News Flash

मेंदूशी मैत्री : बागेतलं ‘शिकणं’

बागेत गेल्यावर कधी एकदा घसरगुंडीवरून घसरायला मिळतंय, असं त्यांना झालेलं असतं.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे

लहान मुलांना बागेत काय आवडतं? मोकळी हवा, झाडं, हिरवळ, खेळणी आणि त्यावर खेळणारी आपल्यासारखीच मुलं बघून त्यांना अतिशय उत्साह वाटतो. नेहमी बुटा-चपलेत असलेले पाय हिरवळीवर नाचतात. हिरवळीवरून हात फिरवणं, मातीत- चिखलात हात घालायला मिळाले, की आणखी काय हवं?

बागेत गेल्यावर कधी एकदा घसरगुंडीवरून घसरायला मिळतंय, असं त्यांना झालेलं असतं. सी-सॉ, झोके आणि विविध खेळण्यांमधून त्यांच्या मेंदूला जणू ऊर्जा पोहोचत असते. काही पालक नित्यनेमाने मुलांना घेऊन जवळच्या बागेत जातात. मुलं याचा भरपूर आनंद घेतात.

घसरगुंडी तीच आणि तशीच असली आणि झोका तोच असला, तरी मुलं त्यातून विविध प्रकारच्या वेगांचा अनुभव घेत असतात. विविध पद्धतींचे हे वेग त्यांना आवडतात. कधी वरून खाली, कधी मागं-पुढं जाणारा वेग, तर कधी वर-खाली होणारा वेग त्यांना पुन्हा पुन्हा तेच खेळण्यासाठी प्रवृत्त करतो. घसरगुंडीतून घसरल्यावर जिना चढून यावा लागतो, की पुन्हा तो काही सेकंदांचा वेगाचा अनुभव मिळतो. यात ती खूश असतात. पुन्हा पुन्हा जिना चढायलाही तयार असतात. पाच मिनिटं झोक्यावर खेळायला मिळावं म्हणून पंधरा मिनिटं रांगेत उभं राहायची त्यांची तयारी असते, कारण वेगाचा हाही अनुभव त्यांना अनुभवायचा असतो. रोज एकाच बागेत जाण्यापेक्षा अधूनमधून दुसऱ्या बागेत न्यायला हवं. बागेची रचना, वेगळी झाडं, वेगळी खेळणी आणि नवे मित्र मिळतील.

एखाद्या दिवशी टेकडीवर फिरणं त्यांना वेगळा अनुभव देऊन जाईल. टेकडीवर फिरणं हे बागेतल्या खेळण्यापेक्षा वेगळं असतं. जवळ आलेलं आकाश, खूप जास्त चढण, संध्याकाळी सूर्याचं दिसेनासं होणं, एकेक चांदणी दृश्य होताना बघण्याची संधी, ठळक होत जाणारा चंद्र आणि अंधारात अदृश्य होत जाणारी झाडं.. अशा किती तरी गोष्टी त्यांना यातून बघता येतात. आभाळाच्या खाली जमून खेळ खेळणं, चित्र काढणं, गाणी ऐकणं – म्हणणं, गप्पा मारणं यातून मिळणारा आनंद वेगळाच. मुलांना एकसाची अनुभवांतून बाहेर काढलं, तर त्यांचा मेंदू नव्या जागेतून नव्या गोष्टी शिकेल. त्यांच्यासाठी बागा आणि टेकडय़ा जिवंत ठेवायला मात्र हव्यात!

contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2019 12:38 am

Web Title: learning in the garden abn 97
Next Stories
1 कुतूहल : चंद्रशेखर मर्यादा
2 मेंदूशी मैत्री : माध्यमं
3 कुतूहल : पार्श्वप्रारणांचा शोध
Just Now!
X