वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर वस्त्रोद्योगातील उत्पादनांचा वापर केला जातो. या सर्व प्रकारच्या वस्त्रांना वैद्यक तंत्र वस्त्रे असे संबोधले जाते. आरोग्यशास्त्र, स्व-काळजी आणि शस्त्रक्रिया या सर्व विभागांमध्ये वैद्यक तंत्र वस्त्रांचा उपयोग होतो. वैद्यक तंत्र वस्त्रे हे एक अतिशय वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. हे क्षेत्र म्हणजे वैद्यकीय शास्त्र आणि वस्त्रोद्योग तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम आहे. वैद्यक उपयोगानुसार वैद्यक तंत्र वस्त्रांचे वर्गीकरण करण्यात येते. जसे संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक वस्त्रे, बॅडेज व दाब देणारी वस्त्रे, जखमेवर बांधावयाची वस्त्रे, आरोग्यदायक वस्त्रे, रोपण वस्त्रे.
वैद्यक तंत्र वस्त्रांसाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थामध्ये अ-रोगोत्पादकता (नॉन टॉक्सिसिटी), प्रतिसाद रोगप्रवण नसणे, जंतूरहित करण्याची क्षमता, जैव सुसंगतता, उत्तम आकारमान स्थिरता, चांगली ताकद, लवचीकता हे गुणधर्म असणे अत्यंत आवश्यक आहे.
वैद्यक तंत्र वस्त्रांसाठी तंतू, सूत व धागा आणि कापड या तीनही प्रकारांचा उपयोग करण्यात येतो. ज्या उपयोगासाठी ही वस्त्रे वापरली जातात त्यानुसार या वस्त्रांमध्ये शोषकता, तन्यता, लवचीकता, मऊपणा, जैविक स्थिरता किंवा जैविक विघटनक्षमता या गुणधर्माची आवश्यकता असते. वैद्यक तंत्र वस्त्रांसाठी पारंपरिक नसíगक व मानवनिर्मित तंतूंबरोबरच या उपयोगासाठी विकसित केलेल्या काही विशेष तंतूंचा वापर केला जातो.
कापूस व रेशीम या नसíगक तंतूंबरोबरच व्हिस्कोज या पुनíनर्मित आणि पॉलिस्टर, नायलॉन, काच आणि कर्ब या संश्लेषित तंतूंचा वापर वैद्यक तंत्र वस्त्रे बनविण्यासाठी करण्यात येतो. वैद्यकीय उपयोगासाठी काही विशेष तंतू खास करून विकसित केले गेले आहेत. यापकी कोलॅजेन हा तंतू जनावराच्या कातडीमधील प्रथिनापासून बनविण्यात येतो. हा रेशमाइतका ताकदवान असून जैव विघटनक्षम असतो. याचा उपयोग शस्त्रक्रियेनंतर जखमा शिवण्यासाठी होतो. कॅल्शियम अल्जिनेट हा तंतू समुद्राच्या तळाशी सापडणाऱ्या वनस्पतीपासून तयार करण्यात येतो आणि या तंतूंचा उपयोग गंभीर प्रकारच्या जखमा लवकर भरून येण्यासाठी ज्या पट्टय़ा वापरण्यात येतात त्या तयार करण्यासाठी होतो. कायटीन हा तंतू खेकडे आणि कोळंबी यांपासून तयार करण्यात येतो. हा तंतू शरीरामध्ये विरघळून जाऊ शकतो. जखमा भरून येण्यासाठी तसेच कृत्रिम त्वचा म्हणून या तंतूपासून बनविलेल्या कापडाचा वापर करण्यात येतो.
चं. द. काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्थानांची बखर – त्रावणकोरचे चोख प्रशासन
त्रावणकोरच्या राजेपदावर इ.स. १८४६ ते १८६० अशी कारकीर्द झालेला उथरम थिरूनल मरतड वर्माने राज्यातली वेठबिगारी कायद्याने बंद केली. केरळात अनेक शतकांपासून जमीनदारांकडे पिढय़ान्पिढय़ा वेठबिगार ठेवण्याची प्रथा होती. त्याच्यानंतर गादीवर आलेला आयीलम थिरूनल रामा वर्माने १८६० ते १८८० असा कार्यभार सांभाळला. याच्या काळात त्याला टी. माधवरावसारखा कार्यक्षम, चोख प्रशासक दिवाण मिळाला आणि या दोघांनी कर्जामध्ये बुडत चाललेल्या त्रावणकोर संस्थानाला एक वैभवसंपन्न राज्य बनविले. न्यायदान, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, वैद्यकीय सेवा, कृषी अशा सर्व क्षेत्रांत आयीलमने अनेक सुधारणा करूनही १८७२ साली राज्याकडे चाळीस लाख रुपयांचा अतिरिक्त निधी गंगाजळीत शिल्लक राहिला. ब्रिटिश राजवटीने त्रावणकोर राज्याचा ‘आदर्श भारतीय संस्थान’ असा गौरव करून राजा आयीलमला ‘ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया’, तर दिवाण टी. माधवरावास ‘ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर’ हे खिताब दिले. १८६५ साली महाराजा आयीलमने कल्याणीकुट्टी अम्मा या सौंदर्यवान स्त्रीशी विवाह केला आणि त्याच्या नात्यातील रवि वर्मा या नवोदित चित्रकाराला तिचे तलचित्र काढावयास सांगितले. त्याने काढलेल्या त्या अप्रतिम चित्राने प्रभावित होऊन आयीलमने रवि वर्मा याच्या प्रतिभेला वाव देऊन पुढे विख्यात चित्रकारांमध्ये त्याची गणना झाली. आयीलम थिरूनलनंतर गादीवर आलेल्या विसाखम थिरूनलने प्रचलित शिक्षण पद्धतीत, पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीत आणि न्यायालयीन व्यवस्थेत अनेक सुधारणा केल्या. केरळातील टॅपिओका या कंदाच्या लागवडीला उत्तेजन देऊन अधिक पीक देणारे संकरित टॅपिओकाची लागवड सुरू केली. ‘गरिबांचे अन्न’ समजल्या जाणाऱ्या टॅपिओकामुळे शेतकऱ्यांना एक उत्पन्नाचे साधन झाले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical garments system part
First published on: 16-12-2015 at 02:21 IST