पॅरिस शहराला अनेक टोपण नावे आहेत. पण ‘ला विली लुमियर’ म्हणजेच प्रकाशाचे शहर हे पॅरिसकरांचे आवडते नाव. पॅरिसच्या नागरिकांना सामान्यपणे ‘पारिसियन’ म्हटले जाते. फ्रान्समधील इतर शहरातले लोक पॅरिसकरांना ‘पॅरिगॉट’ म्हणतात. युरोपातील सुंदर शहर पॅरिस, युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या महानगरांपकी एक आहे. बृहन् पॅरिसची लोकसंख्या सध्या बावीस लक्ष, तर महानगर पॅरिसची लोकसंख्या एक कोटी तेवीस लक्ष आहे. बृहन् पॅरिसचे क्षेत्रफळ आहे केवळ १०५ चौ.कि.मी., तर महानगर पॅरिसचे आहे १२ हजार चौ.कि.मी. तिसऱ्या शतकातील ‘ल्युटेशिया’ या रोमन पॅरिसचे क्षेत्रफळ होते ५२ हेक्टर्स. दहाव्या शतकानंतर पॅरिसचा विस्तार वाढायला लागून ११८० सालचे पॅरिस होते २०० हेक्टर्स. १२२० साली राजा फिलीपने ५४०० मीटर लांबीची तटबंदी बांधून त्याला दहा वेस बांधल्या. १३२८ साली पॅरिस झाले ४२८ हेक्टर्स तर १३७१मध्ये ते झाले ४४० हेक्टर्स. इ.स. १३४८ ते १३५० या काळात पॅरिसमध्ये ‘ब्लॅक डेथ’ या प्लेगचा प्रथम शिरकाव झाला. त्यापूर्वी इथली लोकसंख्या होती दोन लाख. पुढे पंधरा आणि सोळाव्या शतकात तर या प्लेगने पॅरिस शहरात थमान घातले. १४६६ साली आलेल्या प्लेगच्या साथीने चाळीस हजार बळी घेतले. १८३२ आणि १८४९ साली आलेल्या प्लेगने आणखी वीस हजार माणसे दगावली. १७८९-१७९९ या राज्यक्रांतीच्या धामधुमीत पॅरिसची लोकसंख्या एक लाखाने घटली. नेपोलियन तृतीय या राजाने १८६० मध्ये पॅरिस शहराच्या पंचक्रोशीतली अनेक गावे पॅरिसमध्ये विलीन केल्यामुळे मोठी लोकसंख्यावाढ झाली. १९०१ साली बृहन् पॅरिसची लोकसंख्या २७ लक्ष झाली. पुढच्या वर्षांमध्ये पॅरिसमधील अनेक कुटुंबे उपनगरात राहावयास गेल्याने लोकसंख्या रोडावली. २०११ साली झालेल्या खानेसुमारीत बृहन् पॅरिसची लोकसंख्या होती साडेबावीस लाख.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

उपयुक्त बुरशी: क्लॅव्हीसेप्स परपुरीया

पाव आणि पिझ्झा या खाण्याच्या पदार्थाबरोबर काळाच्या ओघात ‘चीज’ हा पदार्थ इतका प्रसिद्ध झाला की चीज बनविण्याची प्रक्रिया दुग्धव्यवसाया इतकी जुनी आहे यावर कुणाचा विश्वास बसत नाही. औद्योगिकीकरणातून चीज बनवण्याच्या प्रक्रियेतही अनेक बदल झाले. आज जगभरात सुमारे ५०० हून अधिक चीजचे प्रकार उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रकारच्या चीजचा रंग, मऊपणा, टिकाऊपणा, चव इत्यादींना किण्वन प्रक्रियेतील विविधता कारणीभूत आहे.

विविध खाद्यपदार्थाच्या निर्मितीतून त्यांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी परिरक्षके (प्रिझव्‍‌र्हेटिव्ह) तयार केली. कवकांचा वापर करून त्यावर केलेल्या परिरक्षकांपेक्षा आज बॅक्टेरियापासून तयार केलेले जपानमधील मोनोसोडीयम ग्लूटामेट हे परिरक्षक वापरण्याकडे लोकांचा जास्त कल आहे. काळाबरोबर मानवाच्या गरजा आणि तंत्रज्ञानाचा विकास यांचे आलेख उंचावत गेले आणि कबरेदकांचे रूपांतर जीवनावश्यक मूलतत्त्वांमध्ये करण्यास सुरुवात झाली. ऑर्गॅनिक अ‍ॅसिड्स या गटातील सायट्रिक अ‍ॅसिड, ग्लुकॉनिक अ‍ॅसिड, फ्युमॅरिक अ‍ॅसिड यांच्या उत्पादनात कवकांचा वापर सुरू झाला. आज सायट्रिक अ‍ॅसिडसाठी किण्वन प्रक्रियेत अ‍ॅसपरजीलस नायगर या कवकाचा वापर केला जातो. पेनिसिलियम ल्युटियमच्या साहाय्याने ग्लुकॉनिक अ‍ॅसिड रायझोपोस आणि म्यूकरचे प्रकार वापरून फ्युमॅरिक अ‍ॅसिडची निर्मिती केली जाते. आमायनो अ‍ॅसिड्स ही शरीरातील प्रथिनांसाठी लागणारी मूलतत्त्वेही आज किण्वन प्रक्रियेतून तयार केली जातात. ट्रीप्टोफॅन या रसायनाच्या निर्मितीत हॅनसेन्युला अ‍ॅनामोला आणि क्लॅव्हीसेप्स परपुरीया उपयोगात आणली जातात. कॅनडीडा  पेलिक्यूलोसा हे कवक लायसीनसाठी आणि मेमीओनीन यांच्या उत्पादनात मदत करतात. काही अमायनो अ‍ॅसिडच्या उत्पादनसाठी यीस्ट हे कवक इतर कवकांबरोबर वापरले जाते.

जीवनसत्त्वे हीसुद्धा शरीरस्वास्थ्यासाठी आवश्यक आहेत जीवनसत्त्व ‘बी’ ग्रूपमधील बी, बी-३, जी, इत्यादी  जीवनसत्त्वे यीस्टपासून तयार करण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळवले आहे. यीस्ट या कवकावर अल्ट्राव्हायलेट किरणांचा मारा करून ‘जीवनसत्त्व डी’ बनविण्याचे प्रयत्नही यशस्वी झाले आहेत. ‘जीवनसत्त्व रायबोफ्रॅव्हीन आणि बीटाकॅरोटीन यांच्या उत्पादनातही कवकांचा वापर होतो.

अमायलेज प्रोटीऐज, लायपेज, सेल्यूलेज, लॅक्टेज अशा अनेक एनझाइमच्या उत्पादनात कवकाबरोबर बॅक्टेरीया वापरले जातात. आश्चर्याची बाब म्हणजे १९८५ साली कवकाद्वारे निर्माण केलेल्या वितंचकांची (एनझाइमस) विक्री ७५००० टन इतकी होती.

–  प्रा. सुरेखा सारंगधर (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org