सतराव्या शतकाच्या पूर्वार्धापासून भारतात आलेल्या युरोपियन ख्रिस्ती मिशनऱ्यांनी एतद्देशीय लोकांमध्ये आपले ख्रिश्चन धर्मप्रसार आणि धर्मातराचे कार्य अधिक परिणामकारक व्हावे म्हणून भारतीय भाषांचा अभ्यास केला. पुढे युरोपियन लोक ज्या ज्या प्रदेशात राज्यकत्रे बनले तेथील प्रजेची सुखदुखे कळून घेण्याकरिता असो किंवा आपले आसन अधिक बळकट करण्याकरता म्हणून असो, लोकभाषेचा अभ्यास त्यांनी करताना त्या भाषेची व्याकरणे, कोश तयार केले, धार्मिक प्रचाराचे साहित्य निर्मिती करून त्याची पुस्तकेही मुद्रित केली. पण धर्मप्रचार साहित्यावरच न थांबता कंपनी सरकार आणि ब्रिटिश राजसत्तेच्या नोकरवर्गाने व्याकरण, इतिहास, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, गणितशास्त्र या विषयांतही मराठी भाषेत लिहून त्याची पुस्तक निर्मिती केली. अर्वाचीन मराठी वाङ्मयात गणितविषयक ग्रंथांची निर्मिती करणारा पहिला ग्रंथकार म्हणून कॅप्टन जर्व्हिसची ओळख आहे. जॉर्ज रित्सो जर्व्हिसचा जन्म १७९४ मध्ये इंग्लंडमध्ये झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्याची निवड बुलवीच येथील रॉयल मिलिटरी अकॅडमीमध्ये कॅडेट म्हणून झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या सेमिनरीमध्ये तो उत्तीर्ण होऊन १८११ साली त्याची नियुक्ती भारतात झाली. १८१८ साली पेंढाऱ्यांच्या युद्धात त्याने भाग घेतला आणि पुढे चार वर्षांनी चीफ इंजिनीयरचा साहाय्यक म्हणून त्याची नियुक्ती झाली. काही काळानंतर त्याच्या नियुक्त्या पुणे विभागाचा इन्स्पेक्टिंग इंजिनीयर, दक्षिण आणि उत्तर प्रांत विभागांचा सुपरिंटेंडिंग इंजिनीयर, चीफ इंजिनीयर, बोर्ड ऑफ एज्युकेशनचा सभासद म्हणून करण्यात आल्या. जॉर्ज जर्व्हिसच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीच्या काळात माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबई इलाख्याचा गव्हर्नर झाल्यावर एतद्देशीय लोकांच्या शिक्षणासाठी त्याने नेटिव्ह स्कूलबुक आणि स्कूल सोसायटी ही संस्था स्थापन केली.  या सोसायटीचा सेक्रेटरी जर्व्हिसने सोसायटीसाठी मराठी भाषेत गणित आणि भूमितीशास्त्रविषयक ग्रंथ स्वत लिहिले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com