युद्धभूमीवर सैनिकाला आपल्या परिसरात वावरणाऱ्या व्यक्तींपैकी स्वकीय कोण आणि शत्रूसैनिक कोण याचा अचूक धांडोळा घेणे आवश्यक असते, पण रात्रीच्या वेळी तसेच जिथे जीपीएस यंत्रणा कुचकामी ठरते अशा दाट जंगलात ते कठीण होते. त्यावर मात करण्यासाठी डीआरडीओ या संरक्षण दलाच्या संशोधन संस्थेने एक हेल्मेट विकसित केले आहे. ते डोक्यावर चढवले की सैनिकाचे मस्तक तर सुरक्षित राहतेच, पण त्याच्यात बसवलेला व्हिडीओ कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक मेंदू यांच्याकडून त्याला परिसरातल्या हालचालींची अचूक माहितीही देते. त्याच हेल्मेटमधील निरनिराळे संवेदक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आज्ञावलीशी जोडलेले आहेत. ते सहकाऱ्यांच्या तसेच शत्रूसैनिकांच्या हालचालींवर नजर रोखून त्यांची क्षणाक्षणाला बिनचूक माहिती पुरवत राहतात. त्यातून मग युद्धासाठी आवश्यक ती रणनीती आखणे आणि त्यानुसार जागच्या जागी निर्णय घेणे सैनिकाला शक्य होते.

व्हिडीओ कॅमेराही कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेला जोडलेला असल्यामुळे तो परिसराचे त्रिमिती चित्रण उपलब्ध करून देतो. ते हेल्मेटच्या आत असलेल्या पडद्यावर सैनिकाला पाहता येते. आपली वाटचाल तो त्यानुसार निश्चित करू शकतो. तसेच आपण शत्रूला दिसणार नाही अशा रीतीने आपली हालचाल निर्धारित करू शकतो. या यंत्रणेला इंटरनेट ऑफ बॅटलफिल्ड थिंग्ज (आयम्ओबीटी) असे समर्पक नाव दिले गेले आहे.

हेही वाचा >>> कुतूहल : सीमेवरील सैनिकांचा सखा!

ही यंत्रणा सैनिकांना आपल्याला साहाय्य करणाऱ्या चिलखती गाडयांशी आणि रणगाडय़ांशी सतत संपर्कात ठेवते. त्यांच्याशी संवाद साधण्याची क्षमता मिळवून देते. त्यामुळे कोणत्याही क्षणी ते कुठे आहेत याची माहिती तर त्याला मिळतेच, पण आपल्या पुढच्या हालचालींची माहिती त्यांना पुरवून त्यांनी आपले स्थानही त्यानुसार बदलावे, अशी सूचना तो देऊ शकतो. सियाचिनसारखा अतिशीत आणि दुर्गम भाग किंवा राजस्थानातील आग्यामोहोळ असलेला रखरखीत प्रदेश या दोन्ही टोकाच्या पर्यावरणातही ही यंत्रणा निर्वेध काम करू शकेल, याच्या यशस्वी चाचण्या घेतल्या गेल्या आहेत.

आयओबीटीची मोहिमेच्या यशाची शक्यता वाढवण्याबरोबर आपल्या सैनिकांच्या बळींची संख्या आटोक्यात ठेवण्यासही मदत होत आहे. रणनीती आखण्यातही तिची मोलाची मदत मिळत आहे. 

– डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org