हुबेहूब माणसासारखा दिसणारा आणि वागणारा यंत्रमानव निर्माण करणे हे फार दिवसांपासून मानवाचे स्वप्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची दिवसागणिक वाढत जाणाऱ्या वेगाची घोडदौड सुरू झाल्यापासून तर आपले हे स्वप्न नक्की साकार होणार याची मानवाला आशा लागलेली आहे. सौदी अरेबियाचे नागरिकत्व लाभलेली आणि व्यासपीठावर येऊन प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देणारी सोफिया, किंवा आपण संवाद साधल्यानंतर आपली कामे करून देणारी अलेक्सा किंवा आयबीएमचा वॉटसन हा साहाय्यक, किंवा क्लॉड हा साहाय्यक, असे अनेक बुद्धिमान आविष्कार पाहिल्यानंतर तर ही आशा खात्रीत बदलू लागली आहे.

पण स्व-जाणीव असलेली म्हणजे सेल्फ-अवेअर किंवा स्व-भान असलेली म्हणजे सेल्फ-कॉन्शस कृत्रिम बुद्धिमत्ता ही अजून बरीच दूर आहे. कारण स्व-जाणीव किंवा स्व-भान या संकल्पना वरवर सहजसोप्या वाटत असल्या तरी प्रत्यक्षात त्या फार गुंतागुंतीच्या आहेत. त्यांच्या सरळसोट व्याख्या करणे फार अवघड आहे कारण त्यांना अनेक पदर किंवा पैलू आहेत.

सर्वसाधारणपणे दोन प्रकारच्या स्व-जाणिवा मानल्या जातात. एक म्हणजे आंतरिक (इंटर्नल) आणि दुसरी म्हणजे बाह्य (एक्स्टर्नल) स्व-जाणीव. काही शास्त्रज्ञ यांनाच खासगी (प्रायव्हेट) आणि सार्वजनिक (पब्लिक) असेही नामाभिधान देतात.

हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक

आंतरिक स्व-जाणीव म्हणजे आपण अस्तित्वात आहोत आणि आपल्याला आपली एक विशिष्ट स्व-ओळख (आयडेंटिटी) आहे हे माहीत असणे. थोडक्यात काय तर ‘कोऽहं’ याचे उत्तर माहीत असणे. विविध ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या संवेदना, अनुभव, आगम (इनपुट) यांच्यावर विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची पद्धत आणि त्यानुसार एक विशिष्ट प्रतिसाद म्हणजेच ही विशिष्ट स्व-ओळख.

आपल्याला इतरजण काय समजतात किंवा इतरांच्या दृष्टीने आपण कोण आणि कसे आहोत याचे आपल्याला असलेले आकलन म्हणजे बाह्य स्व-जाणीव. उदाहरणार्थ, लोक आपल्याला तुसडा, रागीट समजतात का मनमिळाऊ, मवाळ समजतात, हुशार आणि चतुर समजतात का मतिमंद याचे आपल्याला ज्ञान असणे ही बाह्य स्व-जाणीव होय. बाह्य स्व-जाणीव आपल्याला समाजात राहायला मदत करते.

अर्थात स्व-जाणीव अशी एकदोन वाक्यांत किंवा व्याख्यांत सांगता येणारी गोष्ट नाही. या सर्व मानसिक प्रक्रिया का आणि कशा घडतात याचे सखोल ज्ञान अजूनही शास्त्रज्ञांना झालेले नाही.

अशा या ज्ञात-अज्ञाताच्या सीमेवर असणाऱ्या स्व-जाणिवेला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणेमध्ये प्रस्थापित करणे हे अवघड काम आहे. 

– शशिकांत धारणे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org