साधारणत: तेराव्या शतकात बिहारमध्ये पठाण जमातीचे लोक यायला सुरुवात झाली. सोळाव्या शतकात प्रसिद्ध पठाण राज्यकर्ता शेरशाह सुरीच्या कारकीर्दीत बिहारमध्ये येऊन स्थायिक झालेल्या पठाणांची संख्या सर्वाधिक होती. बिहारी मुस्लीम समाजात पठाण हे ‘अशरफ’ म्हणजे प्रतिष्ठित समजले जातात. या पठाणात दोन वेगवेगळ्या परंतु एकमेकांशी निगडित अशा ‘नसली आणि दिवाणी’ या उपजमाती आहेत. नसली म्हणजे अफगाणिस्तानातून बिहारात आलेल्या पठाणांचे पुढचे वंशज, तर दिवाणी म्हणजे इस्लाममध्ये धर्मातरित राजपूत, भूमिहर यांचे पुढचे वंशज.

बिहारी पठाणांच्या त्यांच्या टोळ्यांच्या मूळ नावांप्रमाणे सुरी, शेरबानी, बंगश, अफ्रिदी, खाटक, लोधी, घोरी वगैरे नावांच्या अकरा जमाती आहेत. यांच्या अनेक पिढय़ा इथे राहिल्यामुळे पठाणांची मूळ भाषा पुश्तो अनेकांना बोलता येत नाही, पण या सर्वाना िहदीबरोबर अवधी आणि भोजपुरी या प्रचलित भाषा अस्खलितपणे येतात.

पाटणा शहरात पठाण वस्त्यांचे अनेक मोहल्ले आहेत. या मोहल्ल्यांपैकी ‘लोधी काद्रा’, ‘खाटक टोला’, ‘अफ्रिदी टोला’ हे प्रसिद्ध आहेत. ‘कालोखान’ आणि ‘मालोखान’ ही दोन मोठी उद्यानेसुद्धा पठाणांच्या नावाची आहेत. तमूरलंगचे हे दोन सेनाधिकारी आठव्या शतकात पाटण्यात राहिले होते. बिहारमध्ये  काही खेडी तर संपूर्ण पठाणांची दिसतात. दक्षिण बिहारातील रोहेला पठाण हे मोठे जमीनदार आहेत. माओवादी संघटनांना तोंड देण्यासाठी यांच्याकडे मोठय़ा संख्येने सन्य वजा सुरक्षा पथके राखलेली असतात. बिहारात अधिक प्रमाणात आढळणाऱ्या पठाणांच्या युसुफझाई, अफ्रिदी, खाटक आणि शिरानी या उपजमाती असून त्यापैकी युसुफझाई हे अधिक सुशिक्षित आणि बहुतेक सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत. अफ्रिदी हे त्यामानाने कमी शिक्षित पण आधुनिक विचारसरणीचे, इतर समाजांमध्ये मिसळणारे आणि इतर मुस्लिमांबरोबर रोटी-बेटी व्यवहार करणारे आहेत.

sunitpotnis@rediffmail.com