डॉ. श्रुती पानसे

जन्मत:च मेंदू नक्की काय घेऊन आलेला असतो, हा अतिशय औत्सुक्याचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. नवजात मुलांच्या मेंदूत नक्की कोणत्या यंत्रणा आधीपासून असतात आणि कोणत्या गोष्टी नंतर भरल्या जातात?

डॉ. झेन्टर आणि त्यांच्या संशोधक चमूने एका संशोधनानुसार असं सांगितलं आहे की, जन्मजातच माणसाला बोललेलं ऐकण्याच्या क्षमतेशिवाय तीन विशेष क्षमता असतात : (१) कान देऊन संगीत ऐकण्याची (२) साध्या बोलण्यापेक्षा संगीत अधिक लक्षपूर्वक ऐकण्याची आणि (३) ताल ऐकून त्यावर डोलता येण्याची.

नवजात बालक जन्मापासून कान देऊन इतरांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असतं. तसंच ते संगीतही ऐकत असतं. साधारणपणे तीन महिन्यांची बाळं बोलणाऱ्याकडे नीट नजर देऊन हुंकार देतात. लोकांनी बाळाशी किंवा खोलीत इतरांशी बोललेलं त्याला आवडतं. ते प्रतिक्रिया देत असतं; परंतु आता यापुढे जाऊन असं लक्षात आलं आहे की, साधं बोलणं आणि एखादा छानसा ठेका यांची तुलना केली, तर तालाकडे बालके अधिक लक्षपूर्वक बघतात आणि ऐकतात. ताल ऐकून त्यांच्या मनात आनंद निर्माण होतो. मात्र, त्या वेळेला त्यांना तो आनंद व्यक्त करता येत नाही. बसायला लागलेलं बाळ मात्र एखाद्या तालाला प्रतिसाद देताना स्वत:च्याच नादात मागेपुढे डोलतं. मूल तोल सावरून उभं राहायला लागलं की, गुडघ्यात वाक-वाकून प्रत्यक्ष नाचण्याचा प्रयत्न करतं. चालता यायला लागलं की, दोन पावलं मागे-दोन पावलं पुढे जाऊन थिरकतं. कोणीही शिकवलेलं नसताना आणि अशा हालचाली कधीही पाहिलेल्या नसतानासुद्धा मुलं आनंदानं नाचून प्रतिसाद देतात.

संगीत आणि विशेषत: नाच ही खास माणसाला मिळालेली देणगी म्हणता येईल. उत्क्रांतीनुसार, जलचर प्राण्यांमध्ये ही क्षमता नाही. सस्तन प्राण्यांच्या प्राणिगटात भावना आहेत, परंतु संगीताचा आनंद त्यांच्यात नाही. काही वानरांना संगीत आवडतं. माणसाला मात्र प्रगत स्वरूपाच्या भावनांच्या जोडीला आनंद निर्माण करणाऱ्या पूरक उपक्रमांची साथ आहे. त्यातलंच एक संगीत आणि  जोडीला नृत्य. मेंदूतल्या ‘ऑडिटरी कॉर्टेक्स’चा संबंध संगीताचा ताल, त्याच्याशी संबंधित पदन्यासाशी व म्हणून आनंदाशी असा अगदी जवळून असतो. आनंदी होण्याची किल्ली अशी जन्मापासून आपल्याकडे असतानाही, नंतर मात्र ती फारशी वापरली जात नाही; ते का?

contact@shrutipanse.com