पाण्याची कमतरता असताना पिकाचे सिंचन करण्यासाठी ठिबक सिंचनप्रणाली सर्वोत्तम आहे. आवश्यक तेवढेच पाणी व खते या तंत्राने पिकांच्या मुळांशी देता येतात. या प्रणालीमध्ये सध्या उच्चतम नवे तंत्रज्ञान प्रसारित होत आहे. त्यामध्ये ‘ठिबकनळी’ हे इस्रायली तंत्रज्ञान आहे. यात नळीच्या आतील भागात ड्रिपर बसविलेला असतो. ड्रिपरमध्ये कचरा अडकण्याचे प्रमाण कमी असते. याचा वापर कमी गुणवत्तेच्या पाण्यासाठीही करता येतो. या ड्रिपरमध्ये पाणी गाळण प्रक्रिया चांगली होते. या प्रकारच्या ठिबक नळ्या ओळीमध्ये लागवड करता येणाऱ्या पिकांसाठी तसेच फळबागांसह बहुतांश पिकांसाठी वापरतात. या ड्रिप-लाइनमुळे एकसमान ओला पट्टा निर्माण करता येतो. या ठिबक संचाची जोडणी व ठिबक नळ्या गुंडाळणे सोपे असते. त्यामुळे संचाचे आयुष्य वाढते.
दुसरे नवे तंत्रज्ञान म्हणजे ‘दाबनियंत्रित ठिबकनळी.’ चढउताराच्या जमिनीवरही त्या पाण्याचा उत्सर्ग एकसमान देतात. स्वयंस्वच्छता तंत्रामुळे ड्रिपर बंद होण्याची शक्यता कमी असते. या ठिबक नळ्या जमिनीअंतर्गत ठिबक सिंचनासाठीही वापरता येतात. दाबनियंत्रित तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्य ठिबकनळ्यांपेक्षा जास्त लांबीपर्यंत या ठिबकनळ्या वापरता येतात. खर्चही कमी होतो. अशाच प्रकारचे कमी दाबावर चालणारे ठिबक संच लहान क्षेत्रासाठी तसेच वीज व पाणी हे स्रोत कमी असलेल्या ठिकाणी अत्यंत उपयोगी ठरतात. यात पाण्याचा साठा ठरावीक उंचीवर (टाकीमध्ये) करतात. सायफन पद्धतीने (वीजपंप न वापरता) पाणी ठिबक नळ्यांद्वारे पिकांच्या मुळ्यांच्या क्षेत्रात देतात. यात मोठय़ा पंपसेटचा खर्च वाचतो. नवीन तंत्रामध्ये जमिनीखालील ठिबक सिंचन या तंत्रज्ञानाचा उपयोग जास्त कालावधीची पिके (फळबागा), ऊस यांसाठी उपयोगी ठरतो. यामध्ये दाबनियंत्रित ठिबक नळ्या जमिनीखाली १५ सें.मी. खोलीवर ट्रॅक्टरच्या साह्याने गाडतात. यात पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण असते. ही प्रणाली दीर्घकाळपर्यंत कार्यरत राहाते. सूर्यकिरणांपासून ठिबक नळ्यांचे संरक्षण होते.
याशिवाय स्वयंचलित खत आणि पाणी व्यवस्थापन करणारी ठिबक सिंचन व्यवस्थाही नव्या तंत्रामध्ये आहे. पिकासाठी ठरवलेली खत व पाणी यांची मात्रा स्वयंचलित यंत्रात नोंदली की यंत्रणा आपले काम सुरू करते.
सुधीर फडके (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २५ एप्रिल
१९१० > ‘मराठी नियतकालिकांची सूची’ हा तीन खंडांचा कोश तयार करणारे ‘केसरी-मराठा ग्रंथशाळे’चे संस्थापक ग्रंथपाल शंकर नारायण बर्वे यांचा जन्म. नियतकालिकांनी १८६९- ८२ जे प्रबोधनयुग मराठीत आणले, त्याचा मागोवा बर्वेकृत सूची घेते. ‘विनायकराव पटवर्धन जीवनदर्शन’ हे चरित्र लिहिणाऱ्या बर्वे यांनी ‘शारदामंदिर’ आणि ‘चूडामणी’ ही संगीत नाटकेही लिहिली होती.
१९८७ > कवी ‘प्रफुल्लदत्त’ म्हणजेच दत्तात्रेय विष्णु तेंडुलकर यांचे निधन. गद्यकाव्य, रुबाई हे प्रकार त्यांनी हाताळले. कादंबरिका, नाटिका, चिंतनपर गद्य आदी लेखनही केले. एकंदर २७ पुस्तके झाली. ‘अमृतसिद्धी’ हे त्यांचे आत्मचरित्र १९८५ साली प्रसिद्ध झाले होते. ‘लाटा-लहरी’ आणि ‘चिंतनिकेची पाने’ (रुबाई), ‘गोमंतक’ व ‘शिवस्वप्न’ (दीर्घकाव्य), ‘अशोकाची फुले’, ‘रेशमी लडय़ा’ (गद्यकाव्य) हे त्यांचे काव्यसंग्रह उल्लेखनीय ठरले.
१९९९ >  पत्रकार आणि बालसाहित्यकार पंढरीनाथ रेगे यांचे निधन. कुमारवयीन मुलांसाठी गोष्टींची २३ पुस्तके त्यांनी लिहिली. यासाठी देशोदेशींच्या, प्रांतोप्रांतीच्या कथा धुंडाळल्या. रशियन कादंबरीकार लिओ टॉलस्टॉयच्या तीन दीर्घकथांचे त्यांनी छोटेखानी पुनर्कथन केले आहे.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस : नागीण : धावरे : १
नागीण, विसर्प, धावरे या विविध नावाने हा रोग ओळखला जातो. त्यात पुन्हा त्याचे वातज, पित्तज, कफज व त्यांचा एकमेकांशी संबंध असे प्रकार केले जातात. व्यवहारात दोनच प्रकार दिसतात. ९० टक्के पित्तप्रधान, १० टक्के कफप्रधान नागीण विकार आढळतो.
हा विकार सांसर्गिक नाही आणि आहे पण. सर्दी, पडसे व फ्ल्यूसारखा सांसर्गिक नाही. पण जो कोणाला होतो त्याला कारण बहुधा; दुसऱ्या व्यक्तीशी कळत नकळत प्रवासात संपर्क असतो.
या विकाराने घाबरून न जाता शांतपणे पित्तप्रधान की कफप्रधान असा विचार केला तर बहुधा विकाराचा सामना करता येतो. चुकीची औषधे किंवा दुर्लक्ष केले तर विकार फार काळ रेंगाळतो. जेथे जखमा असतात तेथे काळे डाग तयार होतात. नंतर ते डाग घालविणे, विशेषत: चेहऱ्यावरील, ही समस्या होते.
नागीण या नावाच्या विकाराचा मला तसा रुग्ण भेटेपर्यंत कुतूहल होते. आयुर्वेदाच्या दुर्दैवाने, काही जुन्या वैद्यांत अतिशयोक्ती हा गुण समजला जातो. काही विकारांचे ते महाभयंकर स्वरूप करून सांगणार. त्यात सामान्य माणसे फोडणी लावून ते वाढवणार. नागीण बहुधा माणसाला मारते. त्याचा हळूहळू जानव्यासारखा फास होऊन गळा आवळला जातो. अनेक दंतकथा लोक सांगतात.
मला पहिला मिळालेला रुग्ण, मुंबईतील बेस्टचे मोठे इंजिनिअर होते. त्यांना झालेल्या नागिणीत पित्त, कफ दोन्हीचे स्वतंत्र पुरळ व फोड दिसून येत होते. त्यांना दोन दिवसांत आराम पडला. आठ दिवसांत बरे वाटले. भयंकर वाटणारा विकार २५ रुपयांत बरा झाला. त्याचवेळेस त्यांच्या ऑफिसातील कमी पगाराचा एक कर्मचारी हजारो रुपये खर्चून हतबल होता. त्यांच्या अनुभवामुळे तो माझ्याकडे आला. चार दिवसांत बरा झाला. अनुभवातून विश्वास वाढतो तो असा. नागिणीचे फोड पित्तप्रधान, कफप्रधान यांचे परीक्षण अनुक्रमे उष्ण स्पर्श व आग किंवा खाज यावरून होते. लघवीचा रंग, मलाचा रंग, घाम येणे, त्याचा वास व तहान यावरून नागिणीचा प्रकार ठरवता येते.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. : युद्ध
कुरुक्षेत्रावर झालेले युद्ध आपल्या मनावर ठसलेले असते; परंतु त्या व्यतिरिक्त गगातील असंख्य पात्रे आपल्या समोर अनाहूतपणे उघड होतात. उदात्त आणि नीच, एकनिष्ठ आणि गद्दारी, भव्यदिव्य, आदर्श आणि हलकट, क्षुद्र विचार, औदार्य आणि हाव, साम्राज्य आणि वनवास, वाटाघाटी आणि युद्ध असल्या अनेक गोष्टी आपण गगात पाहतो. कुरुक्षेत्रावर झालेल्या युद्धाचे बी खांडवप्रस्थ (इंद्रप्रस्थ) या पांडवांच्या राजधानीच्या बाहेरच्या अरण्याच्या कडेला झालेल्या एका उन्मादयुक्त प्रसंगात रोवले गेले. सुभद्रेला पळवून घेऊन आल्यानंतर अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा आनंद ग ग नात मावेना तेव्हा ही ‘पार्टी’ झाली. त्यात राज्य वाढविण्यासाठी खांडव वनाला आग लावण्यात आली त्यातून एक सापांचा राजा वाचला तो पुढे पांडवांच्या वंशजाला चावून मारणार होता. त्यात मय नावाच्या कारागिराला पुढे उपयोगी पडेल म्हणून वाचविण्यात आले. त्याने मयसभा बांधली. त्यातल्या फसव्या देखाव्यामुळे कौरवांची फजिती झाली. त्या वेळी द्रौपदी  हसली, त्यातच युधिष्ठीर नावाच्या सावाने हात देऊन दुर्योधनास मोठय़ा मानभावीपणे उचलले तेव्हा अपमान आणखीनच झोंबला असणार. इंद्रप्रस्थ वसवताना अरण्यातल्या असंख्य प्राण्यांचा संहार केल्यावर शहरीपणाला सामोरे गेलेले हे पांडव मग जुगाराच्या नादी लागले. जुगाराला ‘द्यूत’ असा सभ्य शब्द आहे. धर्मात्मा म्हणून प्रसिद्ध असलेल्या युधिष्ठिराचेही आणि मुख्यत: त्याचेच भान गेले आणि पुढचे रामायण घडले.. नव्हे, महाभारत सुरू राहिले. मुख्य महाभारताचा काळ निदान १५० वर्षे आहे. काळाच्या महिम्यात गगातील पात्रे वर-खाली होत राहिली. पंडू आणि त्याच्या मुलांवर अन्याय होत होता तर यादव कुलीन कुंती म्हणजे मुख्य तीन पांडवांची आई जर श्रीकृष्णाची बहीण ठरत असेल तर मग शिशुपाल आणि कंसाचा फडशा पाडणारा जगधापति विष्णूचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण कसली वाट पाहत होता? त्याचे उत्तर गणितात देता येते. हॅमिल्टन नावाच्या माणसाने १९ व्या शतकात बुद्धिबळाचे उदाहरण देत त्यातल्या मोहऱ्यांची एक गोष्ट सांगितली आहे. समजा पटावरचा घोडा अडीच पावले उचलून एके ठिकाणी चौथ्या चालीनंतर ठेवण्यात आला तर तेव्हाचे त्याचे प्रभावक्षेत्र आणि सोळाव्या चालीनंतर जरी तो त्यातच जागी असला तरी बदललेल्या काळात इतर मोहरी हलविल्यामुळे निर्माण झालेले त्याचे प्रभावक्षेत्र यात साम्य असत नाही. बुद्धिबळातल्या प्याद्यांची किंवा मोहऱ्यांची जागा दाखविताना ४x६ असे आकडे मांडण्याची पद्धत आहे. (४ आडवी रांग सहावी उभी रांग) आपण बघितलेल्या उदाहरणात ४x६ यांची प्रभावी किंमत काळ बदलू शकतो, असे प्रतिपादन केले आहे आणि महाभारत काळाच्या ओघात प्यादी आणि मोहरी पराधीन ठरली असेच दिसते. म्हणून कधी कधी खुद्द कृष्णही रण- छोडदास असतो.
रविन मायदेव थत्ते –  rlthatte@gmail.com