News Flash

नवदेशांचा उदयास्त : मालदीव बेटांवर परकीय-प्रवेश

भारताच्या नैर्ऋत्येला हिंद महासागरातील मालदीव बेटांवर १९३२ पर्यंत अरबी इस्लामी सल्तनतींचा अंमल होता.

नवदेशांचा उदयास्त : मालदीव बेटांवर परकीय-प्रवेश
मालदीवमधील कष्टकऱ्यांचं हे चित्रण १६ व्या शतकातील पोर्तुगीज चित्रकारांनी केलेलं..

भारताच्या नैर्ऋत्येला हिंद महासागरातील मालदीव बेटांवर १९३२ पर्यंत अरबी इस्लामी सल्तनतींचा अंमल होता. साहजिकच त्यामुळे तेथील जनतेवर अरबी संस्कृती व इस्लामचा पगडा बसला आणि तसा तो सध्याही दिसून येतो. मालदीवज् या नावाची व्युत्पत्ती दोन प्रकारे सांगितली जाते. श्रीलंकेच्या प्राचीन इतिहासात या बेटांचे वर्णन महेलादिवा म्हणजे स्त्रियांचे बेट या अर्थी केलेले आहे. काही तज्ज्ञांचे मत असे की, मालदीवज्चे प्राचीन नाव मालाद्वीप असावे, पुढे त्याचा अपभ्रंश मालदीव झाला असावा. सन १५५८ मध्ये पोर्तुगीज व्यापारी इथे येऊ लागले. त्यांनी मालदीवज्मध्ये व्यापारी पेढी उघडून छोटी वस्ती वसवली आणि काही सैन्यही ठेवले. या वस्तीचे प्रशासन गोव्यातील पोर्तुगीज वसाहतीकडे होते. पोर्तुगीजांनी तिथे व्यापाराखेरीज ख्रिस्ती धर्मप्रसारावर भर दिला. हा धर्मप्रसार मालदीवच्या सुलतानाला न पटल्याने त्याने पोर्तुगीजांना मालदीवच्या बाहेर हुसकले. एकूण १५ वर्षे पोर्तुगीज वस्ती या बेटांवर होती. सतराव्या शतकाच्या मध्यास या बेटांवर व्यापारानिमित्ताने डच येऊ लागले. डचांनी पोर्तुगीजांचे उदाहरण पाहून मालदीवज्मध्ये धार्मिक हस्तक्षेप किंवा त्यांच्या परंपरांविषयी मतप्रदर्शन केले नाही. सिलोनमध्ये पूर्वी पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. परंतु डचांनी पोर्तुगीजांना हटवून तिथे वर्चस्व प्रस्थापित केले. पुढे त्याचीच पुनरावृत्ती मालदीवज्मध्ये झाली आणि तिथे डचांनी आपले बस्तान बसवले. अनेक बाबतींत मालदीवचा सुलतान डचांची मदत आणि संरक्षण घेत असे.

पुढे ब्रिटिशांनी डचांचाच कित्ता गिरवला. १७९६ साली ब्रिटिशांनी सिलोनमधून डचांची पीछेहाट करून तिथे संरक्षक म्हणून प्रवेश करीत वर्चस्व निर्माण केले. सिलोनच्या पाठोपाठ ब्रिटिशांनी मालदीवज्मध्ये प्रवेश करून तेथील सुलतानांच्या गरजा हेरून मदतीचे आमीष दाखवीत, व्यापार करता करता हातपाय पसरायला सुरुवात केली. पुढे १८८७ मध्ये ब्रिटिश आणि सुलतान यांच्यात एक औपचारिक करार झाला. या करारान्वये मालदीवच्या संरक्षणाची जबाबदारी व परकीय देशांशी व्यवहारांची जबाबदारी ब्रिटिशांनी घेतली. मालदीवचे अंतर्गत प्रशासन आणि इस्लामी संस्था यांत मात्र ब्रिटिशांनी काहीही हस्तक्षेप न करण्याचे करारात ठरले. मोबदल्यात काही ठरावीक खंडणी व व्यापारी हक्क ब्रिटिशांनी मिळवले.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2021 12:01 am

Web Title: maldives islands information maldives islands history zws 70
Next Stories
1 कुतूहल – जॉन फॉन नॉयमन
2 नवदेशांचा उदयास्त – मालदीवज्
3 कुतूहल : द्यूत सिद्धांताची वाटचाल 
Just Now!
X