इंदूरपासून १५ किलोमीटर दूर असलेल्या रंगवासा गावानजीक डेहरी येथे सहा एकर शेतात, २२ मार्च २००६ रोजी आम्ही ‘रंगवासा जैविक ग्राम संस्थे’ची स्थापना केली. तेव्हा तिथे एक विहीर व दोन बोअरवेल होत्या. या परिसरात आम्ही शेततळं, गांडूळ प्रकल्प, गोठा, काही कुटीरोद्योग, पर्यावरण व शेतीवरील दुर्मीळ मराठी व इंग्रजी पुस्तकांचे छोटेखानी ग्रंथालय, प्रशिक्षण बठक व्यवस्था, दृकश्राव्य प्रशिक्षण व्यवस्था, वाहन व्यवस्था हे सर्व उभारलं.
शेतातील उपलब्ध सामग्रीतूनच खतनिर्मिती, सूक्ष्म जीवाणूंची माहिती, जलसंरक्षण, सुक्या चाऱ्याने व पीक अवशेषाने आच्छादन करून सिंचनात बचत, धूळ पेरणी, दाभोळकरांची सूर्यशेती, फुकुओकाची मातीचा गोळा करून पेरणी करण्याची पद्धती, जैव कीटकनाशकांपासून रोगराई नियंत्रण, रासायनिक व सेंद्रिय शेतीतल्या खाद्यान्नातील रंग, स्वाद व पोषक तत्त्वातील फरक हे सर्व आणि  ग्राहकांना खाद्यान्न कसं विकायचं हेही संस्थेत शिकवलं जातं.
शेतकऱ्याने मोलवृद्धी असलेली पिके घ्यावीत म्हणून भुईमुगापासून तेल, दूध, लोणी (पीनट बटर) कसं तयार करायचं, लाल अंबाडीच्या पानांपासून भाजी, फुलांपासून चहा, शीतपेय, मुरांबा, चटणी व त्याच्या खोडाला भिजवून, कुटून त्यापासून तागाचा दोर कसा तयार करून विकायचा, घरात सणावाराला वा इतर वेळी दिवा, समई, पणत्या यासाठी गोडं तेल न वापरता एरंडीचं तेल कसं वापरायचं, देशी गुलाब, मोगरा, तुळस, झेंडू, कढीपत्ता, हळद, पपईसारखी झुडूपवजा झाडं शेताच्या चारी बाजूला कुंपणावर कशी लावायची हे इथं शिकायला मिळतं. या झाडांमुळे पिकांना ओल व गारवा मिळतो. या पिकांच्या विक्रीतून पसाही मिळतो. पालक, मेथी, पुदिना उन्हात वाळवून त्याची भुकटी विकल्यास त्यांना वर्षभर चांगली मागणी असते. हिरव्या पाल्यापेक्षा त्याला पंधरा-वीसपट भाव मिळतो. कचऱ्यापासून व चाऱ्यापासून सुधारित चूल व वीजनिर्मिती कशी होईल, ओट, नाचणी, कारळं यांचे गृहउद्योग प्रकल्प शेतात कसे राबवता येतील, हेही इथे शिकायला मिळतं.
‘शेतातून सरळ ताटात’ हा ग्राहक शेतकरी मेळा आम्ही इंदूरला राबवला. त्यामुळे शेतमालाची थेट विक्री ग्राहकांना झाली आणि पसा सरळ शेतकऱ्यांच्या खिशात गेला.
– अरुण डिके (इंदूर)   
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..: दोन उंटिणींची गोष्ट
अखनूरच्या छावणीतल्या त्या माणसाचे गूढ उकलण्याच्या आधीच मी दुसऱ्या छावणीत पोहोचलो. ही छावणी दुर्गम भागात होती. तिथे एकही पक्के किंवा कच्चे घर नव्हते. सर्वत्र तंबू लावले होते. पोहोचल्यानंतर एके दिवशी एक उंटीण अडली आणि मला बोलावणे आले. मी जेमतेम पाच स्त्रियांच्या प्रसूतीच्या वेळेला विद्यार्थी म्हणून हजर होतो ते उंटिणीचे दृश्य बघून मी हादरलोच. तेवढय़ात एक सुईण आली आणि म्हणाली ‘रस्सी से बांधो’. मी बघतच राहिलो. मग दोर आणला. त्या पिल्ल्याच्या पायाला बांधून त्याला आम्ही तीन-चार जणांनी ओढून प्रसूती केली. ती उंटीण सबंध वेळ आवाज काढत उभी होती, ती मग एकदम शांत झाली आणि बसली. आणि रक्तमांसाने वेढलेले ते पिल्लू उंटिणीला बिलगण्याचा प्रयत्न करू लागले.
या माझ्या वास्तव्यात एक उंटीण माझ्या तंबूत शिरली त्याबद्दल सांगतो, पण त्या आधी त्या छावणीत एक अतिशय उच्च विद्याविभूषित अमेरिकेतला लहान मुलांच्या हृदयाचा निष्णात मला मदत करायला पाठविण्यात आला. हा दाक्षिणात्य होता. देशसेवा करायला तो भारतात परत येऊ इच्छित होता. कोठल्यातरी दिल्लीतल्या मंत्र्याला भेटून त्याने त्याला देशसेवा करण्यासाठी इथे पाठवून दिले. तो रडकुंडीला आला. इथे धड स्टेथोस्कोप नव्हता. मग न कळवताच खासगी जीप मिळवून निघून गेला. मग त्या दुसऱ्या उंटिणीची गोष्ट सुरू झाली.
ही होती एक मध्यमवयीन भारतीय डॉक्टर. माझ्या तंबूत दोन लाकडाचे पलंग होते. तिथे आल्या आल्या तिने आपला बेड-बिस्तरा पसरला. एक आरसा अडकवला आणि पावडर लिपस्टिक लावत बसली. नंतर मला म्हणाली, ‘जरा मूडो’. मी वळायच्या आतच हिने कपडे बदलायला सुरुवात केली. मग गप्पा झाल्या. बाई ‘शादीशुदा’ होती. इथे एक साहस करायला ती आली होती. दोन रात्री आम्ही एका तंबूत काढली. परस्त्रीच्या शेजारी झोपायचा हा माझा पहिला आणि शेवटचा प्रसंग. मग एक आश्चर्य घडले. एक मुंबईचा डॉक्टर अचानक उपटला. हा कोठून कसा आला कोण जाणे. आल्या आल्या त्याने  संधान साधले आणि हे दोघे पिकनिकला निघून गेले. रात्री जेवण झाल्यावर आता झोपायची व्यवस्था काय, या विवंचनेत मी असताना त्यांनीच तो प्रश्न सोडवला. मला म्हणाले, you be comfortable. आणि शेजारच्या पलंगावर एकाच गोधडीत शिरले आणि काहीच घडले नाही, असे भासवत कधी तरी झोपी गेले. मी दिवसभर काम केले असल्यामुळे मलाही झोप लागली. सकाळी उठल्यावर त्या दोघांनी दिल्लीत कुठे कधी भेटायचे हे ठरविले आणि तो निघून गेला. ‘नैतिकतेची ऐशी तैशी’(!) त्याबद्दल पुढच्या प्रकरणात.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : तोंड येणे : मुखपाक- भाग १
तोंड येणे हा विकार रुग्णाने आपल्या आरोग्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा बहुधा परिणाम असतो. आकस्मिक तोंड येणे हे क्वचित घडते. त्याची कारणे आगंतुक किंवा चुकीची औषधे ही असतात. पण नेहमीच तोंड येणे व ही तक्रार बराच काळ टिकून राहणे याला अती उष्ण आहार, मलावरोध, अजिर्ण अशी सामान्य व टाळता येणारीच कारणे असतात. या लेखात कफ, सर्दी, यामुळे येणाऱ्या मुखपाक विकाराचा विचार केलेला नाही. काही वेळेस कफामुळे, सर्दीमुळे चिकटा यामुळे, तोंड, जीभ, घसा यांना सूज येऊन तोंड आल्यासारखे वाटते. त्याचा विचार स्वतंत्र लेखात.
कॅन्सर या रोगाची शहरात व खेडय़ातही सुशिक्षित व अशिक्षितांनीही एवढी धास्ती घेतली आहे की बोलायची सोय नाही. वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन व तथाकथित तज्ज्ञांची व्याख्याने ऐकली जातात. शरीरात कोठेही जराशी गाठ किंवा तोंडात फोड आला की लोक कॅन्सरच्या शंकेने धावपळ करतात. माझ्याकडे आलेल्या रुग्णांच्या व माझ्या सुदैवाने, तोंडातील फोडाकरिता आलेले सर्व रुग्ण साध्या सोप्या व तुलनेने स्वस्त उपचारांनी थोडय़ाच काळात पूर्ण बरे होऊन, आपापल्या घरी उत्तम आरोग्याचा अनुभव घेत आहेत. यातील काही रोगी ‘आम्ही बायोप्सी करून घेऊ का? ‘लाईट घेऊ का?’ असे प्रश्न विचारत. आयुर्वेदावर नितांत श्रद्धा ठेवून या तपासण्याऐवजी काही साधे सोपे उपचार सुचविले. पथ्याचे नियम काटेकोरपणे सांगितले. पूर्वीपासून चालत आलेल्या कुपथ्याबद्दल जरा कडक शब्दात ‘दमबाजी केली’. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित रुग्णांनी मी सुचविलेले उपचार ऐकले, निष्ठेने केले यामुळे त्या रुग्णांची ‘वाट लागली नाही.’ नाहीतर ‘वैद्यकृतव्रण’ असा नवीनच रोग तोंड आलेल्या त्या रुग्णांना जडला असता.
तोंड आल्याबरोबर रुग्णाने इतर विकारांची सर्व औषधे तत्काळ थांबवावी. संडास साफ होणे, लघवी पुरेशी होणे, चांगली झोप लागणे, तळहात, तळपाय यांची आग होणे अशा लक्षणांवर लक्ष ठेवावे. कोणतेही व्यसन बंद करावे, हे सांगणे नलगे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २२ एप्रिल
१८८० > ‘शाळापत्रक’ मासिकाचे पहिले संपादक श्रीकृष्णशास्त्री रघुनाथशास्त्री तळेकर यांचे निधन. १८६१ साली ‘इंग्लिश-मराठी शब्दकोश’ तयार करणारे आणि ‘संस्कृत भाषेचे व्याकरण’या मराठी ग्रंथाचे कर्ते, अशी त्यांची ओळख आजही आहे.
१९२९ >  भारतातील मोजक्या भाषावैज्ञानिकांमध्ये गणना होणारे अशोक रामचंद्र केळकर यांचा जन्म. मानवसंस्कृती विज्ञानाचा भाषा हा अविभाज्य भाग मानून त्यांनी लेखन केले आहे. पाच इंग्रजी ग्रंथांखेरीज मराठीत ‘वैखरी’ आणि ‘मध्यमा’ हे भाषा आणि भाषाव्यवहाराचा वेध घेणारे लेखसंग्रह, ‘मराठी भाषेचा आर्थिक संसार’, ‘भेदविलोपन : एक आकलन’,‘प्राचीन भारतीय साहित्यमीमांसा’ असे ग्रंथ त्यांनी लिहिले. ‘भाषा आणि जीवन’ या मासिकाचे ते प्रणेते व अनेक अभ्यासकांचे गुरू आहेत.
१९३९ > १६५ विज्ञानकथा आणि विज्ञान समजावून देणारे, वैज्ञानिक भूमिका घेणारे हजारांहून अधिक लेख लिहिणारे गजानन पुरुषोत्तम फोंडके म्हणजेच बाळ फोंडके यांचा जन्म. ‘तिसरे पाऊल’ हा स्तंभ ‘लोकसत्ता’साठी त्यांनी लिहिला. अमानुष, युरेका, चिरंजीव, हे त्यांचे विज्ञानकथासंग्रह.  ‘उद्याचे वैद्यक’, ‘कॉम्प्युटरच्या करामती’ या त्यांच्या पुस्तकांना राज्य सरकारचा पुरस्कार लाभला.
– संजय वझरेकर