ अण्वंतर्गत कणांच्या स्वरूपात, तसेच ऊर्जेच्या स्वरूपात उत्सर्जने बाहेर टाकत असतात. त्यामुळे ते पदार्थच ऊर्जेचे स्रोत भासतात. कर्करोगावर उपचार करताना अशा ऊर्जेचा वापर केला जातो.

कोबाल्ट-६० नावाचे अणुभट्टय़ांत निर्मिले जाणारे एक मूलद्रव्य, अशाच रीतीने किरणोत्सार करत असते. त्याचे अर्धायू सुमारे ५.३ वर्षांइतके असते. त्या किरणोत्सारातील ऊर्जा, गॅमा किरणांच्या स्वरूपात असते. ती किरणे शक्तिशाली असतात.

कर्कग्रंथींवर त्यांचा मारा केल्यास निरोगी पेशींच्या मानाने, कर्कपेशी झपाटय़ाने नाश पावतात. अशा रीतीने कर्करोगावर उपचार तर होतो; पण सोबतच काही निरोगी पेशींचाही ऱ्हास होत असतो. तो ऱ्हास पुढे अन्य औषधांच्याद्वारे भरून काढला जातो. मात्र ह्य़ा उपचारांमुळे आज कर्करोग संपूर्णत: बरा करणे शक्य झाले आहे.

किरणोत्सारी ऱ्हासात, उत्सर्जन झाल्यानंतर, मूळ अणू एका नवीन अणुमध्ये रूपांतरित होतो. अर्धायू (हाफ-लाइफ) म्हणजे अणुंच्या ऱ्हासानंतर त्यांची संख्या अर्धी राहण्यापर्यंतचा कालावधी होय. अति-क्रियाशील मूलद्रव्ये लवकर नाहिशी होतात, तर कमी क्रियाशील मूलद्रव्ये दीर्घकाळ टिकून राहतात.

युरेनियम २३८चे अर्धायू ४५० कोटी वष्रे आहे. युरेनियमचा विविध १४ पातळींवर ऱ्हास होऊन त्याचे रूपांतर शिसे, ह्य़ा स्थिर समस्थानिकात होते. ह्य़ा प्रक्रियेला अनेक अब्ज वष्रे लागतात. म्हणूनच तो टिकून आहे. मात्र ९२हून अधिक अणुक्रमांक असलेली, प्लुटोनियमसारखी अनेक मूलद्रव्ये आहेत, ज्यांची अर्धायुष्ये अल्प असल्यानेच आज निसर्गत: ती उपलब्ध नाहीत.

नरेन्द्र गोळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

वाग्देवीचे वरदवंत

डॉ. यू. आर. अनंतमूर्ती- साहित्य

डॉ. अनंतमूर्ती यांच्या साहित्य लेखनाची सुरुवात १९५५ मध्ये झाली ती एका कथालेखनाने. त्या कथेचे नाव ‘न संपणारी गोष्ट’! याच वर्षी त्यांचा पहिला कथासंग्रह ‘एन्देन्दु मुगियद कथे’—- प्रकाशित झाला. पण आधुनिकतावादी विचारधारेतील महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांना ‘प्रश्ने’ (१९६२) या त्यांच्या दुसऱ्या कथासंग्रहापासून मान्यता मिळाली. याशिवाय त्यांचे ‘मौनी’, ‘आकाश मत्तु बेक्कु’,‘सूर्यन कुदुरे’, ‘मुरू दशकदा कथेगलु’ (१९९८) हे कथासंग्रह प्रकाशित झाले. बावली (१९६३) ते ‘मिथुन’ (१९९२) पर्यंत त्यांचे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. एक नाटक आणि काही निबंध, समीक्षासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या पाच कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या असून, त्यातील ‘संस्कार’ आणि ‘अवस्थे’ या दोन कादंबऱ्या मराठीमध्ये अनुवादित झाल्या आहेत. उमा कुलकर्णी यांनी त्यांच्या कथांचेही अनुवाद केले आहेत. ‘संस्कार’ ही कादंबरी आणि ‘घटश्राद्ध’ ही कथा- यावरील चित्रपटही गाजले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार, शिखर सन्मान पुरस्कारासह अनेक पुरस्कार, पद्मभूषणनेही ते सन्मानित आहेत.

भारतीय परंपरेतील धार्मिकता, अंधश्रद्धा, जातिव्यवस्था आणि सनातन संस्कृती यांचे दर्शन त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून घडते. दुष्ट रुढी, पुरुषप्रधान संस्कृतीने आजवर स्त्री जीवनावर केलेले निष्ठूर, क्रूर आघात यांची त्यांना मनस्वी चीड आहे. त्यांच्या साहित्यातून कन्नड संस्कृतीचे दर्शन घडते.

‘गर्भाधान’ आणि ‘घटश्राद्ध’ या कथा अनंतमूर्तीच्या करुण हृदयाचे स्वच्छ प्रतिबिंब दर्शवतात. लग्नाच्या पत्नीचा छळ करून तिला पोटगी द्यायला लागू नये म्हणून परांगदा झालेला व्यभिचारी प्रौढ शिनप्पया, मासिक पाळी गेलेल्या आणि परित्यक्ता पत्नी सीताक्काचा  गर्भाधानविधी करण्यास तयार होतो. कारण हा विधी झालेला नसेल तर त्या स्त्रीच्या पतीला मृत्यूनंतर सद्गती मिळत नाही. या स्वार्थी विचाराने तो ही रुढी पाळतो. अत्यंत उपहासगर्भ शैलीत ही कथा स्त्रीची व्यथा चित्रित करते.‘घटश्राद्ध’ मधील सोवळी बाल विधवा, आईच्या माघारी घर सांभाळते. शेजारी असणाऱ्या शाळा मास्तरच्या वासनेची बळी होते. यमुनाक्काला जगणं कठीण होऊन जाते. तेव्हा ते मास्तरच गर्भपात घडवून आणतात. तेव्हा वडील- धर्मरक्षक शेषगिरी – यमुनाक्काचे जिवंतपणी श्राद्ध करतात आणि कहर म्हणजे नंतर स्वत:च्या कोवळ्या बालिकेशी ‘स्वयंपाकाची सोय’ म्हणून विवाह करतात. या दोन्ही कथांतील स्त्रिया पुरुषी वर्चस्वाच्या ‘कर्माचे’ भोग भोगतात आणि दोन्ही स्वार्थी पुरुष धर्मरक्षक म्हणून मिरवतात. सामाजिक, कौटुंबिक, नैतिक अंगाचे दर्शन त्यांच्या कथांतून घडते.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on August 9, 2017 1:45 am

Web Title: kilogram content measurement