भक्ती किंवा भीती या भावनांचा परिणाम म्हणून वास्तवात नसलेल्या प्रतिमा दिसू शकतात. मेंदूत काही रासायनिक बदल झाल्यानेही असे होऊ शकते. ‘स्किझोफ्रेनिया’ आजारात ही दृश्ये खरीच आहेत असे वाटते. त्यावरील आधुनिक औषधे परिणामकारक असून, ती घेतली की हे भास कमी होतात. अशी दृश्ये हे वास्तव नसून भास आहे याचे भान वाढले, तर ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी करता येतात. काही वेळा हे भास आहेत याचे भान असले तरी या दृश्यांची भीती वाटते. ती मानसोपचाराने कमी होते. भीतीदायक दृश्ये पुन:पुन्हा दिसली तर, आकर्षणाच्या सिद्धांतानुसार, खरेच तसे घडेल अशी भीती अनेकांना असते. पण ती चुकीची आहे.

कल्पनांना योग्य प्रयत्नांची जोड नसेल तर कितीही काळ त्यांचे ध्यान केले तरी त्या वास्तवात येत नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही हातांची घडी घालून खुर्चीत बसला आहात आणि समोर मेजावर एक पेन ठेवले आहे. शरीराची कोणतीही हालचाल न करता समोरील पेन हातात येत आहे, असे दृश्य कल्पनेने कितीही वेळ पाहत राहिलात तरी तसे प्रत्यक्षात घडणार नाही. हे जसे ‘घडावे’ याविषयी खरे आहे, तितकेच ‘घडू नये’ याविषयीही खरे आहे. म्हणजे प्रिय व्यक्तीच्या मृत्यूची प्रतिमा दिसली म्हणून तसे प्रत्यक्षात घडत नाही. अशा कोणत्याही भीतीदायक दृश्याचा त्रास कमी करण्यासाठी साक्षीध्यान उपयुक्त ठरते. अशा दृश्यामुळे भीती वाटू लागली, की त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष द्यायचे आणि त्यांचा स्वीकार करायचा. असे केल्याने भीतीची प्रतिक्रिया कमी होते.

एखादी त्रासदायक प्रतिमा पुन:पुन्हा नजरेसमोर येत असेल तर हेच दृश्य प्रयत्नपूर्वक कल्पनेने पाहायचे, पण त्याची गती बदलायची. आपण दृक्मुद्रण ‘फास्ट फॉरवर्ड’ करतो तसे हे दृश्य करायचे किंवा त्याला ‘अ‍ॅनिमेटेड’ करायचे. प्रतिमा कल्पनेने संपादित करायची. त्यातील आकार बदलायचे, रंग बदलायचे. आवाज ऐकू येत असेल तर त्याचाही ‘टोन’ बदलायचा. एखाद्या व्यंगचित्र-पात्राचा आवाज त्याला द्यायचा आणि ते कल्पनेने अनुभवायचे. असे केल्याने त्या दृश्य किंवा श्राव्य विचाराचे गांभीर्य निघून जाते. असे दृश्य दिसू नये अशी प्रतिक्रिया माणूस करीत राहतो, त्यामुळे त्याची स्मृती अधिक बळकट होत जाते आणि पुन:पुन्हा दिसते. वरील तंत्राने ही प्रतिमा हास्यास्पद होते आणि हळूहळू स्मरणातून निघून जाते.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com