जगामध्ये मका, गहू, तांदूळ यानंतर सर्वात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणजे बटाटा. मूळचा पेरू देशातील हा बटाटा आज पृथ्वीवरील प्रत्येक देशात आबालवृद्ध सर्व जण आवडीने खातात. बटाटा ही झुडूप या वर्गातील वनस्पती आहे. त्यामुळे या झाडाची उंची जेमतेम ५०-६० सेंटिमीटर असते. ‘सोलानाम् टयूबरोसम’    Solanum  tuberosum  या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीची फुले पांढरी, गुलाबी, लाल, निळा, जांभळा अशा विविध रंगसंगतीत असली तरी आतील पुंकेसर मात्र पिवळ्याच रंगाचे असतात. गुलाबाप्रमाणे बटाटय़ाच्या जंगली प्रजातीस लहान हिरवट टोमॅटोच्या आकाराच्या भरपूर बिया असलेली फळे लागतात; परंतु लागवडीसाठी असलेल्या बटाटय़ास फुले येतात, मात्र फळधारणा होत नाही. म्हणूनच या वनस्पतीचे पुनरुत्पादन तिच्या जमिनीखाली वाढणाऱ्या टय़ुबरद्वारे होते. बटाटय़ाच्या सर्वात खालच्या फांद्या जमिनीखाली जातात. या फांद्यांना अनेक उपफांद्या फुटतात. त्यातील काही फांद्यांच्या टोकाचे रूपांतर लंबगोलाकार टय़ुबरमध्ये होते. बटाटय़ामध्ये फळ, बी नसल्यामुळे अन्न साठवण्याचे काम या टय़ुबरलाच करावे लागते. म्हणूनच यास खोडाचे बदललेले रूप असे म्हणतात. बटाटय़ामध्ये पिष्ठमय पदार्थाबरोबरच भरपूर खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. जमिनीखाली फांदीवर तयार झालेले टय़ुबर परिपक्व झाले की या वनस्पतीची पाने पिवळी पडू लागतात, याच वेळी टय़ुबरची काढणी होते. अशा टय़ुबरवर ठरावीक अंतरावर डोळे असतात. टय़ुबरला ओलसर जागी ठेवले की त्यामधून कोंब तयार होतात. अशा टय़ुबरचा बटाटाच्या लागवडीसाठी उपयोग होतो. पूर्वी बटाटय़ाची लागवड मोठय़ा टय़ुबरचे तीन तुकडे करून केली जात असे. आता ‘सीड टय़ुबर’सारखे बियाणे वापरले जाते. बटाटा टिकून राहावा म्हणून त्याच्यावर गॅमा किरणांची प्रक्रिया करतात. बटाटय़ाच्या फक्त टय़ुबराचा अपवाद वगळता इतर भागांत ‘सोलानिन’ हा घातक पदार्थ असतो. म्हणून आहारात हिरवे आणि मोड आलेले बटाटे वापरू नयेत. तळलेल्या बटाटय़ापेक्षा भाजलेला बटाटा आरोग्यास उत्तम असतो.

डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

वॉर्सात जामनगरची स्मृती..

वॉर्साच्या नगरपालिकेने ३१ मे २०१२ रोजी शहरातील एका चौकाला ‘जामश्री दिग्विजयसिंह रणजीतसिंह जडेजा स्क्वेअर’ असे नाव दिले. जामनगरचे राजे दिग्विजयसिंह यांनी दुसऱ्या महायुद्ध काळात रशियातून निर्वासित पोलिश मुलांना जामनगरात आणून त्यांची अन्नपाणी, निवारा, शिक्षण यांची उत्तम व्यवस्था केली. महाराजांचे नाव चौकाला देऊन वॉर्सा प्रशासनाने महाराजांच्या मरणोपरान्त त्यांचा गौरव केला. पोलिश लोकांना उच्चारायला अवघड असे महाराजांचे नाव टाळून चौकाचे नामकरण ‘द स्क्वेअर ऑफ गुड महाराजा’ असे करण्यात आले.

सप्टेंबर १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. नाझी जर्मनी आणि सोव्हिएत रशियाने आपसात पोलंड वाटून घेतले. रशियाने बळकावलेल्या पोलंडमध्ये जे पोलिश लोक सोव्हिएत आणि कम्युनिझमच्या विरोधात होते अशांना कैद करून सबेरिया सारख्या दुर्गम प्रदेशातील श्रम छावण्यांमध्ये रवानगी करण्याचा हुकूम स्टालिनने काढला. १९४१ साली आपला मित्र हिटलर याने आपल्यावरच पंजा उगारल्याचे लक्षात आल्यावर स्टालिनला दोस्त राष्ट्रांकडे धाव घेऊन त्यांच्या गोटात सामील होण्याशिवाय पर्याय उरला नाही. स्टॅलिनने पुढे आपल्या श्रमछावण्यांमधील पोलिश माणसे आणि मुले यांच्या सुटकेचा हुकूम काढला. पोलंडमध्ये युद्धाची धुमश्चक्री चालू असल्याने ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चíचल यांनी, काही काळ ब्रिटिश सैन्यातही काम केलेले जामनगरचे महाराजा दिग्विजयसिंहांना विनंती केली की या ५०० अनाथ मुलांच्या सुरक्षेची व अन्नपाण्याची काहीतरी व्यवस्था त्यांनी करावी. महाराजांनी हिटलरची नजर चुकवून त्या मुलांना जामनगरला त्यांच्या संस्थानात आणून जवळच्या बालाधडी येथे ‘पोलिश चिल्ड्रन कॅम्प’ उभारून त्यांच्या अन्न, पाणी आणि निवाऱ्याची सोय केली. एवढेच नाही तर पोलंडहून दोन शिक्षक आणून पोलिश माध्यमातून त्यांच्या शिक्षणाचीही सोय त्यांनी केली. १९४२ ते १९४६ अशी चार वष्रे महाराजांनी त्या ५०० मुलांचे पालकत्व स्वीकारून युद्धजन्य परिस्थिती संपल्यावर सर्व मुलांना पोलंडमध्ये नेऊन त्यांना तिथल्या सरकारच्या स्वाधीन केले.

वॉर्सा शहराने या चांगुलपणाची स्मृती जपली आहेच. पण अलीकडे, २००४ साली त्या पाचशे मुलांपकी सत्तर मुलांनी जामनगरला भेट दिली. अर्थातच आता ती मुले सत्तरीत पोहोचलेली वृद्धावस्थेत होती!उ

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com