News Flash

जीवित सूक्ष्मजीवांचे मोजमापन

जीवित मोजणी (व्हायेबल काउंट) पद्धत सूक्ष्मजीवांसाठी विशेषत: जीवाणूंसाठी वापरतात. 

जीवशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील प्रयोगांमध्ये पेशींचे मोजमापन ही एक आवश्यक बाब आहे. प्राणी, वनस्पती किंवा जीवाणू यांच्या पेशी अतिशय सूक्ष्म असल्यामुळे डोळ्यांनी पाहून त्या मोजणे अशक्य असते. म्हणूनच त्या मोजण्यासाठी विशिष्ट पद्धती वापराव्या  लागतात. या मोजमापनाच्या काही पद्धती सोप्या तर काही अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर आधारित आहेत. या भागात आपण अशाच पारंपरिक पद्धतींची माहिती करून घेऊ.

जीवित मोजणी (व्हायेबल काउंट) पद्धत सूक्ष्मजीवांसाठी विशेषत: जीवाणूंसाठी वापरतात.  या पद्धतीची मध्यवर्ती संकल्पना अशी आहे की, सूक्ष्मजीव विशिष्ट माध्यमात व पूरक तापमानात वाढवले तर एका ठरावीक वेळेनंतर एका पेशींचे एका वसाहतीत रूपांतर होते. याद्वारे जिवंत असलेल्या सूक्ष्मजीवांचा अचूक अंदाज येऊ शकतो.

या पद्धतीत कोणताही घन किंवा द्रवपदार्थ आपण नमुना म्हणून वापरता येतो. उदाहरणार्थ  माती, पाणी, कोणताही खाद्यपदार्थ, पेये, औद्योगिक कच्चा माल किंवा उत्पादित पदार्थ, इत्यादी.

१ ग्रॅम किंवा १ मिलिलिटर नमुना घेऊन यात विशुद्ध केलेला मिठाचा द्रव (सलाईन) विशिष्ट प्रमाणात घालून तो सौम्य केला जातो. जीवाणूंची संख्या जेवढी जास्त, द्रव तेवढा जास्त सौम्य करावा लागतो. त्यातील १ मिलिलिटर द्रव एखाद्या योग्य माध्यमावर पसरवला असता,  डोळ्यांनी मोजता येण्याइतक्या वसाहती  (कॉलनीज) तयार होतात. एका जीवाणूचे द्विविभाजन होऊन त्याच्या दोन, चार, आठ,  सोळा या गतीने पेशी निर्माण होतात व सुमारे एक दिवसानंतर एका पेशीपासून एक वसाहत तयार होते. जेवढय़ा जास्त वसाहती म्हणजे  तेवढे जास्त जीवाणू त्यात आहेत. याचाच अर्थ नमुन्यांच्या सान्निध्याचा सूक्ष्मजीवांच्या वाढीवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही.

जीवाणूंसाठी वापरलेल्या माध्यमात विशिष्ट बदल केल्यास व त्यात रंजक द्रव्ये घातल्यास ते माध्यम निवडक (सिलेक्टिव्ह) माध्यम म्हणून वापरले जाते. त्यावर विविध जीवाणू वेगळे ओळखता व मोजता येतात. उदा. विहिरीच्या पाण्याचा नमुना घेऊन तो एखाद्या निवडक माध्यमावर घेतला तर त्यातील टायफॉईडचे, अतिसाराचे आणि आमांशाचे जिवाणू एकाच प्रयोगात मोजणे शक्य आहे.

जीवित मोजमापनाची आणखी एक झटपट पद्धत म्हणून काही विशिष्ट रंगद्रव्ये वापरूनही मोजणी करता येते. उदा ट्रिपॅनब्लुइओसीन, एरिथ्रोसीन हे रंग जीवित पेशींच्या फक्त पेशीभित्तिकेस रंग देतात व मृतपेशींच्या आत प्रवेश करून पूर्ण पेशीस रंग देतात. त्यामुळे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केल्यास जीवित आणि मृत पेशींमधील फरक सहज कळतो.

डॉ. अपर्णा दुभाषी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

श्रीलाल शुक्ल- साहित्य व सन्मान

कथा, कादंबरी, व्यंग्यकथासंग्रह, निबंध आणि समीक्षा अशा विविध साहित्य प्रकारात श्रीलाल शुक्ल यांनी लेखन केले आहे. हिंदीतील ते एक यशस्वी लेखक आहेत. १९५४ मध्ये त्यांची ‘स्वर्णग्राम और वर्षां’ ही पहिली व्यंग्यकथा (उपहासात्मक) प्रकाशित झाली आणि त्यांची पहिली कादंबरी ‘सूनी घाटी का सूरज’ १९५७ मध्ये प्रकाशित झाली. त्यांची सर्वात लोकप्रिय कादंबरी आहे- ‘राग दरबारी’ (१९६८). या व्यतिरिक्त ‘सीमाएँ टूटती है’ ‘मकान’, ‘विश्रामपूर का संत’ इ. कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत. ‘यह घर मेरा नही’ आणि ‘इस उम्रमें’ हे कथासंग्रह- ‘अंगदका पाँव’, ‘यहाँसे वहाँ’ आणि ‘जहालत के पचास साल’ हे व्यंग्यकथा संग्रह तसेच, निबंध, समीक्षात्मक लेखन, बालसाहित्य प्रकाशित झाले आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय समाजातील ढासळणाऱ्या मूल्यांवर त्यांनी आपल्या लेखनातून भाष्य केले आहे. ‘विश्रामपूर का संत’ ही समकालीन जीवनाची अशी महागाथा आहे, की जी अनेक स्तरांवर असून कादंबरीचा आवाका खूप विस्तीर्ण आहे.

एकीकडे भूदान आंदोलनाची पाश्र्वभूमी असलेल्या या कादंबरीत स्वातंत्र्योत्तर भारताच्या सत्तेच्या राजकारणाचे, लोकशाहीचे दर्शन घडते, तर दुसरीकडे एक भूतपूर्व तालुकेदार आणि राज्यपाल कुँवर जयंतीप्रसाद सिंहाच्या मानसिक आंदोलनाचे, त्यांची महत्त्वाकांक्षा, अतृप्ती, आत्मवेदनेत गुरफटलेल्या त्यांच्या आयुष्याचे दर्शन घडते. पण यात सरंजामशाहीप्रवृत्तीचे दर्शन नाही तर या निमित्ताने जीवनात सार्थकता शोधण्याची वृत्ती दिसते. सशक्त जाणीव दिसते. कथेला मिळालेल्या कलाटणीमुळे हा शोध जीवनात सार्थकता शोधण्याची ही वृत्ती अधुरीच राहते. ‘राग दरबारी’ नंतरची ही कादंबरीही सशक्तआहे.

श्रीलाल शुक्ल यांच्या कादंबऱ्यांचे इंग्रजी आणि अन्य अनेक भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत.  ‘राग दरबारी’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार  (१९७०), ‘मकान’ कादंबरीला मध्य प्रदेश हिंदी साहित्य परिषद पुरस्कार (१९७८), लोहिया सन्मान (१९९४), पद्मभूषण (२००८) हे सन्मान व पुरस्कार त्यांना ‘ज्ञानपीठ’च्या आधी मिळाले. तसेच उत्तर प्रदेशांतील भारतेन्दु नाटय़ अकादमीचे संचालकपद (१९७९-८०)  साहित्य अकादमीच्या सल्लागार समितीचे अध्यक्षपद (१९८२-१९८६) अशी मानाची व जबाबदारीची पदे त्यांनी भूषविली आहेत.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:08 am

Web Title: measuring live microorganisms
Next Stories
1 जैवरासायनिक ऑक्सिजन मागणी
2 सॉफ्टवेअरचे मापन
3 माहितीचा वेग
Just Now!
X