सुरुवातीपासूनच नायलॉन बाजारात अत्यंत लोकप्रिय झाले. स्त्रियांच्या पायमोज्यांसाठी नायलॉन अत्यंत लोकप्रिय झाले. संशोधनाच्या काळादरम्यान कंपनीने नायलॉनचे ४००० पायमोजे तयार केले होते. पण उत्पादन सुरू झाल्यावर तीन तासातच त्याचा खप झाला. त्यानंतर कंपनीने सात महिन्यांनी ४० लाख जोड विक्रीसाठी देशभर पाठविले आणि आश्चर्य म्हणजे ते सर्व चार दिवसांतच विकले गेले.
या तंतूचे नाव नायलॉन कसे पडले? या बाबत अनेक दंतकथा उदयास आल्या. एका दंतकथेनुसार नायलॉन तंतूवर अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि इंग्लंडमधील लंडन येथे एकमेकांस माहिती नसता संशोधन सुरू होते. एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात या तंतूच्या शोधावर दोन्ही कंपन्यांकडून प्रबंध वाचले गेले. आणि म्हणून न्यूयॉर्क शब्दामधील NY आणि लंडन शब्दातील LON  ही आद्याक्षरे एकत्र करून नायलॉन हे नाव पडले.
दुसऱ्या कथेनुसार डूय पॉन्ट या कंपनीची कार्यालये न्यूयॉर्क आणि लंडन येथे होती आणि या दोन्ही कार्यालयांचा नायलॉन तंतूंच्या विकासात वाटा होता आणि म्हणून कंपनीने या दोन्ही शहरांची आद्याक्षरे एकत्र करून नायलॉन हे नाव दिले. परंतु या फक्त दंतकथाच आहेत. खरे म्हणजे या तंतूला NO-RUNअसे नाव ठेवले होते. NO- RUN याचा कंपनीला अध्याहृत अर्थ असा की या तंतूपासून तयार केलेले पायमोजे किंवा कपडे सहजासहजी उलगडत नाहीत. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात ते सत्यात उतरले नाही आणि हे नावही मागे पडले. NO- RUN  दुसरा शब्द NO-LYN असा आहे. आणि ते उलटे वाचल्यावर नायलॉन असा शब्द तयार होतो. असे काहींचे मत आहे. परंतु या बाबत कंपनीला विचारले असता कंपनीचे प्रसिद्धी अधिकारी जॉन एकेल्बेरी यांनी सांगितले की नायलॉन शब्दातील पहिली तीन अक्षरे NYL  ही सहज सुचलेली आहेत आणि त्यांना तसा काही संदर्भ नाही आणि नंतरचे ON ही अक्षरे  COTTON, REYON या इतर तंतूंच्या अक्षरांवरून घेतलेली आहेत.
एकूणच नायलॉन हा भरपूर वापरला जाणारा तंतू आहे. त्याचे नाव कसे पडले? याबाबतीत मात्र संभ्रम आहे.
श्वेतकेतू
मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – जगतजीतसिंग यांचे आंतरराष्ट्रीय संबंध
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी १४० किलोग्राम वजन असलेल्या जगतजीतसिंग यांना स्थूल आणि विशाल देहयष्टी लाभली होती. राजघराण्यातील व्यक्तींशी पाळावयाचे शिष्टाचार अंगवळणी होते. त्यातच महाराजांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व, बडेजाव यांच्यामुळे ते जात तिथे त्यांची छाप पडत असे. ‘बादशहा’ पंचम जॉर्जच्या लंडन येथील विवाहास जॉर्जची आई, ब्रिटिश साम्राज्ञी व्हिक्टोरियाचे महाराजा जगतजीतसिंग हे शाही पाहुणे होते. त्यावेळी त्यांची राहण्याची व्यवस्था बकिंगहॅम पॅलेसमध्ये होती. नंतरही महाराजांच्या प्रत्येक लंडन भेटीत साम्राज्ञी व्हिक्टोरियाने त्यांचे स्वागत करून िवडसर कॅसलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. खासगी शाही मेजवान्यांना तर अगणित वेळा महाराजे राणीच्या आमंत्रणावरून सहभागी झाले.
पंचम जॉर्ज यांनी १९११ साली जगतजीतसिंगना हिज हायनेस हा किताब दिला. जगभरातील अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून महाराजांचे अतिमहत्त्वाच्या राजघराण्यातील व्यक्ती, आंतरराष्ट्रीय राजकारणी यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले. अशा व्यक्तींच्या न संपणाऱ्या यादीत रशियाचे झार निकोलस, ऑस्ट्रियाचे राजे फ्रान्सिस जोसेफ, जर्मनीचे बादशाह विल्यम द्वितीय, इटलीचे राजे व्हिक्टर इमान्युएल, बेल्जियमचे राजे अल्बर्ट, स्पेनचे राजे अल्फान्सो, फ्रेंच प्रजासत्ताकाचे प्रत्येक अध्यक्ष, विल्सन आणि रूझवेल्ट हे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष इत्यादी विशेष उल्लेखनीय होत्या. अतिमहत्त्वाच्या आणि राजघराण्यातील व्यक्तींमध्ये वरचेवर वावरल्याने महाराजा जगतजीतसिंगांनी आपली बोलण्याची ढब, पेहेराव आणि आपली अभिरुची कमावली होती आणि जगभरात त्यांच्या मित्रांचे जाळेच तयार झाले होते. फ्रेंच संस्कृती आणि सोळाव्या लुईचा महाराजांवर मोठा प्रभाव होता. कपूरथाळ्यातील आपला राजवाडा पॅरिस येथील प्रसिद्ध व्हर्साय राजवाडय़ाच्या आराखडय़ाबरहुकूम त्यांनी बांधून घेतला. व्हर्सायप्रमाणे भव्य बागाही त्यांनी राजवाडय़ाच्या पिछाडीला तयार करून घेतल्या. या कामासाठी त्यांनी एका फ्रेंच आíकटेक्टला नियुक्त केले होते.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com