23 January 2021

News Flash

मनोवेध : रिकामे मन..

माणूस असे ठरवून लक्ष देतो तेव्हा त्याच्या मेंदूत वरून खाली लहरी वाहत असतात.

बाह्य़ विश्वात, शरीरात आणि मनात सतत काही तरी घडत असते आणि तिकडे माणसाचे लक्ष जात असते. लक्ष जाते त्या वेळी मेंदूत खालून वर लहरी जात असतात. त्यामुळे मनात आपोआप विचार येतात. आपण वाचत किंवा भाषण ऐकत असताना असे अन्य विचार मनात येतात. मात्र आपले लक्ष भरकटले आहे हे लक्षात आले की,ते पुन्हा योग्य ठिकाणी आणता येते. नामस्मरण किंवा एकाग्रता विकसित करणाऱ्या ध्यानाने हेच साधले जाते. माणूस असे ठरवून लक्ष देतो तेव्हा त्याच्या मेंदूत वरून खाली लहरी वाहत असतात. असे असले तरी खालून वर वाहणाऱ्या लहरी थांबलेल्या नसतात; पण तो माणूस त्याकडे लक्ष देत नसतो, त्यामुळे शरीरात किंवा मनात काय घडते आहे याचे भान त्याला नसते.

याचे काही तोटे होऊ शकतात. शरीरात तयार होणारी रसायने, त्यानुसार होणारे सूक्ष्म बदल आणि पूर्वस्मृतीनुसार तयार होणारे सूक्ष्म विचार हे निर्माण होतच असतात. भावनिक मेंदू त्यांना जाणून प्रतिक्रिया करीत राहतोच. मात्र वैचारिक मेंदूला ते समजत नसते, कारण तिकडे लक्ष दिले जात नाही. घरात कुठे तरी घाण साचते आहे, पण घरमालक रोज कापूर, धूप पेटवून सुगंध निर्माण करण्यातच गुंतलेला आहे असे झाले, तर ती घाण वाढत जाते. कापुराचा प्रभाव संपला कीती पुन्हा जाणवू लागते. असेच एकाग्रता साधना किंवा सतत स्वत:ला कशात तरी गुंतवून ठेवल्याने होऊ लागते.

रिकाम्या मनाला ‘सैतानाचे घर’ म्हटले जाते. या घराला स्वच्छ करायचे असेल तर त्यापासून पळून न जाता त्याला सामोरे जायला हवे. रोज काही वेळ काहीही न करता मनात आपोआप येणाऱ्या विचारांना, भावनांना आणि शरीरात जाणवणाऱ्या संवेदनांना जाणून त्यांचा स्वीकार करायला हवा. अशा प्रकारे माणूस लक्ष देतो तेव्हा मेंदूत तळातून वर वाहणाऱ्या लहरींमुळे जे काही निर्माण होत असते ते जाणत असतो. या लहरी सतत चालू असतात, त्यांनाच आपण ‘सुप्त मन’ म्हणू शकतो. वैचारिक मेंदूने त्यांना हे पापी, हे घाणेरडे अशा प्रतिक्रिया करीत राहिल्याने त्या नष्ट होत नाहीत, दडपल्या जातात. शांत बसले की पुन्हा प्रकट होऊ लागतात. त्यांना प्रतिक्रिया दिली नाही तरच सुप्त मनदेखील स्वच्छ होते. हेच साक्षीध्यान. त्यासाठी रोज काही वेळ काहीही न करता रिकामे बसायला हवे.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 1:46 am

Web Title: loksatta manovedh empty mind zws 70
Next Stories
1 मनोवेध : ‘मी’चे गाठोडे
2 कुतूहल : वन्यजीव न्यायवैद्यकशास्त्र
3 मनोवेध : भावनांची विकृती
Just Now!
X