पॉलिस्टर तंतूंच्या उत्पादन प्रक्रियेमधील पुढील पायरी म्हणजे वितळ कताई प्रक्रिया. जर चिप्सपासून कताई करावयाची असेल तर या चिप्स प्रथम २६० ते २७० अं.सें. तापमानास वितळवल्या जातात. या वेळी वापरला जाणारा वितळक तीन काय्रे करतो. या वितळकामध्ये चिप्स वितळवल्या जातातच पण त्याचबरोबर वितळकामध्ये असलेल्या फिरत्या स्क्रूमुळे चिप्सपासून तयार झालेला वितळ द्राव घुसळून एकजिनसी केला जातो आणि यामध्ये हा वितळ द्राव कताईपूर्वी पुरेसा वेळ ठेवला जातो, जे एकसारख्या दर्जाचे तंतू बनविण्यासाठी आवश्यक असते.
बहुवारिक वितळवण्याच्या वेळी त्यामध्ये गरजेनुसार इतर रसायने मिसळली जातात. उदा. तंतूची चकाकी कमी करण्यासाठी टायटय़ानियम डायऑक्साइड मिसळतात तर तंतूला आकर्षक बनविण्यासाठी किंवा तंतूची रंगाई सहज व्हावी म्हणूनसुद्धा काही रसायने वितळलेल्या बहुवारिकामध्ये मिसळली जातात.
वितळकामधील हा द्राव पंपाच्या साह्य़ाने मोठय़ा दाबाने तनित्राच्या सूक्ष्म छिद्रांमधून बाहेर सोडला जातो. तनित्राच्या बाहेर आल्यावर वितळलेल्या बहुवारिकाच्या धारांप्रमाणे दृश्य दिसते. सर्वसाधारणपणे तनित्रातील छिद्रे ही वर्तुळाकार असतात. काही विशेष प्रकारचे तंतू बनविण्यासाठी छिद्रांचे आकार हे त्रिकोणी, पंचकोनी, त्रिदलीय किंवा अनेक दलीय असे असतात.
एका तनित्रामध्ये असलेल्या छिद्रांची संख्या कोणत्या प्रकारचा तंतू बनवायचा आहे त्यावर अवलंबून असते. पॉलिस्टरचे अखंड तंतू बनवायचे असल्यास या अखंड तंतूमध्ये किती एकेरी तंतू लागतात तेवढी छिद्रे तनित्रामध्ये ठेवली जातात. अखंड तंतूंमध्ये त्याच्या जाडीवर आधारित ३६ पासून २८८ पर्यंत एकेरी तंतू असतात त्यामुळे त्याप्रमाणे तेवढी छिद्रे तनित्रामध्ये ठेवावी लागतात.
आखूड तंतू बनविताना तनित्रामध्ये हजारो छिद्रे असतात. त्यामधून बाहेर हजारो तंतूंचा एक जाड असा जुडगा बनतो आणि पुढील प्रक्रियेत त्याचे लहान लहान तुकडे करून आखूड तंतू बनविण्यात येतात.
चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – शांतताप्रिय मालेरकोटला
सध्या पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील मालेरकोटला येथे स्वातंत्र्यपूर्व काळात एक महत्त्वाचे संस्थान होते. लुधियानापासून ५० कि.मी. अंतरावर असलेले हे संस्थान स्वतंत्र भारताच्या पेप्सू या प्रांतात प्रथम वर्ग करण्यात आले. १९५६ साली हे संस्थान पंजाबात वर्ग झाले. स्वातंत्र्यानंतर फाळणीच्या काळात झालेल्या शीख, हिंदू व मुस्लीम धर्माच्या लोकांमध्ये झालेल्या संघर्ष आणि िहसाचारातही या संस्थानाच्या लोकांनी आपसात सलोखा ठेवून शांतता राखल्यामुळे अन्य पंजाबी राज्यांहून मालेरकोटला उठून दिसते. या संस्थानाचा इतिहासही मोठा आहे..
 बेलहोल लोधी या पुढे दिल्लीचा सुलतान झालेल्या माणसाचे प्राण वाळूच्या वादळातून वाचविले म्हणून जहांगीर शेख सद्रुद्दीन याला १४५४ साली मालेरकोटला येथील जहागीर मिळाली. सद्रुद्दीनच्या घराण्यातल्या बायजीदखान याने १६५६ साली बादशहा औरंगजेबांचे प्राण वाघाच्या हल्ल्यातून वाचविले म्हणून बादशाहने त्याला स्वतचा किल्ला व छोटे सन्य उभारण्यास परवानगी दिली. बायजीदने स्थापन केलेल्या राज्याचे नाव मालेरकोटला. १७०२ साली आनंदपूर साहिब वेढय़ातून गुरू गोिवदसिंग यांची दोन मुले, फतेहसिंग वय नऊ वष्रे व झोरावरसिंग वय सात वष्रे औरंगजेबाच्या हुकुमावरून सरहींदचा नवाब वझीरखानाने पकडली. नवाबाच्या न्यायालयाने त्या दोन मुलांना िभतीत चिणून मारण्याची शिक्षा जाहीर केली. त्यावेळी मालेरकोटलाचा नवाब शेर मोहम्मद याने त्या शिक्षेला विरोध केला व अशी शिक्षा कुराणाच्या तत्त्वांच्या विरोधी आहे असे सरहींद दरबारात खडसावून सांगितले. परंतु त्याचा उपयोग न होता त्या मुलांना शिक्षा देण्यात आली. गुरू आणि नवाबाच्या शिकवणीचा योग्य परिणाम आजतागायत येथल्या शीख व मुस्लिमांमध्ये आहे. फाळणीनंतर झालेल्या दंगलींमध्ये पूर्ण पंजाब होरपळला जात असताना मालेरकोटलाच्या लोकांनी सभा घेऊन धार्मिक सलोखा राखला. बाबरी मशीद प्रकरणानंतर काही तरुणांनी दंगल करण्याचा प्रयत्न केला. परंतु तीन्ही धर्माच्या नेत्यांनी एकत्र येऊन त्यांना हिंसाचारापासून परावृत्त केले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com