अलेक्झांडरचा सेनापती सेल्युकस याचे आणि तत्कालीन सम्राट चंद्रगुप्त यांचे शांततेच्या तहामुळे सख्य होते. सेल्युकसने चंद्रगुप्ताच्या दरबारी पाटलीपुत्र येथे मेगॅस्थिनीस नावाचा आपला वकील पाठविला होता. त्याने हिंदुस्तानच्या माहितीने परिपूर्ण ग्रंथ लिहिला होता. हिंदुस्तानासंबंधी सर्व तऱ्हेची माहिती आपल्या ग्रंथाद्वारे पाश्चात्त्यांना करून देणारा मेगॅस्थिनीस हा पहिला लेखक होता.

पंधराव्या शतकात आणि त्यापूर्वी जे पाश्चात्त्य प्रवासी हिंदुस्थानात येत, त्यांना अरबी आणि फारसी भाषा येत होत्या असे वाटते. स्पेन आणि पोर्तुगाल हे देश अरबांच्या वर्चस्वाखाली अनेक शतके होते, त्यामुळे स्पॅनिश आणि पोर्तुगीज लोकांपैकी अनेकांना अरबी आणि फारसी भाषा बोलता येत होत्या. तसेच हिंदुस्तानच्या किनारपट्टीत अरबांची व्यापारी ठाणी असल्यामुळे किनारी प्रदेशात या दोन्ही भाषांची माहिती होती.

पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीज प्रथम केरळमध्ये आले ते व्यापार आणि ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने. व्यापार करता करता पोर्तुगीजांनी गोव्यात आपली राजकीय सत्ताही प्रस्थापित केली. याच काळात पोर्तुगाल आणि स्पेनमधील ख्रिस्ती मिशनरी हिंदुस्तानात येऊ लागले. या मिशनऱ्यांपैकी बहुतेकांना अरबी, फारसी किंवा अन्य भारतीय भाषा अवगत नव्हत्या. हिंदुस्तानातील विविध प्रदेशांत धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी आलेल्या मिशनऱ्यांना स्थानिक लोकांशी त्यांच्या भाषेत बोलणे जसे आवश्यक झाले तसेच मोगल बादशाह आणि इतर राज्यकर्त्यांशी तत्कालीन प्रचलित राजभाषा फारसीत बोलणे आवश्यक होते.

स्थानिक भाषांचे वाढते महत्त्व जाणून पोर्तुगीज मिशनरींनी पुढे स्वत: स्थानिक भाषा आणि फारसीचे ज्ञान संपादन केले. या भाषाज्ञानाचा त्यांना राजकारणात आणि धर्मप्रसार करण्यात फारच उपयोग झाला. सुरुवातीचे जेसुइट मिशनरी फारसी भाषा शिकून त्या भाषेत धर्मोपदेश करीत आणि मोगल दरबारात त्यांना मोठे महत्त्व होते. तेथे परकीय देशाचे व्यापारी आणि प्रवासी येत. त्यांची पत्रे वाचून दुभाषाचे कामही हे मिशनरी करीत. या मिशनऱ्यांनी पुढे हिंदुस्तानातील स्थानिक प्रांतीय प्रचलित बोलीभाषांचा अभ्यास करून ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com