गेल्या दोन सहस्रकांत भारतीय प्रदेशात येऊन इथे स्थायिक झालेल्या परकियांपैकी पारशी जमातीचे लोकही आहेत. हे लोक भारतीय संस्कृतीत एवढे समरस झाले की त्यांचे परकेपण इतरांना कधी जाणवलेच नाही! पारशी जमातीने भारतीय जीवनशैलीतल्या अनेक परंपरा स्वीकारून या देशाच्या औद्योगिक क्षेत्रात, समाजकारणात आणि अर्थकारणात भरीव, मोलाचे योगदान दिले आणि देशाचा विकास साधला.

पारशी जमात ही मूळची पíशया म्हणजेच इराणची. पार्स किंवा फार्स हा इराणच्या ३१ इलाख्यांपैकी एक; ते मूळच्या इराणी लोकांचे पहिले वसतिस्थान समजले जाते. इराणी संस्कृतीचे प्रमुख केंद्र असलेल्या पार्स इलाख्याची राजधानी शिराझ या शहराबद्दल बोलताना पारशी, इराणी माणूस अत्यंत भावनाशील बनतो. या पार्स इलाख्यावरून देशाचे नाव पर्शिया, तर त्यांची भाषा फारसी झाली!

झोरास्ट्रियनिझम हा झोरास्टर ऊर्फ झरतुष्ट्र या इराणी धर्मचिंतकाच्या तत्त्वज्ञानातून उगम पावलेला धर्म आहे. इ. स.पूर्व सहाव्या शतकात पíशयात स्थापन झालेला हा धर्म, एके काळी जगातील अधिक अनुयायी असलेल्या मोठय़ा धर्मापैकी एक होता. याच्या स्थापनेनंतर अनेक शतके इराणी लोकांचा हाच धर्म होता. अलेक्झांडर द ग्रेटने इराणच्या हखामनी साम्राज्याशी केलेल्या युद्धानंतर या धर्माची वाढ खुंटली. पुढे सातव्या शतकात इस्लामचा उदय झाला आणि त्यापाठोपाठ झोरास्ट्रियन धर्माचा ऱ्हास सुरू झाला. अरबांनी पíशयावर (इराण) अंमल केला आणि आठव्या शतकात त्यांनी इस्लाम प्रसाराचा धडाका लावला. धर्मातर न स्वीकारणाऱ्यांचा छळ आणि कत्तलींचे सत्र सुरू झाले, ते साधारणत: आठव्या ते दहाव्या शतकात मोठय़ा प्रमाणात वाढले. ही दोनशे वर्षे इराणी लोकांनी मुस्लीम आक्रमकांशी लढा दिला खरा; पण त्यात आक्रमकांचीच सरशी झाली.

या संघर्षांत अनेक इराणी लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी पलायन करून इराणी आखातातल्या होरमुझ या किनारपट्टीच्या गावात प्रथम आश्रय घेतला. हे लोक नंतर सिंधमध्ये आणि पुढे दीव आणि गुजरातच्या ग्रामीण भागात स्थायिक झाले. मूळचे पíशयाचे राहणारे असल्याने भारतीय प्रदेशात आश्रय घेऊन स्थायिक होणाऱ्या या जमातीला ‘पारशी’ हे नाव पडले.

– सुनीत पोतनीस  sunitpotnis@rediffmail.com