07 July 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : रिकामं मन आणि..

जास्त विचार करणं, त्याच त्या विचारांच्या आवर्तात फिरत राहणं याची खूप जणांना सवय झालेली असते.

(संग्रहित छायाचित्र)

मन कधी रिकामं असतं का? जेव्हा आपण एखाद्या कामात असतो, तेव्हा मन मुळीच रिकामं नसतं. ते सतत कसला ना कसला विचार करत असतं. कधी चांगला, कधी वाईट. कधी आशादायी, तर कधी चिंतांचा. जास्त विचार करणं, त्याच त्या विचारांच्या आवर्तात फिरत राहणं याची खूप जणांना सवय झालेली असते. विचार थांबत नाहीत, ते सतत एकामागोमाग एक येतच राहतात आणि सर्वात गंमत म्हणजे, नकारात्मक विचारांची संख्या सकारात्मक विचारांपेक्षा जरा जास्तच असते.

यावर मार्ग काढायचा असेल, तर एक साधा प्रयोग करून बघायला हवा. तो म्हणजे, एकाच वेळी दोन विचार करण्याचा प्रयत्न! मेंदू कितीही कार्यक्षम वगैरे असला, तरी त्याला ही एक गोष्ट काही केल्या जमत नाही. गाणी ऐकत असताना बागकाम करणं हे जमू शकतं. मशीनवर काम करत असताना गप्पा मारणं हेही जमतं. पण गणित सोडवणं आणि त्याच वेळी उद्याचा दिवस कसा मार्गी लावायचा हे ठरवणं, या दोन गोष्टी एका वेळी जमत नाहीत. या बाबीचा फायदा घेऊन अतिविचारांना मनाबाहेर ठेवता येतं.

‘मल्टिटास्किंग’चा जमाना असला, एकाच वेळी अनेक कामं करता येत असली, तरी एकाच वेळी अनेक विचार करता येत नाहीत. खूपच घाई वा निर्णायक वेळ असेल, तेव्हा विचार भराभरा चालू राहतात. ते एकामागोमाग एक इतक्या वेगानं येतात, की कधी कधी विचारांनी मन भरून जातं. अशा वेळी ते एकामागोमाग येतात; एकासह दुसरा नाही. त्या दोन्हीवर स्वतंत्रपणे एकत्रित विचार होऊ  शकत नाही.

यासाठीचा उपाय म्हणजे-रिकाम्या मनाला कामाला लावायचं; मन रिकामं ठेवायचं नाही. ते रिकामं राहिलं, की चिंता, भीती, तिरस्कार, मत्सर, दु:ख अशा नकारात्मक भावनांनी भरून जातं. त्यासाठी आपल्या मनातली शांतता, आनंदी विचार आणि सकारात्मक भावनांची जागा आपणच रिकामी करून दिलेली असते. एखाद्या बेसावध क्षणी या भावना बाहेर पडतात आणि नकारात्मक भावना अतिक्रमण करतात.

यासाठी कोणत्याही एखाद्या साध्या किंवा अवघड कामात स्वत:स गुंतवून घेणं आवश्यक- ज्यासाठी कोणाशी तरी बोलावं लागेल, त्या कामाचाच फक्त विचार येईल अन् नको ते विचार आपोआप बाजूला पडतील!

 डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 12:02 am

Web Title: relation between the mind and the brain zws 70
Next Stories
1 कुतूहल : ग्रॅहॅम बेलचा दूरध्वनी
2 मेंदूशी मैत्री : काळजी कशा कशाची?
3 मेंदूशी मैत्री : चुकतंय कुठे?
Just Now!
X