05 August 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : अनुभवकक्षेच्या पलीकडे..

लहानपणी मिळालेल्या अनुभवांनी लुई ब्रेल यांना योग्य दिशा दाखवली

लुई ब्रेल

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

ठरावीक अनुभवकक्षा विस्तारण्याचं महत्त्व खूपच असतं. जे अनुभव सहजपणे मिळतात, त्यापेक्षा वेगळे प्रयत्न करणं, विविध अनुभव जाणीवपूर्वक देणं हे आवश्यक असतं. असंच एक उदाहरण लुई ब्रेल यांचं! एका अपघातात लुई ब्रेलची दृष्टी गेली, तेव्हा तो तीनच वर्षांचा होता. गावातल्याच काय; पण घरातल्या लोकांच्या दृष्टीनंही आता हा आयुष्यभर काय करणार, असेच भाव होते. पण गावातले धर्मगुरू अ‍ॅबे पॅले यांनी त्याला गावात खूप फिरवलं. जमेल तेवढं जग दाखवलं. फुलं-पानं दाखवली, त्यांचे स्पर्श कसे असतात, याची जाणीव करून दिली. या फिरण्यामुळेच त्याला असं लक्षात आलं की, आपल्याला सगळं समजतं. वाचता आलं की झालं! फक्त तेवढीच काय ती कमतरता आपल्यात आहे.

वाचता यायला हवं, या तीव्र इच्छेतूनच त्यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला. लहानपणी मिळालेल्या अनुभवांनी लुई ब्रेल यांना योग्य दिशा दाखवली. पण लुई यांच्या घरच्यांप्रमाणे पॅलेही हरले असते आणि त्यांनी त्याला जगाची ओळख करून दिली नसती तर? लुई यांच्या अनुभवकक्षा विस्तारण्याचं महत्त्वाचं काम केलंच नसतं तर?

डेव्हिड ह्युबेल आणि टॉर्स्टन विझेल या संशोधकांनी असं दाखवलं आहे की, सर्वच मुलं लहानपणापासून अनेकविध अनुभव घेण्यासाठी केवळ उत्सुकच नव्हे; तर अक्षरश: भुकेली असतात. जे अनुभव येतील त्याचा ते आपापल्या परीनं- विचारशक्तीनुसार अर्थ लावतात आणि मेंदूत साठवून ठेवतात. याला विशेष मुलंही अपवाद नाहीत.

विशिष्ट वयोगटात मुलांना योग्य ते अनुभव दिले, तर मुलं त्याद्वारा पटकन शिकतात. याला ह्युबेल आणि विझेल यांनी ‘विण्डोज ऑफ अपॉर्चुनिटी’ असं म्हटलं आहे. त्या-त्या वयात आवश्यक त्या संधी देणं हे काम शिक्षक आणि पालकांचं आहे. भाषा, संगीत, विविध कौशल्यं शिकण्याच्या, अनुभवण्याच्या संधी त्या-त्या वयात मिळाव्यात. मुलांच्या सामाजिकीकरणाचा भागही महत्त्वाचा आहे. त्यांच्या मनात सामाजिकीकरणाची नैसर्गिक ओढ निर्माण होण्यासाठी समाजात मिसळण्याची  संधी मिळाली पाहिजे.

विशेष मुलांना समजून घेणारी यंत्रणाही सक्षम हवी. ती विकसित करण्यावर भर द्यायला हवा. म्हणून सर्वच मुलांच्या अनुभवकक्षा विस्तारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2019 12:00 am

Web Title: louis braille experience and brain zws 70
Next Stories
1 कुतूहल : युद्धजन्य मूलद्रव्य
2 मेंदूशी मैत्री : समाजाची प्रतिकृती- वर्ग
3 कुतूहल : अणुविखंडन!
Just Now!
X