सिंचनासाठी सुरेश वाघधरे यांनी शेतामध्ये दोन कोटी लिटरचे शेततळे केले. तीन किलोमीटरवर कालव्याजवळ पाण्यासाठी विहीर केली. त्या विहिरीलगतही पाणी जिरविण्याचे उपाय केले. ठिबक, फवारा सिंचनाशिवाय शेतीला पाणीच दिले नाही. त्यामुळेच या गंभीर पाणीटंचाईच्या काळातही त्यांचे शेत आणि त्यातील पाच लाखांवर असलेली कलमे हिरवीगार आहेत.
 सतत नव्याचा ध्यास घेणाऱ्या सुरेश वाघधरेंवर अनेक संकटे चालून आली. २०१२-१३ च्या शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत राज्याच्या सोलापूर जिल्हा कृषी विभागाने वाघधरे यांच्याकडे लाख-सवा लाख रोपांची मागणी नोंदवली. मात्र अधिकाऱ्यांनी नंतर ही योजना गुंडाळून ठिबक सिंचनाच्या योजनेवरच लक्ष केंद्रित केले. दुष्काळी स्थितीत कलमे सांभाळण्याचे महासंकट वाघधरेंवर कोसळले; परंतु ‘ही कलमं माझी मुलं आहेत. त्यांना मी जगविणारच,’ असं म्हणत नव्या उमेदीनं ते कामाला लागले.
आपल्या वारसांनी शेतीच करावी, अशी तजवीज करताना त्यांनी कन्या व मुलास उच्च कृषी शिक्षण दिले. डॉक्टरेट झालेली मुलगी राहुरी कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञ आहे. मुलगा विनय नेदरलँडमधून उच्च शिक्षण घेऊन गावाकडे परतला आहे. तो आता टिश्युकल्चर लॅब, रोपनिर्मिती आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित विद्राव्य खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू करत आहे. या प्रकल्पाच्या परवानगीसाठी त्यांना तब्बल सहा महिने झगडल्यानंतर परवाना मिळाला. स्वत:च्या अनुभवाचा इतरांना फायदा व्हावा, या उद्देशाने त्यांनी आपल्या प्रकल्पांवर आधारित पुस्तक लिहिले असून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर ५० हजारांवर पुस्तके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहेत.
देशभरातून तसेच परदेशातून सुमारे साडेतीन लाख जणांनी केशर प्रकल्पाला भेट दिली आहे. त्यात शेतकरी, कृषी शाखेचे विद्यार्थी, शासकीय अधिकारी, संशोधक, लोकप्रतिनिधी आणि अभ्यासकांचा समावेश आहे. भेटीस येणाऱ्यांसाठी विनामूल्य माहिती केंद्र उभारले असून त्यांच्या अनुपस्थितीतही प्रकल्पाची इत्थंभूत माहिती मिळेल, याची व्यवस्था करून ठेवली आहे. सुरेशरावांना आजवर राज्य शासनाचा कृषिभूषण, आयसीएआरचा सर्वोत्कृष्ट शेतकरी गौरव यांसह असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. ‘सर्वसामान्य शेतकरी तोंडभरून कौतुक करतो तोच आमचा खरा पुरस्कार,’ असं ते सांगतात.

जे देखे रवी.. –   संधी आणि घात
प्लास्टिक सर्जन व्हायचे आहे या ध्यासाने बेजार झालेल्या मला १९७०च्या  डिसेंबरमध्ये एक जुना अमेरिकेतला मित्र भेटायला आला. मेडिकल कॉलेजमध्ये हा माझ्या वर्गात होता. मी त्याला सहज माझ्या मनातले परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न सांगितले आणि किती निराशा पदरात पडली आहे याचे वर्णन केले. तो मला म्हणाला, ‘‘काय वेडा की खुळा तू. १५ दिवस थांब. मी उद्या अमेरिकेला परत जातो आहे तुझी व्यवस्था करतो.’’ मी खरे तर हे संभाषण विसरलो होतो. पण ठोका पडावा तसे बरोबर १५ दिवसांनी कुककौंटी या शिकागोमधल्या सुप्रसिद्ध रुग्णालयाचे मला पत्र आले. त्यात ‘‘तुमची कारकीर्द आम्ही तपासली आहे आणि म्हणूनच १९७१च्या जूनपासून आपणास पाचव्या वर्षांचा निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे ठरले आहे. सुरुवातीला तुमची नेमणूक भाजलेल्या रुग्णांच्या कक्षेत असेल तेव्हा तुमच्या होकाराची वाट पाहात आहोत.’’ असे लिहिले होते. मी पहिल्या वर्षांची उमेदवारी करायला तयार होतो इथे ‘देता किती घेशील दो कराने’ असे झाले होते. आनंदाने मी मरायला तेवढा बाकी होतो. ते पत्र मी सर्वत्र मिरवू लागलो. ते पत्र KEM रुग्णालयात नेले तेव्हा आणखी एक धक्का बसला. आता ही अमेरिकेतली नेमणूक झालीच आहे तेव्हा तू इथल्या MS Plastic  या परीक्षेला बाहेरून बसण्याची परवानगी मागितलीस तर त्याचा विचार करू असे KEM रुग्णालयाच्या विभागाने मला सांगितले. मी घरी आलो तेव्हा मला एक सुज्ञ सल्ला मिळाला. ‘‘ही भानगड आता हवीच कशाला? हात दाखवून अवलक्षण नको.’’ असा तो सल्ला होता. पण मी पेटलो होतो. दिवसरात्र अभ्यास करून मी परीक्षेला बसलो. तो काळ निराळा होता. मी एकटाच विद्यार्थी आणि चार परीक्षक. त्यातले दोन मुंबईचे, बाकीचे बाहेरगावचे. परीक्षा पाच तास चालली. लेखीत मला अ मिळाला होता, पण प्रात्यक्षिकात मी अडखळलो आणि तिथून पुढे परीक्षकांनी मला घेरले. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखे माझे झाले आणि मी सहीसलामत बाहेर पडू शकलो नाही. मी नापास झालो. मला नंतर जे सांगितले ते ऐकून आणखीनच मिरच्या झोंबल्या. एक बाहेरगावचा परीक्षक म्हणाला, ‘‘मुंबई विद्यापीठात या परीक्षेचे अवमूल्यन होऊ घातले आहे म्हणून उदाहरण घालून देण्यासाठी तुला मागे ठेवणे आम्हाला भाग पडले. तू हुशार आहेस, पण आमचा नाइलाज होता.’’ टिळक रुग्णालयातले माझे गुरू डॉ. डायस मला तेव्हा म्हणाले,
‘‘तू नापास झालास याचे कारण एवढे सरळ नाही. शांत राहा. आपलेही दिवस येतील.’’
आणि तसे ते आलेही आणि नुसतेच आले नाही तर भरघोस आले त्याबद्दल यथावकाश.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – पित्तविकार : २
लक्षणे – अंगाला घाण वास येणे, घामाचे डाग पडणे, अंगात कडकी; तळहात, तळपाय, डोके गरम असणे. कंठशोष, घसा सुकणे; बोलावयास, गिळावयास त्रास, घशात फोड, वाफा येणे. अंग गळून जाणे, काही करावेसे न वाटणे, धीर खचणे, तोंड आंबट कडू, उलटीची भावना, खावेसे न वाटणे, तेज नकोसे होणे, विश्रांती घ्यावीशी वाटणे. सायंकाळी, रात्री काम करावयास उत्साह वाटणे. सतत थंड हवेसे वाटणे, खूप तहान, पाणी पिऊन समाधान न होणे. त्वचा निस्तेज, चेहरा ओढल्यासारखा होणे, सुरकुत्या पडणे. वरचेवर राग येणे, थोडासाही आवाज वा मतभेद सहन न होणे.  भूक मंद वा तीव्र होणे. गरम, पिवळी लघवी. शौचास साफ न होणे.
कारणे- अंगास घाण वास:  शरीरातून घाम व लघवीवाटे पुरेसे दोष बाहेर न पडणे. खारट, आंबट, तिखट व उष्ण पदार्थाचे अतिसेवन.
कडकी :  शरीरातील स्निग्ध घटकद्रव्याचे प्रमाण कमी होणे, वायु व पित्त वाढेल असा आहारविहार असणे. वेळेवर किंवा पुरेसे न जेवणे, जागरण, चिंता, अधिक श्रम वारंवार घडणे, शुक्रक्षय होणे.
कंठशोष:  घशाला ताण पडेल असे बोलण्याचे, वारंवार श्रम होणे. घशाला सूज, फोड येतील अशा स्वरुपाचे परिणाम घडविणाऱ्या खूप थंड, खूप उष्ण पदार्थाचे सेवन करणे.
गळून जाणे:  काही कारणाने रक्त, मांस व शुक्र धातूंचा क्षय होईल असे वागणे. खाण्यापिण्याची आबाळ व वायू वाढणे.
तोंड आंबट कडू:  आंबट, तिखट, खारट, तीक्ष्ण, उष्ण असे मसालेदार पदार्थ खूप खाणे. परसाकडे साफ न होणे. खराब पाणी किंवा मद्य पिणे. तेज नकोसे होणे –  तिखट, आंबट, खारट व रूक्ष पदार्थाचा अतिरेकी वापर, उन्हातान्हांत सतत काम, झोप कमी, चिंता जास्त, अशामुळे शरीरातील स्निग्ध भाव कमी होणे.
थंड हवेसे वाटणे:  तीक्ष्ण, उष्ण, तिखट, आंबट, खारट अशा पदार्थाच्या सेवनामुळे सार्वदेहिक व जठरातील पित्त वाढणे.
निस्तेज त्वचा:  योग्य पोषणाअभावी. कदन्न खाल्यामुळे, खूप उशिरा जेवणामुळे खाल्लेले अंगी न लागून पांडुता येणे. बाहेर श्रम करणे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – ३० एप्रिल
१८४३ >  ‘मोचनगड’ या मराठीतील पहिल्याच (१८७१) ऐतिहासिक- शिवकालीन कादंबरीचे लेखक, ‘रोमकेतु-विजया’ या नावाने शेक्सपिअरच्या ‘रोमिओ अँड ज्युलिएट’चे रूपांतर १८७० साली करणारे आणि ‘लाघवीलिपी’ या पुस्तकाद्वारे मराठी लघुलेखनाचे आद्यरूप (१८७४ साली) शोधणारे ‘विविधज्ञानविस्तार’चे संस्थापक-संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचा जन्म. बेळगावजवळील जांबोटी गावी जन्मलेल्या गुंजीकरांनी ‘कन्नडपरिज्ञान’ (१९०९) हा कन्नडविषयीचा मराठी ग्रंथही लिहिला. कालिदासाचे शाकुंतलही त्यांनी मराठीत आणले होते.
१९१३ > मराठी व्याकरणकार मोरो केशव दामले यांचे निधन. ११ वर्षे संशोधन करून मराठी व्याकरणाचा एक हजार पानी ग्रंथराज त्यांनी लिहिला. अभ्यासू व्याकरणकारांत त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.
१९३६ > ‘युगांतर’ नावाचे डाव्या विचारांचे साप्ताहिक मराठीत सुरू झाले. पुढे साम्यवादी विचारधारेची अनेक पुस्तके लिहिणारे विनायकराव भुस्कुटे हे त्याचे संस्थापक होते.
२००३ > अभिजात व फिल्मी संगीत, विवेकानंद आणि गालिब अशा विषयांवर रसग्राही लेखन व एकपात्री कथन करणारे ‘फिरस्ता’ वसंत पोतदार यांचे निधन.
– संजय वझरेकर