सहसा भाषा आणि साहित्य यांचा गणिताशी संबंध असेल असे वाटत नाही. मात्र भाषाभ्यासात गणित प्रभावीपणे वापरता येते, हे आता पुढे आले आहे. मागील काही दशकांत गणिती संकल्पना, प्रारूपे आणि पद्धती यांनी भाषाशास्त्रात वेगळी दालने उघडली आहेत.

शाब्दिक मजकूर, लेख किंवा पुस्तक वाचकांना समजणे सोपे असेल का, हे तपासण्यासाठी विविध निर्देशांक विकसित केले गेले आहेत. उदाहरणार्थ, वाचनाची सरलता मोजण्यासाठी ‘फ्लेश रीडिंग ईझ’ आणि ‘फ्लेश-किंकार्ड’ निर्देशांक. ते आता लेखनासाठी सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्यासंगणक आज्ञावलींतही समाविष्ट असतात. त्यांचा वापर करून एखादे पुस्तक विशिष्ट वयोगटासाठी उपयुक्त आहे किंवा कसे याची कल्पना मिळू शकते. तसेच लेखनातील क्लिष्टता व अस्पष्टता मोजण्यासाठी ‘धूसरता’ निर्देशांक, ‘कोलमन-लिऊ’ निर्देशांक आणि ‘लेक्सिकल डेन्सिटी टेस्ट’ असे अनेक गणिती सूचक प्रमाणित केले गेले आहेत. लेखनाचा दर्जा सुधारण्यास त्यामुळे मदत मिळते.

संगणकाने भाषांतर करणे, केलेल्या भाषांतराची वैधता तपासणे तसेच कुठल्याही भाषेची संरचना समजणे यासाठी वेगवेगळी गणिती प्रारूपे उपलब्ध झाली आहेत. या संदर्भात नोम चोम्स्की यांनी भाषेची तार्किक चौकट उभारून कळीचे योगदान केले आहे. तसेच ‘नॅरेटॉलॉजी’ म्हणजे दीर्घ वर्णनात्मक मजकुराचे विश्लेषण करण्यासाठी कंगोरी (फ्रॅक्टल) भूमितीचा आधार घेतला जातो. याचा परिणाम म्हणजे, गणिताधारित ‘कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक’ अशी ज्ञानशाखा अस्तित्वात आली असून त्यात संशोधनाला भरपूर वाव आहे.

‘ट्विटर’ आणि ‘इन्स्टाग्राम’सारख्या सामाजिक माध्यमांतून देवघेव होत असलेल्या संदेशात दडलेल्या भावनांचा व मतांचा अर्थ शोधून काढण्यासाठी विशेष गणिती आणि सांख्यिकी पद्धती निर्माण केल्या गेल्या आहेत. ‘टेक्स्ट माइनिंग’ आणि ‘सेंटिमेंट’ विश्लेषण अशी तंत्रे संगणकाद्वारे सहजपणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध अशा माहितीचा मागोवा घेतात. त्यातील तज्ज्ञ व्यक्तींना ‘सेंटिमेंट अ‍ॅनेलिस्ट’ किंवा ‘रेप्युटेशन मॅनेजर’ म्हणून चांगल्या पगाराच्या नोकऱ्याउपलब्ध आहेत. समाजमाध्यमांत होणारी ग्राहकांची चर्चा समजून ते उत्पादकांना आपली उत्पादने आणि सेवा यांमध्ये बदल करण्यास मदत करतात.

मुद्रितशोधनातही गणिताचा वापर आहे. समजा, एका लेखाचे मुद्रितशोधन ‘म’ आणि ‘स’ या तज्ज्ञांनी स्वतंत्रपणे केले. त्यांना अनुक्रमे ३६ व २८ चुका सापडल्या आणि त्यांत दोघांना सापडलेल्या सारख्या चुका २१ असतील, तर न सापडलेल्या चुका किती? संभाव्यता सिद्धान्त आणि संच सिद्धान्त वापरून न सापडलेल्या चुका (३६ ७ २८)/२१ = ४८ असे सूचित होते. थोडक्यात, भाषेच्या आणि लेखनाच्या विविध पैलूंचा अभ्यास आणि विकास यासाठी गणिती साधने कळीची ठरत आहेत.

– डॉ. विवेक पाटकर   मराठी विज्ञान परिषद, संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org