सध्या तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकाधिक प्रभावी होते आहे आणि तिची जैविक विज्ञानाशी सांगड घातली जात आहे. याचा परिणाम म्हणून माणसाची निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या ताब्यात राहणार नाही, प्रगत तंत्रज्ञान त्यावर नियंत्रण ठेवील अशी भीती अनेकांना वाटत आहे.याचे कारण एखादी व्यक्ती कोणते निर्णय घेते याची पद्धत ठरलेली असते. त्यानुसारच ती व्यक्ती धाडसी वा भित्री आहे असे म्हटले जाते. मनातील भावना आणि विचार साचेबद्ध असतात. हे साचे, तंत्रज्ञान आत्ताच ओळखू लागले आहे. समाजमाध्यमांवर तुम्ही  काय पाहता, कोणते मेसेज पुढे पाठवता, कोणत्या संदेशांवर रागाची प्रतिक्रिया देता यावरून तुम्ही निवडणुकीत कोणाला मतदान करण्याची शक्यता आहे याचे गणित बांधून त्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचा बोलबाला पाच वर्षांपूर्वीपासूनचाच. तुमचा कल ओळखून त्याला सुसंगत मेसेज दाखवून हळूहळू तुमचे मतपरिवर्तन करणे शक्य आहे, असेही दावे केले जात आहेत. यापुढील काळात हे केवळ समाजमाध्यमांपुरते मर्यादित राहणार नाही. माणसाच्या शरीरात काय चालले आहे हे शोधणारे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. असे सांगितले जाते की, शरीरात कुठेही कर्करोगाच्या पेशी वाढू लागल्या आहेत हे शोधणारे तंत्रज्ञान लवकरच प्रत्यक्षात येईल. अशा नवीन तपासण्या आरोग्यासाठी आवश्यक ठरतील; पण त्यामुळे मानवी भावनांचे साचेही तंत्रज्ञानाला समजू लागतील. काय पाहिले की तुमच्या छातीत धडधड वाढते हे तुमच्यापेक्षा मशीनला लवकर समजेल.  माणूस कशाने उत्तेजित होतो, कशामुळे चिडतो, उदास होतो हे तंत्रज्ञान आणि ते ज्यांच्या ताब्यात आहे ते जाणू शकतील; अनेक माणसांच्या मनावर नियंत्रण ठेवू शकतील. तंत्रज्ञानाचे फायदेदेखील अनेक आहेत, त्यामुळे ते वापरायला हवेच, पण त्याच्या नियंत्रणाखाली जायचे नसेल तर सजगता आणि स्वत:वरील नियंत्रण अधिक विकसित करायला हवे. आजही स्मार्टफोन वापरायला हवेत, पण तो किती वेळ पाहायचा आणि काय पाहायचे याविषयी सजग राहायला हवे. ‘मी माझ्या मेंदूचा स्वामी आहे तसाच माझ्या फोनचाही स्वामी आहे, त्याचा गुलाम नाही’ याचे भान ठेवले तर तंत्रज्ञानाची भीती बाळगण्याचे कारण नाही.

डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com