19 September 2020

News Flash

मनोवेध : भावनांच्या वादळातील नांगर

कृतीचा नियमित सराव ही दुसरी पायरी असते. अशा सरावाने कौशल्य विकसित होते.

डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

‘न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग’मध्ये कृतीतील उत्कृष्टता साधण्यासाठी सहा टप्पे सांगितले जातात. हेच प्रयत्न त्या व्यक्तीची सर्वागीण उन्नती करू शकतात. बरीच माणसे त्यांच्या वातावरणाचा परिणाम म्हणून घडत किंवा बिघडत असतात. त्यामुळे पहिला टप्पा वातावरण समजून घेणे हा असतो. गाडी चालवण्याच्या कौशल्यात उत्कृष्टता आणायची असेल तर रस्ते, इतर गाडय़ा, चालणारी माणसे, खड्डे यांकडे लक्ष द्यावे लागते. त्यानंतर गाडी चालवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. कुशल चालक गाडी कशी चालवतो, याचे निरीक्षण करून त्यानुसार सुधारणा कराव्या लागतात. कितीही चुका झाल्या तरी शिकणे बंद करणार नाही, असा निर्धार करावा लागतो. प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी मानसिक तालीम म्हणजे ‘गाडी चालवत आहोत’ असे कल्पनादर्शन ध्यान उपयुक्त असते.

कृतीचा नियमित सराव ही दुसरी पायरी असते. अशा सरावाने कौशल्य विकसित होते. मग ‘मी एकटय़ाने गाडी नेऊ शकते/शकतो’ असा आत्मविश्वास वाटू लागतो. ही तिसरी पायरी असते. या पायरीवर स्वत:च्या मनातील समज आणि मूल्ये यांचा विचार महत्त्वाचा असतो. गाडी चालवण्यास शिकल्याने ‘मला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही’ म्हणजे ‘स्वातंत्र्य आणि स्वावलंबन हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे’ याचे भान येते. त्यामुळे स्वत:ची वेगळी ओळख- ‘आयडेन्टिटी’ निर्माण होते. ही पाचवी पायरी. सहावी पायरी म्हणजे, या व्यक्तिगत आयडेन्टिटीच्या पल्याड जाऊन स्वत:तील कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी केला जाऊ लागतो.

मात्र या प्रवासात अनेक वेळा अपयश, अस्वस्थता येते. त्यावर मात करण्यासाठी ‘अँकिरग तंत्र’ उपयोगी आहे. त्यामध्ये आपण एखादी कृती चांगली करीत असतो, उत्साही, आनंदी असतो तो प्रसंग आठवून, त्या प्रसंगाशी टिचकी वाजवण्यासारखी कृती किंवा प्रकाशकडे असे दृश्य जोडून ठेवायचे. त्यासाठी तो प्रसंग आठवून ती कृती किंवा कल्पनादर्शन पुन:पुन्हा करायचे. ही टिचकी किंवा दृश्य म्हणजे ‘अँकिरग पॉइंट’ होय. म्हणजे मनात अस्वस्थता असेल, आपल्याला गाडी चालवण्यास जमेल की नाही अशा शंका मनात येऊ लागतील, त्या वेळी टिचक्या वाजवायच्या किंवा प्रकाशकडे कल्पनेने पाहायचे. ते उत्साही मन:स्थितीशी जोडलेले असल्याने त्या वेळच्या भावना बदलतात, आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक व्यक्ती सजगतेने असे स्वत:च्या भावना बदलवणारी चुटकीसारखी छोटीशी कृती भावनांच्या वादळातील नांगर म्हणून तयार करू शकते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2020 2:45 am

Web Title: loksatta manovedh neuro linguistic programming zws 70
Next Stories
1 मनोवेध : भाषा आणि मानसिकता
2 कुतूहल : पर्यावरण आणि विकासाची सांगड
3 मनोवेध : सवयींचे मेंदूविज्ञान
Just Now!
X