श्रुती पानसे contact@shrutipanse.com

घरात वा ऑफिसात अनेकदा दोन पिढय़ांमधला विसंवाद घडतो. ते विरुद्ध हे. नवे विरुद्ध जुने. समाज बदलतो, माणसं बदलतात, विज्ञान- तंत्रज्ञानात नवे शोध लागतात. शाश्वत मूल्यं तीच असली तरी मूल्यांच्या हाताळणीत बदल होतो. अशा परिस्थितीत, पूर्वी ज्या आधारावर निर्णय घेतले, त्याच आधारावर नव्या पिढीने निर्णय घ्यावेत, हा आग्रह धरणं योग्य नसतं.

‘नव्या पिढीने स्वत:ला जे वाटतं ते सुचवावं. दोन्ही पिढय़ांनी हवा तितका वेळ घेऊन शांतपणे चर्चा करावी. अंतिम निर्णय सर्वाच्या सहमतीने झाला तर चांगलंच. अर्थातच, जो काही निर्णय घेतलेला आहे, तो कोणत्याही संदर्भात असला तरी त्या निर्णयाची जबाबदारीदेखील सर्वावर येते. या निर्णयातून चांगलं व्हावं, हीच अपेक्षा असते. पण वाईट झालं तर कोणीही कोणावर दोष ढकलू नये. ही एक शिक्षणाची प्रक्रिया आहे असं त्याकडे बघावं. निर्णयांची जबाबदारी घेतली, तरच स्वतंत्र निर्णयक्षमता विकसित होते. पण याऐवजी नुसतेच मतभेद होत राहिले तर त्यातून कोणीच काही शिकत नाही,’ हे सर्वाना माहीत असतं.

दोन पिढय़ांमधला झगडा हा खरं म्हणजे न्युरॉन्सच्या नेटवर्कचा झगडा. प्रत्येक माणूस स्वत:च्या अनुभवांवरून बोलत, वागत असतो. कोणाचे न्युरॉन्स कशा प्रकारे जोडले गेले असतील, हे सांगता येत नाही. पण प्रत्येकाला आपली बाजू खरीच वाटते. कारण ती त्याच्यासाठी खरीच असते, ज्याच्या त्याच्या मेंदूत ती साठवलेली असते.

अशा भांडणांमुळेच कित्येक वेळा माणसांमध्ये भलंमोठं अंतर पडतं. दुसरी माणसं आपलं काहीएक ऐकत नाहीत हा विचार दृढ होतो. कार्यालयामध्ये असे मतभेद झाले तर कार्यसंस्कृतीवर बरे-वाईट परिणाम होतात.

आणि घरात असं झालं,  तर घरात दुमत तयार होतं. किंवा एकाला पडती बाजू घ्यावी लागते. विशेषत: टीनएज मुलांबाबतीत भांडणं  झाली  तर लिंबिक सिस्टीम आणि फ्रंटल कॉर्टेक्समधला झगडा असतो. या काळात मुलं लिंबिक सिस्टीममधून म्हणजेच भावनांच्या केंद्रातून विचार करत असतात. आणि मोठी माणसं वैचारिक केंद्रामधून.

वास्तविक या दोन्ही केंद्रांच्या समन्वयातून निर्णय झाले पाहिजेत. नव्या-जुन्या पिढीचा झगडा हा केवळ दोन माणसांचा नाही, दोन काळांचा नाही, तर दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून मांडल्या गेलेल्या मतांचा झगडा असतो. तो मिटवता येतोच.