News Flash

मेंदूशी मैत्री : नैतिकता

ठाम नसलेली माणसं इतरांच्या सहवासात येऊन इतरांसारखी होतात.

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

माणूस जेव्हा स्वत:शी स्वत:बद्दल बोलत असतो, तेव्हा तो अतिशय समजूतदार आणि नैतिक असतो. समाजसुसंगत विचार करत असतो. हाच माणूस जेव्हा इतरांमध्ये (उदा. महाविद्यालय, नोकरीचं ठिकाण) जातो, त्यावेळी आसपासच्या लोकांच्या मानसिकतेचा त्याच्या वागण्यावर परिणाम होतो. जर माणूस मनापासून आणि ठामपणे नैतिक असेल, तत्त्वनिष्ठ असेल; तर आसपासचं वातावरण काहीही असो, त्याच्यावर फरक पडत नाही. काही गोष्टी तो माणूस तत्त्वांसाठी सहनही करतो, पण नैतिक राहतो.

ठाम नसलेली माणसं इतरांच्या सहवासात येऊन इतरांसारखी होतात. काही जणांची तर नैतिकता पूर्ण शून्यावर येते. हे सर्व एकाच माणसाच्या मेंदूत होऊ शकते. याचं कारण समूहाचा त्याच्या मनावर झालेला परिणाम. माणसं एकत्र आली तर ती काही चांगल्या गोष्टी घडवून आणू शकतात किंवा पूर्णपणे वाईट. समूहाचा मनावर दोन्ही प्रकारे परिणाम होतो.

जेव्हा समूहानं काम करायचं असतं, तेव्हा चमूचं मनोधैर्य उंचावण्याचं काम केलं तर सर्वाची कामगिरी सुधारते. काम चांगल्या पद्धतीनं पूर्ण होतं. जेव्हा एखादी टीम खेळत असते, तेव्हा  संघभावनेनं माणसं प्रेरित झालेली असतात. त्यांच्या हातून चांगली कामगिरी घडून येते. परंतु काही वेळेला हा समूह अत्यंत वाईट गोष्टी करायला निघतो. कोणी तरी एक जण सांगत आहे आणि त्याच्या मागोमाग इतर माणसं जातात, त्या वेळेला त्यांची नैतिकता काम करेनाशी होते. उदाहरणार्थ, ‘दहावी फ’ चित्रपटातला तोडफोडीचा प्रसंग. एरवी चांगली असणारी ही मुलं समूहाच्या दबावाखाली येऊन विचारशक्ती विसरतात.

या संदर्भातल्या एका प्रयोगामध्ये एका सभागृहात दोनशे माणसं होती. त्यातल्या केवळ पाच-सहा माणसांना सूचना देऊन सभागृहाबाहेर जायला सांगितलं गेलं. ती पाच-सहा माणसं बाहेर निघाली, तर त्यांच्या मागोमाग सर्व माणसं बाहेर गेली. बाहेर का जायचं आहे, हे कोणीच विचारलं नाही. हे अगदी साधं उदाहरण आहे. पण याच पद्धतीनं एखाद्याला ठरवून त्रास देणं, रॅगिंग करणं किंवा झुंडीनं बळी घेणं असं काहीही घडून येतं. ही समूह मानसिकता असते. ती चांगली आणि वाईट कृत्यं करायला लावते. म्हणून उच्चनैतिक मूल्यं रुजली असतील, ती माणसं कोणत्याच झुंडीच्या/ नेत्याच्या मागे जात नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2019 2:55 am

Web Title: morality important for human beings zws 70
Next Stories
1 मत्सर ‘मेंदू’त असतो का?
2 रेषीय प्रायोजन
3 मेंदूशी मैत्री : भीती आणि असुरक्षिततेची भावना
Just Now!
X