News Flash

मोजमापनाचे प्रमाणीकरण (१)

मोहंजोदडो येथील उत्खननात अनेक प्रकारची वजने, मापे आणि नाणी सापडली आहेत

(चित्रसंदर्भ : thehistoryhub.com)

मोजमापनाचे महत्त्व फार पूर्वीच लक्षात आल्याचे आणि त्यासाठी विविध संस्कृतींनी विकसित केलेल्या व्यवस्थांचे दाखले उपलब्ध आहेत. मोहंजोदडो येथील उत्खननात अनेक प्रकारची वजने, मापे आणि नाणी सापडली आहेत; तसेच काही मोजपट्टय़ाही मिळाल्या आहेत ज्यामध्ये लांबी मोजण्याचे प्रमाणित एककदेखील (दोन िबदूंमधील अंतराचे माप) आढळले आहे जे आजच्या ३३.५३ मिलिमीटर इतके आहे. याबाबतीत सापडलेल्या सर्व माहितीचा अर्थ अजून समजलेला नाही.

मनूने त्याच्या ‘मनुस्मृती’ या ग्रंथात (इसवीसनपूर्व ४०० वष्रे) १३ प्रकारच्या वजनांची मांडणी दिली असून त्यांचा एकमेकांतील संबंध सांगितला आहे. त्याने असेही लिहिले आहे की, शासनकर्त्यांने दर सहा महिन्यांनी बाजारात असलेली सर्व वजने तपासली जातील अशी यंत्रणा निर्माण करून त्याबाबतीत दोषी आढळलेल्या सर्व व्यक्तींना शिक्षा केली पाहिजे.

कौटिल्याने त्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात वजने आणि मोजमापन (इसवीसनपूर्व ३०० वष्रे) यांच्या विश्वासार्हतेसाठी प्रशासकीय यंत्रणा कशी असावी, याचा सविस्तर तपशील दिला आहे.

बायबलसारख्या धर्मग्रंथातही मोझेसने चुकीची वजने आणि दोषयुक्त मापन करणे टाळावे आणि बरोबर मोजमाप करणारे तराजू आणि वजने आणि मापन-पद्धती वापरल्या जाव्यात, असे निक्षून सांगितले आहे.

वरील संदर्भावरून लक्षात येते की, अचूक मोजमापन केले जावे हे अनेक पातळ्यांवरून फार पूर्वीपासून िबबवले जात होते.

मात्र विखुरलेल्या समुदायांत, प्रांतांत किंवा देशांत मोजमापनाची एकके वेगवेगळी होती, कारण ती त्यांच्या गरजांनुसार निर्माण झाली होती.

पुढे दूरच्या सागरसफरी नियमितपणे सुरू झाल्या आणि व्यापार आंतरराष्ट्रीय स्तरावर घडू लागला. तसे सागरी अंतरे आणि दिशा यांचे मोजमापन करण्याची उच्च दर्जाची उपकरणे निर्माण करण्यावर भर दिला जाऊ लागला. तसेच मालाचे वजन आणि किमती ठरवणे यासाठी सुसूत्रीकरणाची निकड भासू लागली. याबाबतीत उत्तम उदाहरण म्हणजे आगगाडीचा प्रवास नियमितपणे सुरू झाल्यावर त्याचे वेळापत्रक तयार करण्यासाठी वेळ मोजणे आणि तो दर्शवणे यांची पद्धत प्रमाणित करणे हे सर्वदूर अनिवार्य झाले. सारांश हा की, मोजमापनाचे प्रमाणीकरण ही काळाची गरज झाली.

डॉ. विवेक पाटकर  

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

 ‘साहित्यिकाचा स्वधर्म

मल्याळी वाचक व साहित्यिक गोविंद शंकर कुरूप यांना ‘जी’ नावाने ओळखतात. तसंच सारेजण ‘पंडित जी’ या नावानेही ओळखतात. ‘पंडित’ ही त्यांना मिळालेली पदवी आहे.

स्थळ-काळ-भाषा यांच्या मर्यादेपलीकडे पोहचते ते खरे काव्य- असा पंडितजींचा विश्वास होता. आम्ही आमच्या देशातल्या, दुसऱ्या प्रांतातल्या साहित्याची नोंद घेण्यात, कदर करण्यात फार उदासीन असतो. ही उदासीनताच आपल्या एकात्मतेच्या मार्गातील अडथळा आहे. ही वेदना त्यांनी एका चर्चेच्या वेळी बोलून दाखविली होती.  ते म्हणतात-‘‘‘महान साहित्यिक हा त्याच्या युगातील सामाजिक चैतन्याचा प्रतिनिधी असतो. याकरिता त्याने समाजाच्या बाह्य़ आणि आंतरिक प्रवृत्तीचे, सखोल आणि व्यापक निरीक्षण केले पाहिजे. चालू जमान्याच्या परिस्थितीतून निर्माण होणारे सामाजिक अन्याय, अत्याचार व शोषण यांच्याविरुद्ध आवाज उठवणे ही साहित्यिकावरील जबाबदारी आहे. हा त्याचा स्वधर्म आहे.’’

१९६५ चा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कुरूपजींना मिळाला. त्यावेळी केलेल्या भाषणात ते म्हणतात- ‘‘भारतीय ज्ञानपीठाचा हा प्रथम सन्माना’चा कुंकुमतिलक माझ्या कवितेच्या ललाटी चमकला, तेव्हा माझ्या प्रांतातील लोकांना खूप आनंद झाला. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात भारतीय ज्ञानपीठाला एक अनन्यसाधारण प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे.. .. ..

यापेक्षाही श्रेष्ठ आणि मनोरंजक साहित्यकृती पुढील शोधमोहिमेत हाती लागतील याची मला खात्री आहे.’’

‘‘एखाद्या रत्नाला कितीतरी पैलू असतात. भारतीय हृदयाचे विविध पैलू म्हणजे भारतीय भाषा आहेत. कदाचित राजकीय अविवेकामुळे भाषेतील विविधता ही अडचण वाटू लागलेली असेलही, पण आत्माभिव्यक्तीसाठी भाषेकडे पाहणाऱ्या लोकांना हे वैविध्य अनुग्रहाप्रमाणे वाटत असणार.. विभिन्न भाषेचे हे स्वर भारतासारख्या विशाल देशाच्या हृदयातील भाव समग्ररूपात अभिव्यक्त करण्यासाठी साहाय्यक ठरतात. हे सत्य ज्यावेळी आपल्याला समजेल, त्यावेळी आपल्या मनातील क्षुद्र भावना आपण दूर करू शकू.’’

‘‘.. माझ्या काव्यलेखनातून, माझ्या देशवासीयांना जवळ आणण्याचं, या अवकाशाला व्यापून उरण्याची धडपड करण्याचं बळ मला मिळालं आहे. मी आशा करतो की, वाचकांच्या हृदयातील माझ्या काव्याचं स्थान कधीही ढळणार नाही.’’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 3:58 am

Web Title: measurement certification
Next Stories
1 साने गुरुजींबद्दल आदर
2 गोविंद शंकर कुरूप- (१९६५)
3 ५१ पैकी फक्त सात जणी?
Just Now!
X